भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणामुळे त्याला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तो या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी तशी माहिती दिलेली आहे. दरम्यान, बुमरा हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय क्रिकेट संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बुमरा संघात नसल्यामुळे भारतीय संघ यावेळी टी-२० विश्वचषक जिंकणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर बुमरा संघात असल्यानंतर टीम इंडियाने कशी कामगिरी केलेली आहे आणि तो संघात नसल्यावर भारतीय संघ तसेच इतर गोलंदाजांनी कसा खेळ केलेला आहे, यावर एक नजर टाकुया.
हेही वाचा >>> विश्लेषण : मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडणारा, फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला हालँड कोण आहे?
जसप्रित बुमरा हा सामन्याच्या कोणत्याही टप्प्यात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर, तसेच डेथ ओव्हरमध्ये त्याने उत्तम गोलंदाजी करत विरोधी संघातील फलंदाजांना जेरीस आणलेले आहे. तसे आकडेही समोर आहेत. इतर गोलंदाजांच्या तुलनेत बुमराचा इकोनॉमी रेट चांगला आहे.
भारतीय गोलंदाजांचा इकोनॉमी रेट
गोलंदाज | पॉवरप्ले इकोनॉमी रेट | मिडल ओव्हर इकोनॉमी रेट | डेथ ओव्हर इकोनॉमी रेट |
जसप्रित बुमरा | ५.५७ | ५.८ | ८.१५ |
भुवनेश्वर कुमार | ५.८१ | ७.२१ | १०.०३ |
अर्शदीप सिंग | ६.६५ | ८.७५ | १८ |
आवेश खान | ७.७५ | ८.६६ | ८.५३ |
मोहोम्मद शामी | ८ | ११.४२ | ९.६२ |
दीपक चहर | ८.३८ | ९.०७ | ११.०४ |
हर्षल पटेल | ८.०२ | ८.०२ | ११.०७ |
हेही वाचा >>> विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?
बुमरा संघात असणे ही भारतासाठी जमेची बाजू असते. मात्र बुमरा संघात असतो तेव्हा भारताचे इतर गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसतात. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून ते स्पष्ट होते. बुमरा संघात असताना तसेच तो संघात नसताना इतर गोलंदाजांच्या इकोनॉमी रेटमध्ये बराच फरक दिसून येतो.
बुमराह संघात असताना आणि नसताना इतर गोलंदाजांची कामगिरी
गोलंदाज | (इकोनॉमी रेट) बुमरा संघात असताना | (इकोनॉमी रेट) बुमरा संघात नसताना |
आर. अश्विन | ६.१२ | ६.८१ |
कुलदीप यादव | ६.७७ | ७.०३ |
भुवनेश्वर कुमार | ६.८५ | ७.२५ |
रविंद्र जडेजा | ६.८७ | ७.०४ |
युझवेंद्र चहल | ७.९६ | ८.२३ |
हार्दिक पांड्या | ८.२८ | ८.३७ |
शार्दुल ठाकूर | ८.९५ | ९.२७ |
हेही वाचा >>> विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?
भारतीय संघाला जसप्रित बुमराचा फायदाच झालेला आहे. तो संघात असताना भारताला अनेक सामन्यात विजय प्राप्त करता आलेला आहे. बुमरा जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो तेव्हा भारताने ७६ टक्के सामने जिंकलेले आहे. तर तो जेव्हा प्लेइंग ११ मध्ये नसतो तेव्हा भारताने ६८ टक्के सामने जिंकलेले आहेत. तो संघात असताना भारताने १२ टक्के सामने गमावलेले आहेत. तर तो संघात नसताना भारताने ३३ टक्के सामने गमावलेले आहेत.
बुमराह संघात असताना भारतीय संघाची कामगिरी
लढतीतील परिणाम | बुमरा संंघात असताना | बुमरा संघात नसताना |
विजय | ७६ टक्के | ६८ टक्के |
पराभव | १२ टक्के | ३३ टक्के |
अनिर्णित | १२ चक्के | आकडेवारी उपलब्ध नाही. |
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बुमरा भारतीय संघात नसल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. बुमराची जागा भरून काढणाऱ्या खेळाडूचा बीसीसीआयकडून शोध घेतला जातोय. मात्र बुमरा संघात नसल्यामुळे दुसऱ्या नव्या दमाच्या गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल या गोलंदाजांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या टी-२० विश्वचषकातही हे गोलंदाज चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.