अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (८१) यांच्यात पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडली आहे. मात्र, या डिबेटमध्ये जो बायडन यांना त्यांच्या वार्धक्यामुळे म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन बोलताना बऱ्याचदा अडखळतात, चाचपडतात आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारीतून माघार घ्यावी, अशी भावना डेमोक्रॅटिक पक्षामध्येच दृढ होऊ लागली आहे. त्यांचे वाढलेले वय हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सध्या तरी बायडन यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याबाबत कसलीही हालचाल दाखवलेली नाही. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तरी असे करणारे ते पहिलेच डेमोक्रॅटिक उमेदवार नसतील. ३१ मार्च १९६८ रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला फटका बसला होता.
निर्णयावर युद्धाचा परिणाम
लिंडन बी. जॉन्सन यांच्या या निर्णयामागे व्हिएतनाम युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ साली हत्या झाली. त्यानंतर ‘व्हाईट हाऊस’चा ताबा जॉन्सन यांना मिळाला. मात्र, त्याबरोबरच व्हिएतनाम युद्धाचा वसाही त्यांच्या गळ्यात पडला. या युद्धामध्ये अमेरिकेने आपला सहभाग वाढवावा का, याबाबत जॉन्सन स्वत: साशंक होते. मात्र, राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी केनेडी यांचेच धोरण पुढे चालू ठेवले आणि युद्धातील सहभाग वाढवला. मार्च १९६५ मध्ये व्हिएतनाममध्ये अमेरिकन लढाऊ सैन्याला तैनात करण्याची परवानगी जॉन्सन यांनी दिली. तसेच त्यांनी विमानांद्वारे व्हिएतनामवर जोरदार बॉम्बफेक करण्याच्या मोहिमेसाठीचे आदेशही दिले. जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेचा सहभाग वाढतच गेला. १९६५ साली व्हिएतनाममध्ये तैनात केलेली अमेरिकन सैन्याची संख्या सुमारे १,८०,००० इतकी होती. ती १९६८ पर्यंत जवळपास पाच लाखांपर्यंत गेली. या युद्धामध्ये ३५ हजारहून अधिक अमेरिकन सैनिकही मारले गेले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून अमेरिकेमध्येच व्हिएतनाम युद्धविरोधी भावना अधिक जोर धरू लागली. सुरुवातीला जॉन्सन यांना युद्धासाठी मिळालेला पाठिंबा उत्तरोत्तर घसरत गेला. मार्च १९६५ मध्ये जॉन्सन यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी ६८-६९ टक्के मान्यता (Approval Rating) होती. १९६६ च्या अखेरीपर्यंत ती घसरून ४४ टक्क्यांवर आली. दुसऱ्या बाजूला त्यांना राष्ट्राध्यक्षपदावर बसवू नये, अशा मानणाऱ्या (Disapproval Rating) लोकांची टक्केवारी २१ टक्क्यांवरून मार्च १९६५ पर्यंत ४७ टक्क्यांवर पोहोचली होती. जेव्हा जॉन्सन यांचा कार्यकाळ १९६८ पर्यंत संपत आला होता, तेव्हा त्यांची मान्यता ३६ टक्क्यांपर्यंत घसरली होती आणि त्यांना पदावर बसवू नये, असे मानणाऱ्यांची टक्केवारी ५२ टक्क्यांवर पोहोचली होती.
जॉन्सन यांची माघार
जॉन्सन यांची लोकप्रियता पार रसातळाला गेल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षांतर्गतच मतभेद उफाळू लागले. १९६७ साली सिनेटर युजिन मॅककार्थी यांनी जॉन्सन यांना युद्धविरोधी पर्याय म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला मॅककार्थी यांचे उमेदवारीसाठीचे प्रयत्न फार गंभीरपणे घेण्यात आले नाहीत. मात्र, त्यांनी १२ मार्च १९६८ रोजी न्यू हॅम्पशायरमध्ये जॉन्सन यांचा जवळजवळ पराभव करून अनेकांना आश्चर्यचकित केले. मॅककार्थी यांना ४२ टक्के मते मिळाली; तर जॉन्सन यांना ४९ टक्के मते मिळाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर जॉन केनेडी यांचे बंधू व युद्धविरोधक रॉबर्ट केनेडी यांनीही राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आता डेमोक्रॅटिक पक्षामध्येच राष्ट्राध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवार आपली वर्णी लावू पाहत होते. या सगळ्याच दबाव लोकप्रियता घसरलेल्या जॉन्सन यांच्यावर निर्माण होऊ लागला. लोकांना बदल हवाच होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ३० मार्च रोजी जॉन्सन यांनी टेलिव्हिजनवर एक भाषण दिले. त्यांनी या भाषणामध्ये व्हिएतनाममधून काही सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा अनपेक्षित होती. या भाषणामध्ये जॉन्सन यांनी म्हटले, “अमेरिकेचे अनेक सैनिक सध्या दूरवर युद्धभूमीवर लढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्वत:च्या राजकीय आकांक्षांवर मी लक्ष देऊ इच्छित नाही. त्यामुळे मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे.”
हेही वाचा : विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
गोंधळात पडलेले डेमोक्रॅट्स
दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षाने रिचर्ड निक्सन यांची उमेदवारी जाहीर केली होती. डेमोक्रॅट्स अजूनही गोंधळात होते. केनेडी, मॅककार्थी व ह्युबर्ट हम्फ्रे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली. ह्युबर्ट हम्फ्रे हे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे नैसर्गिकपणे तेही या स्पर्धेत होते. युद्धविरोधी भावना लक्षात घेता, साहजिकच केनेडी अथवा मॅककार्थी यांचीच वर्णी लागण्याची शक्यता होती. ऑगस्टमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मॅककार्थी यांना पसंतीदर्शक ३९ टक्के मते मिळाली; तर केनेडी यांना ३० टक्के पसंतीची मते मिळाली. ह्युबर्ट हम्फ्रे यांना फक्त २.२ टक्के पसंतीची मते मिळाली. ६ जून १९६८ रोजी रॉबर्ट एफ. केनेडी यांचीही हत्या झाली. सरतेशेवटी डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत राजकारणानंतर सर्वांत कमी पसंतीदर्शक मते मिळालेले ह्युबर्ट हम्फ्रे हेच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ठरले. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निक्सन यांनी त्यांचा सहज पराभव केला.