या वर्षी पाच नोव्हेंबर रोजी अमेरिकी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल आणि त्यातून अमेरिकेचा ४७वा अध्यक्ष निवडला जाईल. ‘सुपर ट्युसडे’नंतर डेमोक्रॅटिक पक्षातर्फे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षातर्फे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे. या चुरशीच्या निवडणुकीत अगदी थोड्या फरकाने एक उमेदवार विजयी होईल अशी चिन्हे आहेत.
सुपर ‘ट्युसडे’मध्ये काय घडले?
जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पक्षांमध्ये सर्वाधिक प्रतिनिधींची (डेलिगेट्स) मते मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या १४ प्रायमरीज (पक्षांतर्गत निवडणुका) आणि दोन कॉकसमध्ये (मेळावे) बायडेन यांना १९६८पैकी १५४२ मते मिळली. तर रिपब्लिकन पक्षाच्या १३ प्रायमरीज आणि दोन कॉकसमध्ये ट्रम्प यांना १२१५पैकी १०३१ मते मिळाली. ट्रम्प यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी निकी हॅले यांनी एक राज्य जिंकले, पण आजवरच्या वाटचालीत फारच कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे हॅले यांनी माघार घेतली. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये अध्यक्षीय उमेदवारीसाठी बायडेन यांचे प्रतिस्पर्धी डीन फिलिप्स यांनीही माघार घेतली. त्यांना तर एकही राज्य जिंकता आले नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : केरळ सरकारने मानव-वन्यजीव संघर्ष ‘राज्यासाठी आपत्ती’ म्हणून का जाहीर केला? यामुळे काय बदल होणार?
पुढे काय?
आता जुलै महिन्यामध्ये रिपब्लिकनांचा आणि ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅट्सचा पक्ष महामेळावा होईल. या मेळाव्यांमध्ये अनुक्रमे ट्रम्प आणि बायडेन यांच्या अध्यक्षीय उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. १६ सप्टेंबर रोजी दोन्ही उमेदवारांमध्ये पहिली जाहीर वादचर्चा होईल. तेथून खऱ्या अर्थाने दोन्ही पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात होईल. ५ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान होईल. पुढील वर्षी ६ जानेवारी रोजी नवीन अध्यक्षाच्या नावावर अमेरिकी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होईल. २० जानेवारी रोजी नवे अध्यक्ष पदाची शपथ घेतील.
म्हातारे तितुके….
वय वर्षे ८१ असलेले बायडेन हे त्यांचाच आधीचा विक्रम मोडून अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे सर्वांत वयोवृद्ध उमेदवार ठरतील. तर वय वर्षे ७७ असलेले डोनाल्ड ट्रम्प दुसरे सर्वांत वयोवृद्ध उमेदवार ठरतील. १९१२नंतर प्रथमच माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष यांच्यात लढत होत आहे. अमेरिकी राज्यघटनेनुसार सलग दोन वर्षे कार्यकाळ भूषवलेल्या व्यक्तीला तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. पण अध्यक्षपदाची निवडणूक सलग तिसऱ्यांदा लढवता येते. ट्रम्प यांच्या बाबतीत २०१६, २०२० आणि २०२४मध्ये हे घडून येऊ शकते. ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाल्यास ग्रोव्हर क्लीव्हलँड यांच्यानंतर (१८८५-१८८९, १८९३-१८९७) दोन वेगवेगळ्या कार्यकाळांत पद भूषवणारे ते केवळ दुसरेच अमेरिकी अध्यक्ष ठरतील. जिमी कार्टर यांच्यानंतर (१९७७-१९८१) प्रत्येक डेमोक्रॅटिक अध्यक्षाने (बिल क्लिंटन, बराक ओबामा) सलग दोन निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत.
हेही वाचा >>> आधार- निवडणूक ओळखपत्र जोडणी: काँग्रेस नेत्याची आयोग आणि सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव कशासाठी?
दोघांपेक्षा वेगळ्या उमेदवाराची शक्यता किती?
दोन पूर्णपणे वेगळ्या कारणांसाठी या दोघांच्या उमेदवारीत खोडा पडू शकतो. ट्रम्प यांच्याविरोधात चार फौजदारी स्वरूपाचे खटले सुरू आहेत. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने तेथील राज्याच्या मतपत्रिकेतून ट्रम्प यांचे नाव वगळले जावे असा आदेश दिला होता. ६ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी समर्थकांना अमेरिकी काँग्रेसच्या इमारतीवर चाल करून जाण्यास उद्युक्त केले. हा राष्ट्र आणि राज्यघटनेविरोधात उठाव ठरतो, असे मत त्या न्यायालयाने व्यक्त केले. परंतु अलीकडेच अमेरिकेच्या मध्यवर्ती सर्वोच्च न्यायालयाने कोलोरॅडो न्यायालयाचा हा निकाल रद्द ठरवला. त्यामुळे निवडणूक लढवण्यापासून ट्रम्प यांना रोखले जाऊ शकत नाही. पण चार खटल्यांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयांकडून होणाऱ्या मतप्रदर्शनामुळे ट्रम्प यांच्याविषयी समर्थकांच्या आणि पक्षनेत्यांच्या मनात संदेह निर्माण होऊ शकतो. यातून कदाचित दुसऱ्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो. पण ही शक्यता जवळपास नगण्य आहे. बायडेन यांचे वाढते वय हा त्यांच्याविषयी समर्थक आणि डेमोक्रॅटिक पक्षनेत्यांना वाटणारा सर्वांत मोठा अडथळा ठरतो. चालताना, बोलताना अडखळणे, शब्द विसरणे असे वृद्धसुलभ गुणधर्म बायडेन दर्शवू लागले आहेत. अशा व्यक्तीला दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद कितपत झेपेल, अशी शंका वाटणाऱ्यांची संख्या डेमोक्रॅटिक पक्षात मोठी आहे. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्ष याच मुद्द्यावरून बायडेन यांना घेरू शकतात. तेव्हा त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार शोधावा, असे डेमोक्रॅटिक पक्षाला वाटू शकता. ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
मतदान चाचण्यांचा कल कोणाकडे?
सध्याच्या जवळपास सर्वच चाचण्यांमध्ये ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा थोडे आघाडीवर आहेत. पण ही आघाडी निर्णायक नाही. अर्थव्यवस्था आणि इतर आकडेवारीच्या आघाडीवर अमेरिकेची कामगिरी चांगली आहे. तिचा फायदा बायडेन यांना होताना दिसत नाहीये. याउलट बायडेन यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) हा नारा पुन्हा दिला असून, निर्वासित, गर्भपात, युरोपला मदत या मुद्द्यांवर त्यांची आक्रमक आणि काहीशी अपरिपक्व मते भावणारा मतदार एकत्र होऊ लागलेला दिसतो. परंतु १२ टक्के मतदार या टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराला पसंती देत नाहीत. हा १२ टक्के मतदार अंतिम निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.
‘स्विंग स्टेट्स’चे महत्त्व…
अमेरिकेच्या राजकारणात दोनच प्रमुख पक्ष मुख्य प्रवाहात असल्यामुळे बहुतेक राज्यांमध्ये या दोनपैकी एका पक्षाला वर्षानुवर्षे पसंती दिली जाते. उदा. कॅलिफोर्निया हे राज्य बहुधा नेहमीच डेमोक्रॅट्सना पाठिंबा देते, तर टेक्सासने कधीही रिपब्लिकनांची साथ सोडली नाही. परंतु काही राज्ये मात्र दोन्ही पक्षांना आलटूनपालटून मतदान करतात. ही राज्ये निवडणुकीचा नूर बदलू शकतात. त्यांना स्विंग स्टेट्स किंवा बॅटलग्राउंड स्टेट्स म्हटले जाते. गेल्या निवडणुकीत अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन या पाच राज्यांनी बायडेन यांना मते दिली होती. त्याआधीच्या म्हणजे २०१६मधील निवडणुकीत या राज्यांनी ट्रम्प यांना पसंती दिली होती. त्यामुळे यंदाही या पाच राज्यांकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागून राहील.