जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. येथे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या दोन्ही प्रदेशांना जोडणाऱ्या झोजिला या बोगद्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी तब्बल ४ हजार ६०० कोटी रुपयांचा अर्च अपेक्षित आहे. या बोगद्यामुळे येथे दळणवळण सोपे आणि सुकर होणार आहे. सोबतच बोगद्याच्या माध्यमातून हा भाग उर्वरित भारतासोबत कायमचा जोडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर झोजिला बोगदा नेमका कोठे आहे? त्याची कोणत्या मार्गावर निर्मिती केली जात आहे? त्याचे प्रादेशिक, लष्करी महत्त्व काय आहे? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोजिला बोगद्याचे ३८ टक्के काम पूर्ण झाले

जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागातील दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी येथे सध्या एकूण १९ बोगद्यांचे काम सुरू आहे. या बोगद्यांसाठी एकूण २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती झोजिला या बोगद्याची. या बोगद्याचे ३८ टक्के काम झाले असून संपूर्ण काम झाल्यानंतर हा भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखला जाणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या बोगद्याला भेट दिली आहे. या वेळी त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसेच रस्ते आणि महामार्ग विकास संसदीय सल्लागार समितीतील सदस्यही होते. या वेळी त्यांनी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

हेही वाचा >> विश्लेषण: अँग्लोमॅनिया विरुद्ध इटालियन भाषा ? भाषा शुद्धीवरून वाद का?

झोजिला बोगदा नेमका काय आहे?

झोजिला हा भारतातील सर्वांत लांब बोगदा असेल. सोनमर्ग आणि कारगिल या दरम्यान झोजिला पर्वतामध्ये हा बोगदा तयार करण्यात येत आहे. त्याची एकूण लांबी १४.१५ किलोमीटर आहे. या बोगद्यामुळे झेड-मोरह ते झोजिला या भागातील एकूण १८.४७५ किमी रस्त्याचा विस्तार आणि विकास होणार आहे. या मार्गावर दोन ट्विन-टनेल, एकूण पाच पूल, दोन स्नो-गॅलरीज असतील.

झोजिला बोगद्याचे महत्त्व काय आहे?

श्रीनगरहून लेह येथे जायचे असल्यास सध्या एकूण १० तास लागतात. विशेष म्हणजे लेह येथे जाण्यासाठीचा मार्ग अत्यंत दुर्गम आहे. लेहकडे जाताना झोजिला पर्वतामधून जावे लागते. हिवाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद असतो. हिमस्खलन, भूस्खलनाच्या भीतीमुळे हा मार्ग बंद करण्यात येतो. त्यामुळे साधारण पाच महिन्यांसाठी झोजिला पर्वताच्या पलीकडच्या भागाचा भारताशी संपर्क तुटतो. या भागात जायचे असेल तर हवाई मार्ग हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. या काळात विमान तिकीट दरही चांगलेच वाढतात. हा दर चक्क ४० हजार रुपयांपर्यंत वाढतो. झोजिला बोगद्यामुळे लडाख आणि उर्वरित भारत एमेकांशी कायमस्वरूपी जोडला जाईल. याचा फायदा या भगातील नागरिक, व्यावसायिक तसेच कर्मचाऱ्यांना होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या बोगद्याचा लष्करालाही खूप फायदा होणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून सैनिक, इतर लष्करी सामानाची वाहतूक सोपी होणार आहे.

हेही वाचा >> अदाणींच्या ‘जेपीसी’ चौकशीवरून विरोधकांमध्येच पडली फूट; JPC म्हणजे नेमके काय?

या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ किती वाचणार आहे ?

झोजिला बोगद्यामुळे लडाखमधील दळणवळण सोपे होणार आहे. यासोबतच या बोगद्यामुळे काश्मीर-लडाख प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. सध्या बालटाल-मीनामार्ग प्रवासाचे अंतर ४० किलोमीटर आहे. हेच अंतर झोजिला बोगद्यामुळे १३ किमीने कमी होईल. यामुळे प्रवाशांचा साधारण दीड तास वाचणार आहे. यासह हा प्रवास आणखी सुखकर आणि सोपा होणार आहे. झोजिला पर्वतादरम्यानच्या रस्त्यामुळे अनेक अपघात होतात. हा बोगदा पूर्ण झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. बोगद्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या विकासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली आहे. “धोरणात्मकदृष्ट्या विचार केल्यास हा बोगदा खूप महत्त्वाचा आहे. झोजिला बोगद्यामुळे या भागाचा विकास होणार आहे. परिणामी येथील स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. बोगद्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत,” असे गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir ladakh zojila tunnel detailed information prd
Show comments