हिंसक चाकू हल्ले वाढल्यामुळे जपानने रेल्वेमधील सार्वजनिक सुरक्षितता वाढविण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे, ज्याने जगाचे लक्ष वेधले आहे. जपान रेल्वे गाड्यांमध्ये चाकू प्रतिरोधक छत्र्या बसवत आहे. चाकू हल्ल्यातून प्रवाशांची सुरक्षा व्हावी, यासाठी हजारोंच्या संख्येने छत्र्या तयार करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जपानमधील ६०० हून अधिक गाड्यांमध्ये या छत्र्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रवासी या छत्र्यांचा ढाल म्हणून वापर करू शकणार आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये या छत्र्या बसवण्यामागील नेमका उद्देश काय? जपानमधील रेल्वे गाड्यांमध्ये चाकू हल्ले का वाढत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
प्रवाश्यांच्या सुरक्षिततेचा उपाय
वेस्ट जपान रेल्वे कंपनीला जेआर वेस्ट म्हणून ओळखले जाते. कंपनीच्या ओसाका मुख्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नवीन सुरक्षा उपकरणांचे अनावरण करण्यात आले. ‘द स्ट्रेट टाईम्स’च्या मते, या छत्र्यांची लांबी सुमारे एक मीटर आहे आणि पूर्ण उघडल्यानंतर त्यांचा व्यास १.१ मीटर आहे. हल्ला झाल्यास, त्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी विशेष साहित्य वापरून ही छत्री तयार करण्यात आली आहे. ही छत्री सामान्य छत्रीपेक्षा २० सेंटीमीटरपेक्षा अधिक विस्तारू शकते; ज्यामुळे वापरकर्त्यांना स्वतःमध्ये आणि हल्लेखोरामध्ये अंतर निर्माण करता येते. जेआर वेस्टच्या एका अधिकाऱ्याने जपानी दैनिक मैनिचीला सांगितले, “आम्ही आतापर्यंत वापरलेल्या संरक्षणात्मक ढाल जड आणि जवळच्या वापरासाठी होत्या, परंतु आम्ही आता महिला कर्मचाऱ्यांना हाताळता येतील अशा हलक्या छत्र्या विकसित केल्या आहेत.”
हेही वाचा : पेरूचं अस्वल झालं ब्रिटिश नागरिक; अनोख्या पाहुण्याला का दिला पासपोर्ट?
फक्त ७०० ग्राम वजनाच्या या छत्र्या पारंपरिक ढाल किंवा इतर संरक्षणात्मक साधनांपेक्षा लक्षणीयपणे हलक्या आहेत. त्यांच्या कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे या छत्र्यांना रेल्वे कॅरेजच्या मर्यादित जागेत ठेवणे सोयीस्कर होते. शिवाय, या छत्र्यांवर जाळीदार फॅब्रिकही लावण्यात आले आहे; ज्यामुळे वापरकर्त्याला सुरक्षित राहून हल्लेखोराला पाहता येते, असे ‘द स्ट्रेट टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. जेआर वेस्टचे अध्यक्ष काझुआकी हसेगावा यांनी छत्र्यांच्या वैशिष्ट्यांवर भर दिला, “छत्र्या ट्रेन कॅरेजमध्ये ठेवता येतात आणि टिकाऊ असतात. आणीबाणीच्या परिस्थितीत, रेल्वे क्रूने त्वरीत प्रतिसाद द्यावा आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी आमची इच्छा आहे, ” असे ते म्हणाले.
नोव्हेंबरपासून, जेआर वेस्टने ओसाका आणि क्योटोचा समावेश असलेल्या कानसाई प्रदेशातील मार्गांवर धावणाऱ्या ६०० ट्रेनमध्ये यापैकी १,२०० छत्र्या बसवण्याची योजना आखली आहे. प्रत्येक रेल्वे गाडीत क्रू केबिनमध्ये दोन छत्र्या ठेवल्या जातील. “पुढील वर्षीच्या ओसाका-कन्साई एक्स्पोपूर्वी आमच्या प्रवाशांची सुरक्षा सुधारण्यासाठी आम्ही अतिरिक्त प्रयत्न करू,” असे जेआर वेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. याआधी रेल्वे गाड्यांमध्ये हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी हातमोज्यांसारखी संरक्षक उपकरणे ठेवली होती, परंतु त्यानंतर वापरण्यास सोयीस्कर असलेल्या छत्री विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
जपानमधील वाढते चाकू हल्ले
जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत जपानमध्ये चाकू हल्ले वाढल्याचे चित्र आहे. जुलै २०२३ मध्ये ओसाका येथील कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या जेआर वेस्ट ट्रेनमध्ये एका व्यक्तीने चाकू हल्ला केला होता, ज्यात १५० प्रवाशांपैकी तीन जण जखमी झाले होते. त्यात हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचाही समावेश आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये, २६ वर्षीय क्योटा हट्टोरी टोकियोने ट्रेनमध्ये चाकू हल्ला केला. जोकर, बॅटमॅन चित्रपटातील खलनायकाच्या वेषात येऊन त्याने हा हल्ला केला होता; ज्यात १० जण जखमी झाले होते. त्यानंतर त्याला खून आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल २३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
हेही वाचा : कोकेन पिझ्झा तुम्हाला माहितेय का? काय आहे नेमकं प्रकरण? का झाली कारवाई?
हट्टोरी याने केलेल्या हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वी टोकियोमधील ओडाक्यु लाइनवर अशीच एक घटना घडली, जिथे युसुके त्सुशिमा या व्यक्तीने चाकू हल्ला करून १० लोकांना जखमी केले. त्सुशिमाने सांगितले की, आपण एकटे असल्याने आणि कोणी मित्र-मैत्रीण सापडत नसल्याने हा हल्ला केला. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या मते, गेल्या काही वर्षांत जपानमध्ये भीषण चाकू हल्ले झाले आहेत. २०१६ मध्ये सतोशी उमात्सु नावाच्या व्यक्तीने जपानच्या इतिहासातील सर्वात भयंकर सामूहिक चाकू हल्ला केला होता; ज्यामध्ये सागामिहारा शहरातील मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी असलेल्या देखभाल सुविधेत १९ जणांचा मृत्यू झाला होता आणि २६ जण जखमी झाले होते. २००८ मध्ये टोकियोच्या अकिहाबारा जिल्ह्यात एका व्यक्तीने पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला, ज्यात सात लोकांचा मृत्यू झाला. बिनधास्त चाकूहल्ल्यांच्या वाढीमुळे अधिकाऱ्यांना लोकांच्या संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे भाग पडले आहे; ज्यात रेल्वे गाडीत चाकू प्रतिरोधक छत्र्या बसवण्याचादेखील समावेश आहे.