Fashion show in Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे आयोजित करण्यात आलेला एक फॅशन शो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या फॅशन शोवरून फुटीरतावादी नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. काश्मीर येथील मुख्य धर्मगुरू मिरवाईज उमर फारूक यांनी हा कार्यक्रम अपमानजनक आणि अश्लील असल्याचं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांकडून २४ तासांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. या फॅशन शोचे पडसाद सोमवारी (१० मार्च) राज्याच्या विधानसभेतही उमटले आहेत. दरम्यान, हा फॅशन शो इतका चर्चेत का आला? त्यावरून राज्यात वाद का निर्माण झाला? अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं? याबाबत जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन शो इतका चर्चेत का आला?

७ मार्च २०२५ रोजी, आघाडीचे डिझायनर शिवान भाटिया आणि नरेश कुकरेजा यांनी गुलमर्गमधील एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये त्यांच्या लक्झरी ब्रँडचा १५ वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी कलात्मकपणे छापलेल्या डिझायनर कपड्यांच्या सादरीकरणासाठी बर्फाळ प्रदेशात एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. या शोमध्ये अनेक तरुणी बर्फावर रॅम्पवॉक करताना दिसून आल्या. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. रमजानच्या महिन्यात सरकारने अशा कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी कशी दिली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

आणखी वाचा : कुलभूषण जाधव यांचं अपहरण करणारा मुफ्ती शाह मीर कोण होता? त्याची हत्या कुणी केली?

‘काश्मीरमध्ये अश्लीलता खपवून घेतली जाणार’

काश्मीर येथील मुख्य धर्मगुरू आणि फुटीरतावादी नेते मिरवाईज उमर फारूक हा फॅशन शो अपमानजनक आणि अश्लील असल्याची टीका केली. “अतिशय भयानक! रमजानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये एक अश्लील फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे काश्मीरी खोऱ्यात राहणाऱ्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सूफी, संत संस्कृती आणि लोकांच्या धार्मिक दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या खोऱ्यात हे कसे सहन केले जाऊ शकते? संबंधितांना तत्काळ जबाबदार धरले पाहिजे. पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली अशा प्रकारची अश्लीलता काश्मीरमध्ये खपवून घेतली जाणार नाही”, अशी पोस्ट फारूक यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली.

‘सरकार जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही’

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही या कार्यक्रमावर टीका केली. “रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारची घटना अश्लील प्रकारात रूपांतरित होणे धक्कादायक आहे. या कार्यक्रमांद्वारे खाजगी हॉटेल व्यावसायिकांना अशा अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याची परवानगी देणे निंदनीय आहे, जे आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. सरकार याला वैयक्तिक बाब म्हणत जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही”, असं पीपीडी प्रमुख म्हणाल्या. त्यांच्याशिवाय राज्यातील विरोधीपक्षाच्या इतर नेत्यांनीही सरकारला लक्ष्य केलं.

ओमर अब्दुल्लांनी दिले चौकशीचे आदेश

सरकारवरील वाढत्या टीकेमुळे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, “मी पाहिलेल्या फोटोंमधे दिसून येते की यामध्ये संवेदनशिलतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि तेही या पवित्र महिन्यात (रमजान)…. माझे कार्यालय स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे आणि मी त्यांना पुढील २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालावरून योग्य ती कारवाई केली जाईल.”

अश्लील फॅशन शोवरून विधानसभेत गोंधळ

गुलमर्ग येथील फॅशन शोचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले. नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या नेत्यांसह पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने या वादग्रस्त फॅशन शोबद्दल चिंता व्यक्त केली. याशिवाय दोन अपक्ष आमदारांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं. ‘अश्लील फॅशन शो’मुळे खोऱ्यातील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला. रमजानच्या पवित्र महिन्यात अशा कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आमदारांनी विधानसभेत केली.

हेही वाचा : Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाचे सैनिक पाईपलाईनमध्ये?

‘रमजान सोडा, कोणत्याही महिन्यात हे होऊ नये’

दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की या कार्यक्रमाच्या आयोजनात सरकारची कसलीही भूमिका नाही. ती एक प्रायव्हेट पार्टी होती. त्यांनी कार्यक्रम खाजगी पद्धतीने खाजगी हॉटेलमध्ये आयोजित केला होता आणि त्यांनी खाजगी पद्धतीनेच त्याच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या. रमजानच्या पवित्र महिन्यात हे व्हायला नको होते असं काहींचं म्हणणं आहे, पण मला वाटते की रमजान सोडा, वर्षातील इतरही कोणत्या महिन्यात असा प्रकार होता कामा नये”

कार्यक्रमाच्या आयोजकांनी मागितली माफी

या वादानंतर फॅशन शोचे आयोजक शिवान आणि नरेश यांनी जाहीरपणे माफीही मागितली आहे. “गुलमर्गमधील आमच्या कार्यक्रमाचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. रमजानच्या पवित्र महिन्यात आमच्या कार्यक्रमामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर आम्ही त्याबद्दल माफी मागतो. आमचा एकमेव हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्याशिवाय स्की आणि अ‍ॅप्रेस-स्की जीवनशैली साजरी करणे हा होता. आम्ही सर्व संस्कृती आणि परंपरांचा मनापासून आदर करतो आणि उपस्थित केलेल्या चिंता आम्ही स्वीकारतो. अनवधानाने झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत”, असं शिवान आणि नरेश यांनी म्हटलं आहे.