अमोल परांजपे

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. करचुकवेगिरी आणि अनधिकृतरीत्या हत्यार बाळगल्याचे आरोप त्यांनी कबूल केले आहेत. अध्यक्षीय निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर आली असताना रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रेटिक अध्यक्षांच्या विरोधात आयते कोलीत मिळाले आहे. अर्थात, हंटर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अन्य अनेक आरोप असून त्यांचा तपास करणे आणि तो धागा अध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत नेणे, यासाठी रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे. हंटर यांनी कसली कबुली दिली? त्यांच्यावर असलेले अन्य आरोप किती गंभीर आहेत? अमेरिकेच्या राजकारणावर याचा परिणाम होईल का?

हंटर बायडेन यांना कोणते आरोप मान्य?

२०१७ आणि २०१८ या काळात टेक्सास राज्यात दोन लाख डॉलरपेक्षा अधिक कर चुकविल्याच्या आरोप हंटर यांनी मान्य केला आहे. केंद्रीय यंत्रणांनी पाच वर्षांच्या तपासानंतर हंटर यांच्याबरोबर हा ‘सौदा’ केला आहे. याबरोबरच अनधिकृतरीत्या हत्यार (हँड गन) बाळगल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. अमेरिकेत हँडगनसाठी परवाना आवश्यक नसला तरी अमली पदार्थाचे सेवन करीत असल्यास हे हत्यार जवळ ठेवण्यास बंदी आहे. हंटर यांनी आपण नशेच्या आहारी गेलो होतो आणि त्यातून कशी सुटका केली, इत्यादी गोष्टी यापूर्वीच जाहीर केल्या असल्याने तो मुद्दा नाहीच. मात्र पुढील किमान दोन वर्षे ते अमली पदार्थापासून दूर राहिले, तर हा गुन्हा रद्द होऊ शकतो, अशी तजवीज तपास यंत्रणांसोबत झालेल्या ‘वाटाघाटीं’मध्ये हंटर यांनी करून ठेवली आहे. ही दोन्ही प्रकरणे व्यक्तिगत असल्याने त्याचा राजकीय फायदा रिपब्लिकन पक्षाला उचलता येणार नाही. त्यामुळेच हंटर यांच्यावर झालेल्या अन्य आरोपांना अधिक हवा देण्याची रणनीती रिपब्लिकनांनी आखली आहे.

हंटर यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणते आरोप?

ऑक्टोबर २०२०मध्ये ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ या वृत्तपत्राने हंटर यांच्या ‘मॅक बुक प्रो’मधील एका ई-मेलच्या हवाल्याने या कथित प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडली. हंटर यांनी २०१५ साली युक्रेनमधील ‘बुरिस्मा’ या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या अधिकाऱ्यांची तेव्हा उपाध्यक्ष असलेल्या जो बायडेन यांची गाठ घालून दिली होती. २०१४ ते २०१९ या काळात हंटर हे बुरिस्माचे पगारी संचालक होते. रिपब्लिकन नेते आणि माध्यमांनी तेव्हा हे प्रकरण लावून धरले होते. मात्र २०२० मध्ये सेनेटने केलेल्या चौकशीमध्ये कोणतेही पुरावे न आढळल्याने हा विषय मागे पडला. दुसरे प्रकरण चीनशी संबंधित आहे. चीनमधील पेट्रोलियम कंपन्यांच्या समूहाने २०१७ आणि २०१८ या काळात हंटर आणि त्यांचे काका जेम्स यांना सुमारे ५० लाख डॉलर दिले होते. अमेरिकेतील द्रवीभूत नैसर्गिक वायू प्रकल्प चिनी कंपनीला मिळविण्यासाठी मध्यस्थीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. अखेरीस हा व्यवहार होऊ शकला नसला, तरी पुन्हा एकदा अमेरिकेच्या धोरणांमध्ये हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्याचा आरोप हंटर यांच्यावर झाला. आता गुन्हेगारी स्वरूपाच्या दोन प्रकरणांमध्ये आरोप मान्य केल्यानंतर हंटर यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढण्याचा इरादा रिपब्लिकन पक्षाने पक्का केला आहे.

रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय?

हंटर यांच्याबाबत तपास यंत्रणांनी अत्यंत मवाळ धोरण स्वीकारल्याचा आरोप करण्यास रिपब्लिकन नेत्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी याची तुलना वाहतूक नियमभंगाच्या आरोपाशी केली. तर रिपब्लिकन पक्षाकडे अल्प बहुमत असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज या प्रतिनिधीगृहाच्या देखरेख समितीने भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कंबर कसली आहे. अध्यक्ष बायडेन यांचा त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यवहारांतील सहभाग स्पष्ट होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असा निर्धार देखरेख समितीचे अध्यक्ष जेम्स कॉमर यांनी व्यक्त केला आहे. चिनी पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रकरणाशी संबंधित एका ई-मेलमध्ये ‘एका बडय़ा असामीला १० टक्के हिस्सा दिला जाईल’ असा उल्लेख असून ही ‘बडी असामी’ म्हणजे जो बायडेनच असल्याचा दावाही कॉमर यांनी केला आहे. अर्थात यातील कोणत्याच आरोपाला बळकटी देणारे पुरावे सध्यातरी कोणी पुढे आणलेले नाहीत. मात्र याचा वापर करून बायडेन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांचे प्रतिस्पर्धी सोडणार नाहीत, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?

आगामी अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सध्यातरी तगडा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी नसल्याने तेच डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षातील सर्व इच्छुकांनी हंटर बायडेन यांच्या आडून राष्ट्राध्यक्षांवर बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांच्यावर एकामागोमाग एक होत असलेल्या आरोपांना छेद देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाकडून सुरू आहे. त्यामुळे हंटर यांच्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण जमेल त्या पद्धतीने लावून धरण्याची रणनीती रिपब्लिकनांनी आखली आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी या आरोपांना अधिक धार चढत जाणार, हे निश्चित आहे.

Story img Loader