भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतीच ANI या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी परराष्ट्र सेवा, त्याचप्रमाणे त्यावरून होणारं राजकारण, तसंच इंदिरा गांधी यांचा उल्लेख आपल्या उत्तरांच्या दरम्यान केला. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा माझ्या वडिलांना त्यांनी सचिव पदावरून हटवलं होतं आणि त्यांच्या जागी त्यांच्या कनिष्ट अधिकाऱ्याला हे पद दिलं होतं ही घटनाही एस. जयशंकर यांनी सांगितली. यानंतर ही चर्चा सुरू झाली की एस जयशंकर यांचे वडील के. सुब्रमण्यम नेमके कोण होते?
के सुब्रमण्यम कोण होते?
के सुब्रमण्यम हे एक IAS अधिकारी होते. त्यांचा जन्म तामिळनाडूतल्या के तिरुचिरापल्ली मध्ये झाला. मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर ते प्रशासकीय सेवेत आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार भारतातल्या प्रसिद्ध अशा रणनीतीकारांपैकी एक नाव हे के सुब्रमण्यम यांचं आहे. जियो पॉलिटिक्स हा त्यांचा आवडता विषय होता आणि त्यावर त्यांचा अभ्यासही होता. त्यामुळेच के सुब्रमण्यम हे अनेक पंतप्रधानांचे विश्वासू होते. के सुब्रमण्यम यांनी कारगील वॉर कमिटीचं नेतृत्व केलं होतं. त्याच प्रमाणे भारताची न्यूक्लिअर पॉलिसी बनवण्याचंही काम त्यांनी केलं होतं.
मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनीही केली होती प्रशंसा
के. सुब्रमण्यम यांच्या कामाचं कौतुक माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही केलं होतं. सुब्रमण्यम यांनी सरकारमध्ये असताना आणि त्यानंतर सनदी सेवेतून बाहेर पडल्यावरही खूप चांगलं काम केलं. भारताच्या सुरक्षा या क्षेत्रात त्यांनी खूप काम केलं होतं आणि त्यांचं या क्षेत्रातलं योगदानही मोठं होतं अशा शब्दात मनमोहन सिंह यांनी त्यांचं कौतुक केलं होतं.
पद्मभूषण देऊन गौरव
सुरक्षा क्षेत्राची माहिती असणारे सुब्रमण्यम हे IDSA म्हणजेच इंस्टिट्युट फॉर डिफेन्स स्टडीज अँड एनालिसिसचे फाऊंडिंग डायरेक्टर होते. या इंस्टिट्युटला आता मनोहर पर्रिकर यांचं नाव देण्यात आलं आहे.
१९९८ मध्ये भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या यांनी भारताचं अणू धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचं नाव NSCAB म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल अॅडव्हायजरी बोर्ड असं होतं. या सल्लागार समितीचे पहिले अध्यक्ष हे के सुब्रमण्यम होते. भारताला अण्वस्त्रांची गरज आहे असं सुब्रमण्यम यांना वाटत होतं. मात्र अशा प्रकारच्या अण्वस्त्र पहिल्यांदा भारताने वापरावं असं त्यांना वाटत नव्हतं.
कारगील वॉर कमिटी
के सुब्रमण्यम यांना १९९९ मध्ये कारगील वॉर कमिटीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही कमिटी पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यानंतर सरकारने स्थापन केली होती. या कमिटीने भारताच्या गुप्तचर सूचना यंत्रणेत अनेक बदल करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याच कमिटीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS हे पद असलं पाहिजे अशी सूचना केली होती. CDS हे पद २०१९ मध्ये तयार करण्यात आलं होतं. बिपिन रावत हे देशाचे पहिले CDS होते.
पद्मभूषण देऊन सुब्रमण्यम यांचा गौरव
भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या के. सुब्रमण्यम यांना १९९९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. सरकारी अधिकाऱ्यांनी असे पुरस्कार घेऊ नयेत या मताचे ते होते.
काय म्हटलं होतं जयशंकर यांनी
ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एस जयशंकर म्हणाले की माझ्या वडिलांना इंदिरा गांधी यांनी कॅबिनेट सचिव या पदावरून हटवलं. त्यानंतर एका कनिष्ट अधिकाऱ्याला ते पद दिलं. याशिवाय जयशंकर यांनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की विदेश सेवा ते राजकारण हा माझा प्रवास खूप चांगला आहे. मात्र मी पहिल्यापासूनच एक चांगला फॉरेन सर्विस अधिकारी व्हायचं हे स्वप्न पाहिलं होतं.
माझे वडीलही अधिकारी होते. ते जेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी झाले तेव्हा त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. जनता सरकार जेव्हा १९७९ ला आलं होतं त्या सरकारमधले ते सर्वात तरूण कॅबिनेट सेक्रेटरी माझे वडील होते. मात्र १९८० मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या पुन्हा पंतप्रधान झाल्या त्यावेळी त्यांनी माझ्या वडिलांना या पदावरून हटवलं. माझे वडील हे त्यांच्या तत्त्वांवर चालणारे होते. त्यांना जेव्हा या पदावरून हटवण्यात आलं त्यानंतर ते कधीही सेक्रेटरी झाले नाहीत. माझ्या वडिलांना जे कनिष्ट अधिकारी होते त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी हे पद देण्यात आलं. ही बाब माझ्या वडिलांना खटकली, त्यांच्या मनात ही सल कायमच राहिली. मात्र त्यांनी ही बाब कधी आमच्याकडे बोलून दाखवली नाही असंही जयशंकर यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.