नितीश कुमार यांनी एनडीएत सामील होत पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काही महिन्यांपूर्वी ते भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची भाषा करत होते. आता मात्र त्याच नितीश कुमारांनी थेट भाजपाशी हातमिळवणी करत, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस तसेच इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार? भाजपाला काय फायदा होणार? नितीश कुमार यांनी हा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊ या…
जातीआधारित जनगणनेवरून विरोधकांचा सामाजिक न्यायाचा पुरस्कार
नितीश कुमार यांचा एनडीएत येण्याचा खरा फायदा भाजपाला झाला आहे. बिहारमधील जातिआधारित जनगणनेचे श्रेय नितीश कुमार यांनाच जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली बिहारमध्ये जातीआधारित जनगणना करण्यात आली होती आणि या जनगणनेचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला होता. या अहवालानंतरच संपूर्ण भारतात अशाच प्रकारची जनगणना करावी, अशी मागणी इंडिया आघाडीकडून केली जात होती.
हेही वाचा >>> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
नेमके काय करावे? विरोधकांपुढे प्रश्न
जून २०२३ मध्ये पाटण्यात विरोधकांची पहिली बैठक झाली होती. या बैठकीनंतरच विरोधकांच्या इंडिया आघाडीला मूर्त रुप येण्यास सुरुवात झाली होती. म्हणजेच विरोधकांना एकत्र करण्यात नितीश कुमारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. नितीश यांच्या जातीआधारित जनगणनेमुळे विरोधकांना भाजपाच्या हिंदुत्त्वाशी समना करण्यासाठी समाजिक न्यायाची भूमिका घेत राजकारण करण्याची संधी मिळाली होती. मात्र आता हेच नितीश कुमार एनडीत गेल्यामुळे आता नेमके काय करावे? असा प्रश्न विरोधकांपुढे उभा ठाकला आहे.
भाजपाकडून विरोधकांना शह
१९९० मध्ये मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनी एकत्र येत भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला तोंड देण्यासाठी समाजिक न्यायाची संकल्पना पुढे केली होती. सामाजिक न्यायाचे राजकारण करूनच या दोन्ही नेत्यांनी तेव्हा भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखले होते. या निवडणुकीतही विरोधक हीच संकल्पना पुढे करून मोदींचा समाना करू पाहात आहेत. मात्र यावेळी भाजपाने नितीश कुमार यांना आपल्याकडे ओढले आहे. तसेच दिवंगत समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार (मरणोत्तर) देण्याची घोषणा करून विरोधकांना एका प्रकारे शह दिला आहे.
हेही वाचा >>> नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!
सहा महिन्यांनी नितीश कुमारांनी निर्णय बदलला
जून महिन्यात पाटण्यात एकूण १७ विरोधी पक्षांची एक बैठक झाली होती. या बैठकीत भाजपाविरोधात एकत्र येण्यावर चर्चा झाली होती. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाटण्यातील बैठकीपासून एका चळवळीला सुरुवात होत आहे, असे म्हटले होते. मात्र या बैठकीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी नितीश कुमार यांनी या आघाडीतून बाहेर पडत एनडीएत प्रवेश केला.
जदयूकडून काँगेसवर टीका
नितीश कुमार यांच्या या निर्णयानंतर राजदवर टीका करण्याऐवजी जदयूकडून काँग्रेसला (राजद) लक्ष्य केले जात आहे. ‘काँग्रेस फार गर्विष्ठ आहे. जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी हा पक्ष प्रादेशिक पक्षांवर दबाव टाकत आहे. इतर पक्षाच्या नेत्यांना ते राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेत बोलावत आहेत. इतर पक्षांचे प्रमुख नेते काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे त्यांना या यात्रेसाठी आमंत्रित केले जात आहे,’ असे जदयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले. त्यागी नितीश कुमार यांचे विश्वासू मानले जातात.
हेही वाचा >>> बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय?
भाजपाच्या गोटात प्रभावी अस्त्र
भाजपाने २०१९ सालच्या निवडणुकीत ४० पैकी १७ जागा लढवल्या होत्या. या सर्वच जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. या पक्षाने ३४ जागा लढवल्या असत्या तर कदाचित त्यांचा आणखी काही जागांवर विजय झाला असता. आता नितीश कुमार आणि भाजपा एकत्र आले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिहारमध्ये अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या रुपात सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा नेता भाजपाला भेटला आहे. त्यामुळे विरोधकांच्या रणनीतीचा सामना भाजपाला प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.
जदयूने भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला?
नितीश कुमार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून भाजपाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम राजद आणि जदयूला मिळणाऱ्या मतांवर होण्याची शक्यता होती. याबाबत “राम मंदिराच्या उद्घाटनाचा परिणाम बिहारमधील जनतेवर झाल्याचे आम्हाला आढळले. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपासोबत जाणे हे नितीश कुमार यांच्या हिताचे होते,” अशी माहिती जदयूच्या सूत्रांनी दिली.
नितीश कुमार यांच्या या निर्णयावर भाजपातील अंतर्गत सूत्रांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला आगामी लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात लढायची आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सोबत न घेऊन आम्ही बिहारमध्ये आमची लढाई आणखी कठीण का करून घ्यावी? आता नितीश कुमार एनडीएत आले आहेत. त्यामुळे तेथे निवडणूक लढवणे सोपे जाणार आहे. आता आम्ही इतर राज्यांवर आमचे लक्ष केंद्रीत करू शकू. २०१९ सालच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही ज्या ठिकणी आमचा प्रभाव कमी आहे, तेथे अधिक लक्ष देऊ शकू,” असे मत भाजपाच्या सूत्रांनी व्यक्त केले.