म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवले आहे. मात्र, आता जपानलादेखील महाभूकंपाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या महाभूकंपामुळे जपानमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. जपान सरकारच्या एका नवीन अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, जपानच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळील नानकाई ट्रफमध्ये शक्तिशाली भूकंपामुळे १.८१ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

म्यानमारमध्ये झालेल्या ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर हा अहवाल समोर आला आहे. म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपात आतापर्यंत दोन हजार लोकांनी जीव गमावला आहे. मंडालेच्या विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे आणि देशाच्या मध्यवर्ती भागातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. २०२४ मध्ये दक्षिण जपानमध्ये ७.१ तीव्रतेच्या भूकंपात १४ लोक जखमी झाले होते. जपानच्या अहवालातून काय माहिती समोर आली? काय आहे नानकाई ट्रफ? हा प्रदेश भूकंप काळात असुरक्षित का आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

जपान सरकारच्या अहवालात काय?

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका सरकारी अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर लवकरच होणाऱ्या महाभूकंपाच्या दुर्घटनेत तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या भूकंपामुळे विनाशकारी स्वरूपाची त्सुनामी येऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अशा भूकंपामुळे १.८१ ट्रिलियन डॉलर्सपर्यंतचे आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. हा आकडा २७०.३ ट्रिलियन येन इतका आहे. हे नुकसान जपानच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) जवळजवळ अर्धे आहे.

महाभूकंपामुळे जपानमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो आणि विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

जपान सरकारच्या अहवालात म्हटले आहे की, सर्वांत वाईट परिस्थितीत ९ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे १.२३ दशलक्ष लोकांना स्थलांतर करावे लागू शकते. ही संख्या जपानच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. जर हिवाळ्यात रात्री उशिरा हा भूकंप झाला, तर त्सुनामी आणि इमारती कोसळल्याने २,९८,००० लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. गेल्या वर्षी जपानने आपला या संदर्भात पहिलाच सरकारी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, नानकाई ट्रफमध्ये ९ रिश्टर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे.

हा महाभूकंप किती विध्वंसक असू शकतो?

२०१३ मध्ये जपानच्या सरकारी आपत्ती निवारण पथकाने इशारा दिला होता की, नानकाई ट्रफमध्ये ९.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे काही मिनिटांत १० मीटर (३३ फूट)पेक्षा जास्त उंचीची त्सुनामी येऊ शकते. अशा घटनेमुळे जपानच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळील ३,२३,००० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच, २० लाखांपेक्षा अधिक इमारती नष्ट होऊ शकतात आणि २२० ट्रिलियन येन म्हणजेच १.५ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आर्थिक नुकसान होऊ शकते.

नानकाई ट्रफ म्हणजे काय?

जपान हा जगातील सर्वांत जास्त भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. नानकाई ट्रफ हा भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय समुद्रतळ आहे. जपान सरकारचा अंदाज आहे की, नानकाई ट्रफवर ८ ते ९ तीव्रतेचा भूकंप होण्याची ८० टक्के शक्यता आहे. नानकाई ट्रफ हा जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) पसरलेला एक समुद्राखालील खंदक (ट्रेंच) आहे. जपान हवामान संस्थेच्या मते, फिलिपिन्स सागरी प्लेट या प्रदेशातील युरेशियन प्लेटवर दबाव आणते, ज्यामुळे कधी कधी युरेशियन प्लेट मागे सरकते. याच हालचालीमुळे महाभूकंप आणि त्सुनामीचा धोका उद्भवतो.

१९४६ मध्ये शिकोकू येथे नानकाई ट्रफ भूकंपाची तीव्रता ८.० होती. त्या भूकंपामध्ये १,३०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते. जपानने पुढील ३० वर्षांत या भागात ८ ते ९ रिश्टर स्केलचा भूकंप होण्याची शक्यता ७०-८० टक्के असल्याचे भाकीत केले होते. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस)ने नोंदवले आहे की, आतापर्यंतचा सर्वांत शक्तिशाली भूकंप २२ मे १९६० रोजी चिलीमध्ये झाला होता. त्याची तीव्रता ९.५ रिश्टर स्केल होती. हा भूकंप जवळजवळ १,६०० किलोमीटर (१,००० मैल) लांबीच्या फॉल्टवर झाला होता.

नानकाई ट्रफ धोकादायक असण्याचे कारण काय?

नानकाई ट्रफ ईशान्येकडील शिझुओका प्रांतातील सुरुगा खाडीपासून नैर्ऋत्येकडील ह्युगानाडा समुद्रापर्यंत पसरलेला आहे. याच भागात युरेशियन प्लेट आणि फिलीपीन सी प्लेट प्लेट्समध्ये हालचाल होत असताना त्या अडकतात. दरम्यान, प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ही ऊर्जा त्या प्लेट्स एकमेकांपासून मुक्त झाल्यावर सोडली जाते, ज्यामुळे कदाचित मोठे भूकंप होऊ शकतात. नानकाई ट्रफमध्ये शतकानुशतके टेक्टोनिक स्ट्रेनमुळे एक मोठा धोका निर्माण केला आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, नानकाई ट्रफमध्ये सरासरी दर १०० ते १५० वर्षांनी मोठे भूकंप झाले आहेत.

तोहोकू व क्योटो या विद्यापीठांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, या प्रदेशात सातहून अधिक रिश्तर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप आठवड्यातून १०० ते ३,६०० वेळा पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता वाढवतो. जपान हवामानशास्त्र संस्थेने गेल्या वर्षी सल्लागार अहवाल जारी केला होता. त्यात अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेने नानकाई ट्रफ भूकंपाचा धोका असलेल्या ७०७ नगरपालिकांना या संकटासाठी तयार राहण्याकरिता योग्य योजनांचा आढावा घेण्यास सांगितले होते. तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे, त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू ठेवण्याचे आणि अन्न, पाणी सुरक्षित ठेवण्याचे व कुटुंबातील सदस्यांसह निर्वासन योजनांवर चर्चा करण्याचे व आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. काही भागांत शहरांतील समुद्रकिनारेही बंद करण्यात आले आहेत.

जपानमध्ये भूकंप होण्याची शक्यता जास्त का?

जपानमध्ये वारंवार भूकंप होत असल्याच्या बातम्या येत असतात. मार्च २०११ मधील भूकंपाने जगाला हादरवले होते. ९.० तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीमुळे मोठे संकट निर्माण झाले होते. या भूकंपामुळे १९८६ मध्ये चेर्नोबिलनंतरची सर्वांत मोठी अणू आपत्ती निर्माण झाली होती. चार प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सच्या वर स्थित जपान हा जगातील सर्वांत भूकंपीय सक्रिय प्रदेशांपैकी एक आहे. इबाराकी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजी अँड अर्थक्वेक इंजिनियरिंगमधील भूकंप शास्त्रज्ञ सायको किता यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, जपान आणि त्याच्या जवळपासच्या भागांत जगातील १८ टक्के भूकंप होतात. त्याचे कारण म्हणजे या प्रदेशात सक्रिय टेक्टोनिक प्लेट्स आहेत. दरवर्षी जपानमध्ये सुमारे १,५०० भूकंप येतात. हे भूकंप लोकांना जाणवतील इतके तीव्र असतात.