इतिहासाची आवड अनेकांना असते. त्यातही भारतीय इतिहास हा जगात चर्चेचा विषय आहे. इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा इतिहास

भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ग्रँट डफ. ग्रँट डफ हे नाव मराठा इतिहासाशी जोडले गेले आहे. ग्रँट डफ यांना मराठेशाहीचा आद्य इतिहासकार मानले जाते. त्यामुळे टीका आणि महत्त्व असे दोन्ही त्यांच्या लेखणीला प्राप्त झाले आहे. ग्रँट डफ यांनी मराठा साम्राज्याचा अंत आपल्या डोळ्यांनी पाहिला, किंबहुना ते स्वतः त्या इतिहासाचा भाग होते. त्यांनी मराठा साम्राज्याच्या उगमापासून ते अंतापर्यंत सविस्तर इतिहासाची मांडणी केली आहे. अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असल्याने त्यांच्या लेखनाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?

इतिहासकार डफ

ग्रँट डफ यांचे संपूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहेम ग्रँट डफ असे होते. ते मूळचे स्कॉटलंडचे होते. त्यांचा जन्म ८ जुलै १७८९ रोजी स्कॉटलंडच्या बॅनफशायर येथे झाला. पेशाने सैनिक असले तरी त्यांची ख्याती जगभरात इतिहासकार म्हणूनच आहे.

प्रारंभिक जीवन आणि सैन्य सेवा

ग्रँट डफ याचा जन्म बॉन्फ तेथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या डफ घराण्यातील होती. तिच्या भावाच्या मृत्यूनंतर माहेरची संपत्ती ही तिच्या नावे झाली. त्यामुळे ग्रँट या नावापुढे डफ हे नाव जोडले गेले. जेम्स ग्रॅंट डफ यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी, इ.स. १७९९ मध्ये त्यांच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर जेम्स व त्यांच्या आईने उत्तर स्कॉटलंडमधील ॲबरडीन शहरात स्थलांतर केले. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण घेतले. पुढचे शिक्षण घेण्याकरिता मारिशल महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता. परंतु वयाच्या १६ व्या वर्षीच ग्रँट डफ यांनी शिक्षण सोडून १८०५ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी स्वीकारली. भारतात आल्यानंतर त्यांनी बॉम्बे प्रेसिडेंसीमध्ये आपली सेवा बजावली. २३ एप्रिल १८०७ रोजी लष्करातील प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी अधिकारपद मिळवले. लष्करात असताना सुरुवातीच्या काही मोहिमांनंतर १८१० मध्ये पुण्यात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचे मदतनीस म्हणून ते रूजू झाले. १८१७ मध्ये खडकीत झालेल्या मराठा विरुद्ध इंग्रज या लढाईत त्यांचा सहभाग होता. या लढाईत मराठे पराभूत झाले होते. यानंतर सातारच्या स्वतंत्र राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी एल्फिन्स्टनने जेम्स ग्रँट डफ यांची निवड केली. इ.स. १८१८ ते १८२२ अशी चार वर्षे डफ साताऱ्यात होते.

सातारा रेसिडेंट

१८१८ साली, जेम्स ग्रँट डफ यांची नियुक्ती सातारा संस्थानात रेसिडेंट म्हणून झाली होती. त्यावेळी, सातारा संस्थान मराठा साम्राज्याचा एक प्रमुख भाग होते. रेसिडेंट म्हणून त्यांचे काम मराठा शासक आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संबंध व्यवस्थापित करणे हे होते. या भूमिकेमुळे त्यांना मराठा साम्राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाची सखोल माहिती मिळाली. या कालखंडात डफ यांनी छत्रपतींच्या दप्तरखान्यातील कागदपत्रांचा अभ्यास केला. यानंतर मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा आपला मानस त्यांनी एल्फिन्स्टनकडे व्यक्त केला. त्यांनीही या कल्पनेचे स्वागतच केले. १८२२ साली सातारा सोडताना त्यांच्याकडे मराठ्यांच्या इतिहासाचा कच्चा आराखडा तयार झाला होता. इंग्लंडमध्ये परत गेल्यावर १८२३ ते १८२६ अशा तीन वर्षांच्या कालखंडात त्यांनी पुस्तकाची मुद्रणप्रत तयार केली. १८२६ साली लाँगमन अ‍ॅण्ड कंपनीने ते पुस्तक प्रसिद्ध केले.

ऐतिहासिक कार्य

जेम्स ग्रँट डफ यांचे “अ हिस्टरी ऑफ द मर्हट्टाज” हे पुस्तक तीन खंडांमध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडला. या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या उदय, प्रशासन, लढाया, आणि प्रमुख व्यक्तींच्या कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ग्रँट डफ यांनी मराठा साम्राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यांनी पेशवे, शिंदे, होळकर, भोसले, आणि गायकवाड यांसारख्या प्रमुख मराठा घराण्यांची माहिती दिली आहे. या ग्रंथाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. पुढे कॅप्टन डेव्हिड केपेन आणि बाबा साने यांनी ‘मराठ्यांची बखर’ या शीर्षकाखाली या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले.

अधिक वाचा: फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?

मराठा साम्राज्याच्या युद्धांचे वर्णन

ग्रँट डफ यांनी त्यांच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या विविध लढायांचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांनी मराठा साम्राज्याच्या अफगाण, निजाम, आणि ब्रिटीश सैन्याशी झालेल्या संघर्षांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांनी विशेषतः पानिपतची तिसरी लढाई (१७६१) आणि मराठा साम्राज्याचे पतन या घटनांचे विश्लेषण केले आहे. याशिवाय त्यांनी पेशवे या व्यवस्थेची रचना, शासकीय धोरणे, महसूल व्यवस्था, आणि न्यायव्यवस्थेचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांनी मराठा समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती दिली आहे. मराठी समाजातील स्त्री-पुरुष संबंध, जातीय व्यवस्था, आणि धार्मिक प्रथा यांचा अभ्यास केला आहे. ग्रँट डफ यांचे “अ हिस्टरी ऑफ द मर्हट्टाज” हे पुस्तक मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. हे पुस्तक मराठा साम्राज्याच्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक जीवनाविषयी विस्तृत माहिती देते.

इतिहासाला नवी दिशा

हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर दीर्घ काळापर्यंत या ग्रंथाची फारशी दखल घेतली गेली नाही. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी आपल्या लेखातून ग्रँट यांच्या इतिहासातील अनेक उणिवा दाखवून दिल्या. इतरही अभ्यासकांनी ग्रँट यांच्या लेखनपद्धतीवर तसेच इतिहास मांडणीवर टीका केली आहे. परंतु ग्रँट डफ यांचे कार्य मराठा साम्राज्याच्या इतिहासाला उजाळा देणारे आणि त्याच्या विविध पैलूंवर सखोल प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्या लेखनामुळे मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक अभ्यासाला नवीन दिशा मिळाली आहे. त्यांनी भारतीय इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांचे हे योगदान कोणीही नाकारले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James cunninghame grant duff a history of the mahrattas who exactly was this british officer who wrote the history of the marathas svs
Show comments