अमोल परांजपे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एका दृक्-श्राव्य संदेशाद्वारे २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली. विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याच साथीने (रनिंग मेट) ते आपल्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. निवडणुकीला अद्याप २० महिन्यांचा काळ शिल्लक असताना उमेदवारी जाहीर केल्याचा बायडेन यांना फायदा होईल का, त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण असेल आदी चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
बायडेन यांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ काय?
‘हाती घेतलेले काम तडीस नेऊ या’ (लेट्स फिनिश द जॉब) या घोषणेसह बायडेन यांनी आपली उमेदवारी ३ मिनिटांच्या संदेशामध्ये जाहीर केली. यामध्ये त्यांनी ‘स्वातंत्र्य’ हा शब्द अनेकदा उच्चारला आहे. या चित्रफितीची सुरुवातच जानेवारी २०२१ मधील ‘कॅपिटॉल हिल’वरील दंगलीच्या दृश्यांनी होते, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. शिवाय बिगर श्वेतवर्णीय अधिकाधिक दिसतील, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. आपल्या पहिल्या संदेशात बायडेन यांनी कमला हॅरिस यांनाही बरोबरीचे स्थान देऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांमध्ये असलेली एकी अधोरेखित केली आहे. बायडेन यांच्या जास्त वयाचा मुद्दा प्रचारामध्ये येऊ शकतो, हे गृहीत धरून ते अधिकाधिक कृतिशील असल्याचे दाखविण्याचा प्रयत्नही या संदेशात करण्यात आला आहे.
उमेदवारी जाहीर केल्याचा बायडेन यांना काय फायदा?
अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केल्यामुळे बायडेन यांना आता आपल्या प्रचारासाठी स्वतंत्र देणग्या स्वीकारता येतील. येत्या शुक्रवारी बायडेन यांनी वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे देणगीदार आणि डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या (डीएनसी) ज्येष्ठ सदस्यांसाठी मेजवानी आयोजित केली आहे. आता या देणगीदारांकडून आपल्या प्रचारमोहिमेसाठी बायडेन देणग्या स्वीकारू शकतील. मंगळवारची घोषणा आणि शुक्रवारी होणाऱ्या भेटीगाठी याद्वारे आपण २०२४मध्ये पुन्हा निवडून येऊ शकतो, याची हमी देणगीदार आणि पक्षनेत्यांना देण्याचा प्रयत्न बायडेन-हॅरिस यांच्याकडून केला जाईल. सध्या पक्षामध्ये बायडेन यांना व्यापक पाठिंबा असला तरी जाहीरपणे मैदानात उतरल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील अन्य इच्छुकांना आपोआप लगाम बसेल.
विश्लेषण: टाटा टेकचा ‘आयपीओ’ टाटा समूहाच्या फायद्याचा ठरेल?
बायडेन यांच्या वयामुळे काय फरक पडेल?
जानेवारी २०२१मध्ये ८० वर्षांचे बायडेन यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हाच ते अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष बनले होते. आपले वय ही ‘खरोखर चिंतेची बाब’ असल्याचे स्वत: बायडेन यांनीही मान्य केले असले तरी आपली ऊर्जा कमी पडणार नाही याची ग्वाहीदेखील त्यांनी वेळोवेळी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून बायडेन यांच्या वयाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. रिपब्लिकन पक्षाचे एक उमेदवार निकी हॅले यांनी तर ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या इच्छुकांच्या बुद्धिमत्तेची चाचणी केली जावी, अशी मागणी करत एका दगडात बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. काही डेमोक्रॅट्सदेखील नव्या पिढीसोबत दुवा साधण्याच्या बायडेन यांच्या मर्यादांबाबत चिंता उपस्थित करत असतात. मात्र गतवर्षी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने अपेक्षेपेक्षा केलेली चांगली कामगिरी ही बायडेन यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
बायडेन यांना पक्षांतर्गत विरोधाची शक्यता किती?
अमेरिकेमध्ये दोन कार्यकाळांची मर्यादा असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असेल, तर शक्यतो पक्ष त्याच्या पाठीशी असतो. आताही डेमोक्रॅटिक पक्षात वेगळे चित्र नाही. लेखिक मरीन विल्यमसन आणि लसविरोधी मोहिमेतील कार्यकर्ते रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर हे दोघे वगळता कुणीही पक्षांतर्गत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. या दोघांनाही पक्षात फारसे समर्थन नाही. ‘डीएनसी’ बायडेन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. बायडेन यांना विल्यमसन आणि केनेडी यांच्याबरोबर एका व्यासपीठावर यावे लागू नये, म्हणून डीएनसीने प्राथमिक फेरीचे वादविवादही (प्रायमरी डिबेट्स) आयोजित केलेले नाहीत. पक्षाच्या सर्वसामान्य सदस्यांमध्येही बायडेन यांना दुसऱ्यांदा संधी दिली जावी, असा मतप्रवाह आहे.
विश्लेषण : ‘ऑपरेशन कावेरी’पूर्वी भारताने राबविलेल्या अशा मोहिमा कोणत्या?
बायडेन यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी कोण असतील?
डेमोक्रॅटिक पक्षातून बायडेन यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असली, तरी रिपब्लिकन पक्षातील चित्र मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्या पक्षातून उमेदवारी जाहीर करणारे पहिले नेते होते. त्यानंतर निकी हॅले, अलास्काचे माजी गव्हर्नर आसा हचिसन, उद्योजक पेरी जॉन्सन, विवेक रामास्वामी आणि रेडिओ निवेदक लॅरी एल्डर प्राथमिक फेरीच्या रिंगणात उतरले आहेत. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस इच्छुक असले तरी त्यांनी अद्याप अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केलेली नाही. माजी उपाध्यक्ष माइक पेन्स आणि सिनेटर टिम स्कॉट हेदेखील मैदानात उतरू शकतात. एकूणच बायडेन यांचा विरोधक कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा बायडेन विरुद्ध ट्रम्प सामन्याचे भाकीत करीत आहेत. त्यामुळेच बायडेन यांनी ‘लोकशाही, स्वातंत्र्य’ याची शपथ घालतच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
amol.paranjpe@expressindia.com