जेनसोलच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींनंतर सिक्युरिटीज मार्केट रेग्युलेटरने (सेबी) कंपनीचे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनित सिंग जग्गी यांच्यावर बंदी घातली, या बंदीनंतर दोघांनीही राजीनामा दिला. सेबीने प्रवर्तकांवर बंदी घातल्यानंतर इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ‘ब्लूस्मार्टने’ आपल्या सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत.
ब्लूस्मार्टला उबर कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या कॅब सेवा या दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये कार्यरत होत्या. गुरुवारी (१७ एप्रिल) ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ब्लूस्मार्टने लिहिले, “आम्ही ब्लूस्मार्ट अॅपवरील बुकिंग तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.” ‘ब्लूस्मार्ट’च्या डिजिटल वॉलेटमध्ये असलेल्या ग्राहकांच्या निधीची परतफेड पुढील ९० दिवसांत केली जाईल, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. ब्लूस्मार्ट पूर्णपणे बंद होत आहे का? ९०० कोटींच्या फेरफार केल्याचे प्रकरण काय आहे?
ब्लूस्मार्टचे सह-संस्थापक अडचणीत
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने मंगळवारी (१५ एप्रिल) जेनसोल इंजिनिअरिंग या सौर ऊर्जा कंपनीच्या चौकशीची सुरुवात केली. ही कंपनी ईव्ही गाड्या खरेदी करायची आणि त्या ब्लूस्मार्टला भाडेतत्त्वावर द्यायची. ब्लूस्मार्ट ही ईव्ही कॅब सेवा आहे. जेनसोल इंजिनिअरिंगचे संस्थापक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी हेदेखील ब्लूस्मार्टचे प्रवर्तक आहेत.
सेबीची चौकशी सुरू असताना त्यांच्यावर कंपनीच्या व्यवहारात गैरव्यवस्थापन आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. परिणामी सेबीने कारवाई करत शेअर बाजारात त्यांच्यावर बंदी घातली. मुख्य म्हणजे पुढील सूचना मिळेपर्यंत जेनसोलमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे पद भूषविण्यासही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
सेबीने जग्गी बंधूंवर मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आरोप केला आहे. ‘सेबी’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २०२१ ते २०२४ दरम्यान सार्वजनिक कर्ज देऊ करणाऱ्या इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) कडून ९७८ कोटी रुपये कर्ज घेतले, यापैकी ६६४ कोटी रुपये कर्ज ब्लूस्मार्टला भाड्याने ६,४०० ईव्ही गाड्या देण्यासाठी घेण्यात आले होते.
परंतु, कंपनीने ५६८ कोटी रुपयांचा वापर करून केवळ ४,७०४ वाहने खरेदी केली. सेबीने आरोप केला की, जग्गी बंधूंनी २६२ कोटी रुपये वैयक्तिक कामांवर खर्च केले. सेबीने म्हटले, “यापैकी काही निधी कर्जांच्या मंजूर उद्दिष्टाशी संबंधित नसलेल्या कारणांसाठी वापरण्यात आला. त्यात प्रवर्तकांचे वैयक्तिक खर्च, उच्च दर्जाच्या रिअल इस्टेटची खरेदी, नातेवाईकांना निधी हस्तांतरण आदी गोष्टींचा समावेश होता.”
सेबीला त्यांच्या तपासात असेही आढळून आले की, जेनसोलने क्रेडिट रेटिंग एजन्सीज (सीआरए) पासून कर्जातील फेरफार लपवण्यासाठी आयआरईडीए आणि पीएफसीकडून बनावट कागदपत्रे तयार केली. सेबीने सांगितले, “कंपनीने क्रेडिट रेटिंग एजन्सीज स्टेटमेंट (नो डिफॉल्ट स्टेटमेंट्स) सुरू ठेवले, त्यात अडथळा येऊ दिला नाही. ही एजन्सी कोणत्याही कर्जाची सेवा देण्यात विलंब किंवा घोटाळा झाला नाही असे प्रमाणित करते.” सेबीने म्हटले, “कंपनीचे निधी नातेवाईकांकडे हस्तांतरित केले गेले. वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेले, जणू काही कंपनीचे निधी या प्रवर्तकांचे पिगी बँक होते.”
अनमोल सिंग जग्गी ‘टेकक्रंच’शी बोलताना म्हणाले की, कंपनी सेबीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि तथ्ये सादर करत आहे. “हे फक्त एक अंतरिम पाऊल आहे आणि मला विश्वास आहे की एकदा सर्वकाही योग्यरित्या तपासले गेल्यास आमची भूमिका स्पष्ट होईल. आम्ही नेहमीच जबाबदारीने गोष्टी करत आलो आहोत,” असे जग्गी म्हणाले.
पैशांची फेरफार कशी केली?
जग्गी बंधूंवर आरोप आहे की त्यांनी हा पैसा लक्झरी रिअल इस्टेट, गोल्फ उपकरणे आणि परदेश प्रवासावर खर्च केला. त्यांनी या पैशांचा वापर करून गुरुग्रामच्या ‘पॉश द कॅमेलियास’मध्ये ४३ कोटी रुपयांचा लक्झरी अपार्टमेंट, २६ लाख रुपयांचा प्रीमियम गोल्फ सेट, त्यांच्या आई आणि जोडीदारांना ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैशांचे हस्तांतरण, १.८६ कोटी रुपये परकीय चलन आणि परदेश दौऱ्यांसाठी वापरण्यात आले.
ब्लूस्मार्ट बंद होणार का?
ब्लूस्मार्टने त्यांच्या सेवा तात्पुरत्या बंद करत असल्याची घोषणा केली आहे, परंतु त्यांच्या सेवा पुन्हा सुरू होतील की नाही याबाबत शंका आहे. ब्लूस्मार्ट कंपनीकडे देशातील आठ हजारांहून अधिक कारचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक राइड-हेलिंग फ्लीट आहे. २०१८ च्या मध्ये जग्गी बंधू आणि पुनीत गोयल यांनी जेनसोल मोबिलिटी म्हणून ब्लूस्मार्टची स्थापना केली होती. ब्लूस्मार्ट मुख्य व्यवसाय बंद करत असल्याची आणि उबरचा फ्लीट पार्टनर म्हणून काम सुरू करणार असल्याची माहिती आहे, असे इकॉनॉमिक टाईम्स (ईटी)च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
सूत्राने दिलेल्या महितीनुसार, ब्लूस्मार्टच्या शेअरहोल्डर्सनी एका योजनेला मंजुरी दिली असून ते येणाऱ्या काही आठवड्यात त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून उबरकडे गाड्या पाठवणे सुरू करतील. हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. सुरुवातील कंपनी केवळ ७०० ते ८०० गाड्या पाठवेल. सर्व गाड्या पाठवल्यानंतर ब्लूस्मार्ट आपला व्यवसाय पूर्णपणे बंद करेल. या करारानुसार ब्लूस्मार्टला भाड्याचा काही भाग दिला जाईल. जेन्सोलमध्ये सुरू असलेल्या वादाने ब्लूस्मार्टच्या गुंतवणुकीकडे कोणाचे लक्ष नाही. कंपनीला १५ ते २० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे, अशी माहिती सूत्राने दिली आहे. जेनसोलच्या कर्ज थकबाकीमुळे ब्लूस्मार्टच्या कामकाजावर परिणाम झाला आहे आणि परिणामी कंपनीच्या दुबईतील सेवा बंद करण्यात आल्या आहेत.