मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हा वाद मिटलेला असतानाच आता जम्मू-काश्मीरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनींना ‘अबाया’ वस्त्र परिधान करण्यास शाळेच्या प्रशासनाकडून विरोध केला जात असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओंमध्ये विद्यार्थिनी आम्हाला शाळेतील प्राचार्य अबाया परिधान करण्यास मनाई करीत आहेत, असे सांगताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हा मुद्दा जम्मू-काश्मीरमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे तेथील प्रादेशिक राजकीय पक्षांनीदेखील यावर आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील अबाया प्रकरण नेमके काय आहे? हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने काय भूमिका घेतली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
आम्हाला सुरक्षारक्षकाने अडवले- विद्यार्थिनी
श्रीनगरमधील विश्वभारती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ८ जून रोजी आंदोलन केले. आम्हाला शाळेच्या प्रशासनाकडून अबाया काढण्यास सांगितले जात आहे. आंदोलक विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनींना बुधवारी (७ जून) अबाया काढण्याचे सांगितले आले. तसेच अबाया परिधान न करता शाळेत यावे, असे निर्देश देण्यात आले. “मी गुरुवारी शाळेत जात होते. मात्र मला सुरक्षारक्षकाने बाहेरच अडवले. मला शाळेत जाऊ दिले नाही. अबाया परिधान करायचा असेल तर तुम्ही दर्सहागमध्ये जावे, असे मला सुरक्षारक्षक सांगत होता. त्यानंतर अबाया परिधान न केल्यास आम्हाला आरामदायक वाटत नाही, असे विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाला सांगितले. मात्र शाळेच्या प्रशासनाने ऐकलेले नाही, असा दावा विद्यार्थिनी करीत आहेत.
हेही वाचा >> पोक्सो कायद्यानुसार अश्लीलता आणि लैंगिकता म्हणजे काय? केरळ कोर्टाने दिलेल्या निर्णयाची चर्चा; जाणून घ्या…
अबाया शिक्षण घेण्यात अडथळा कसा ठरू शकतो? विद्यार्थिनींचा सवाल
यासह अबाया परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींशी शाळेत भेदभाव केला जात आहे. आम्ही अबाया परिधान करू नये, असे आम्हाला शाळेचे प्राचार्य सांगत आहेत. मात्र अबाया शिक्षण घेण्यास अडथळा कसा ठरू शकतो. आम्हाला शाळेत सर्वाधिक गुण आहेत. आम्हाला शांततेत अभ्यास करायचा आहे, असे अबाया परिधान करणाऱ्या एका विद्यार्थिनीने ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.
आम्हाला शाळेत प्रवेश का नाकारला जात आहे? विद्यार्थिनींचा सवाल
शाळेत अगोदर कोणताही गणवेश परिधान करण्याची सक्ती नव्हती, असे या विद्यार्थिंनींनी सांगितले आहे. तसेच अबाया परिधान करण्यास विरोध का केला जात आहे? असा जाबही विद्यार्थिनींनी प्राचार्यांना विचारला होता. याबाबत बोलताना “परदेशात विद्यार्थिनी विद्यापीठात हिजाब परिधान करतात. आम्हाला भारतीय संविधानाने काय परिधान करावे आणि काय परिधान करू नये, याची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कोणत्या नियमांच्या आधारे आम्हाला शाळेत प्रवेश नाकारला जात आहे?” असा सवाल विद्यार्थिनीने ‘द वायर’शी बोलताना केला.
हेही वाचा >> विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ?
अबायावर बंदी घातली नाही, शाळा प्रशासनाचा दावा
‘द वायर’ने दिलेल्या वृत्ताप्रमाणे विश्वभारती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य निमरोज शाफी यांनी अगोदर प्रशासनाने विद्यार्थिनींना अबाया परिधान न करता शाळेत येण्याचे आवाहन केल्याचे मान्य केले होते. मात्र पुढे त्यांनी आपल्या लेखी निवेदनात विद्यार्थिनी करीत असलेला दावा चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे, असे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थिनींना पांढऱ्या रंगाचा हिजाब परिधान करून येण्याचे सांगितले होते, असेही या प्राचार्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले होते.
विद्यार्थिनींना अबाया परिधान करण्यास कोणीही मनाई केलेली नाही- प्राचार्या
“काही विद्यार्थिनी वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळी डिझाइन असलेले अबाया परिधान करून येत होत्या. शालेय गणवेशात हिजाबचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थिनींनी हा गणवेश परिधान करून येणे अपेक्षित आहे. मी त्यांना एकूण तीन पर्याय दिले होते. विद्यार्थिनींना अबाया परिधान करण्यास कोणीही मनाई केलेली नाही. त्यांना हिजाब किंवा डोक्यावर स्कार्फ परिधान करण्यास सांगितले जात होते,” असे प्राचार्यांनी ‘द वायर’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?
या प्रकरणात शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश नाही- प्राचार्य
या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर काही दहशतवादी गटांनी शाळेच्या प्राचार्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी (८ जून) प्राचार्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. “आम्ही विद्यार्थिनींना अबाया परिधान करण्यास मनाई केल्याचे समाजमाध्यमांवर सांगितले जात आहे. मात्र हे पूर्णपणे खोटे आणि तथ्यहीन आहे. समाजातील प्रत्येक वर्गाच्या भावनेचा शालेय प्रशासन आदर करते. अबाया परिधान करण्यास शालेय प्रशासन तसेच प्राचार्यांनी बंदी घातलेली नाही. मात्र अबायासोबत शाळेचा गणवेशही परिधान करावा, असे आम्ही नम्रपणे विद्यार्थिनींना सांगितले आहे. या प्रकरणात शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग नाही,” असे प्राचार्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टीकरण दिले आहे.
अबायाबाबतचा नियम लवकरच सांगू- प्राचार्य
यासह ज्या विद्यार्थिनींना अबाया परिधान करायचा आहे, त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे सांगू, असेही प्राचार्यांनी सांगितले आहे. “सर्वांनीच योग्य तो गणवेश परिधान करायला हवा, असे मला वाटते. त्यामुळे आम्ही अबायाचा रंग आणि डिझाइन कशी असावी, याबाबतचा नियम लवकरच सांगणार आहोत,” असेही प्राचार्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >> विश्लेषण : ई-वाहने स्थित्यंतर घडवणार का?
वेगवेगळ्या पक्षांनी स्पष्ट केली भूमिका
या प्रकरणावर राजकीय पक्षांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी शाळेच्या भूमिकेवर टीका केली आहे. “गणवेशाची सक्ती करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना जे परिधान करायचे आहे, ते परिधान करू द्यावे. भाजपाने कर्नाटकमध्ये हा प्रकार सुरू केला होता. आता हाच डाव ते जम्मू-काश्मीरमध्ये खेळू पाहात आहेत. हे एका खास समुदायाविरोधात युद्ध छेडण्यासारखेच आहे,” असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. तसेच जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तन्वीर सादिक यांनीदेखील शाळेच्या भूमिकेवर टीका केली आहे. शाळेत हिजाब परिधान करावे की नाही, हा अधिकार फक्त विद्यार्थांनाच असावा. मुस्लीम समाजाचे प्रमाण लक्षणीय असणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमध्ये असे प्रकार समोर येणे हे दुर्दैवी आहे. आम्ही या प्रकाराचा कडाडून विरोध करतो. तसेच याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करतो,” असे सादिक आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
भाजपाची भूमिका काय?
भाजपानेदेखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे युवा नेते मंजूर भट यांनीदेखील विद्यार्थिनींची बाजू घेतली आहे. “विद्यार्थिनी धार्मिक कारणामुळे गणवेशावर अबाया परिधान करीत असतील तर त्यांना विरोध करू नये. प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. अबायावर बंदी घालण्यासंदर्भात कोणतीही नोटीस विद्यालयाकडून जारी करण्यात आलेली नाही,” असे मंजूर भट म्हणाले आहेत. ‘जम्मू आणि काश्मीर वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते दरख्शां अंद्राबी यांनी मात्र शाळेला गणवेश असणे खूप गरजेचे आहे, गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानता निर्माण होते, असे मत व्यक्त केले आहे.