Congnitive Test काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मानसिक आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांसह समर्थकांकडूनही त्यांच्या ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ची मागणी केली जात आहे. त्यांना व्हाईट हाऊसच्या शर्यतीत राहायचे असल्यास जो बायडेन यांनी ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ करावी ही मागणी काही दिवसांपासून जोर धरत आहे. अनेकांचे असे मत आहे की, इतके महत्त्वाचे पद सांभाळण्यासाठी जो बायडेन शारीरिक आणि मानसिकरीत्या कमकुवत आहेत. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांच्या खराब कामगिरीनंतर या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. या अध्यक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प जो बायडेन यांच्यावर वरचढ ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ जूनला झालेल्या अध्यक्षीय चर्चेत, अलीकडच्या काही सार्वजनिक भाषणांमध्ये, मुलाखतींमध्ये जो बायडेन अडखळताना, गोष्टी विसरताना, उग्र आवाजात बोलताना, तसेच बोलताना त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव सतत बदलत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरच या चाचणीच्या मागणीने जोर धरला. ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ म्हणजे नक्की काय? ही चाचणी केल्यानंतर काय सिद्ध होईल? ही चाचणी कशी केली जाते? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा : ई-कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस आणि सहकर्मचारी काढले विकायला? काय आहे हा प्रकार?

मानसिक आरोग्य तपासण्यासाठी ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ केली जाते. या चाचणीत विचार करणे, गोष्टी शिकणे, लक्षात ठेवणे, निर्णय क्षमता, भाषा यांसारखी मेंदूच्या कार्याची तपासणी केली जाते. या कार्यांमध्ये विसंगती आढळून आल्यास, संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य कमकुवत असल्याचे समजले जाते. ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ ही एक प्रमाणित प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मेंदूतील समस्या, त्यामागील कारणे आणि मेंदूचा कोणता भाग प्रभावित झाला आहे आदी गोष्टी माहिती होतात. या चाचणीतील परिणामांच्या आधारावरच मानसिक आरोग्य कमकुवत आहे का किंवा व्यक्तीला स्मृतिभ्रंश हा आजार आहे की नाही यावर निदान केले जाते आणि कोणते उपचार केले जावेत, हे ठरविले जाते.

या चाचणीची सल्ला कोणाला दिला जातो?

ज्या लोकांना स्मरणशक्तीची कमतरता आहे, ज्यांना वाटते की ते आपली स्मरणशक्ती गमावत आहेत किंवा गोष्टी लवकर विसरत आहेत; ज्यांना निर्णय घेण्यात अडचण येत आहे, अशा व्यक्तींना ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’चा सल्ला दिला जातो. स्मृतिभ्रंश आणि स्युडो डिमेंशिया यांतील फरक ओळखण्यासाठी वारंवार ही चाचणी केली जाते. “आमच्यासाठी ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ करणे ही अत्यंत नियमित गोष्ट आहे,” असे गुडगाव येथील फोर्टिस हॉस्पिटलचे मुख्य संचालक व न्यूरोलॉजीचे युनिट प्रमुख डॉ. प्रवीण गुप्ता यांनी सांगितले.

ही चाचणी वृद्ध लोकांसाठी आहे का?

विशेषतः वयामुळे मानसिक आरोग्य कमजोर होते. त्यामुळे वय हा एक महत्त्वाचा घटक आहे. वयाची साठी पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा धोका वाढत जातो आणि वयाच्या ७५ नंतर हा धोका दुप्पट होतो, असे म्हणायला हरकत नाही. डॉ. गुप्ता म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वयाच्या त्या टप्प्यात आहेत, ज्यात मानसिक आरोग्य कमजोर होण्याचा धोका जास्त असतो. असे असले तरी, जो बायडेन यांनी कोणतीही कॉग्निटिव्ह टेस्ट किंवा कोणत्याही प्रकारची न्यूरोलॉजिकल तपासणी करण्यास नकार दिला आहे. तणाव आणि जास्त काम केल्यामुळे काही तरुणांमध्येही याची लक्षणे जाणवतात, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा : अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला अडचणीत आणणारी ‘हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन’ उपचार पद्धती नेमकी आहे तरी काय?

ही चाचणी कशी केली जाते?

कॉग्निटिव्ह टेस्ट ही मुळात एखाद्या परीक्षेसारखी असते. त्यामध्ये मानसशास्त्रज्ञ मेंदूच्या वैयक्तिक भागांच्या कार्याचे मूल्यांकन करतो. या चाचणीत स्मरणशक्ती, भाषा कार्य, निर्णय क्षमता, गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता यांसारखी मेंदूची कार्ये तपासली जातात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe biden cognitive test rac