या जगात अगदी छोट्याशा हव्यासापोटी काही लोक मोठे गुन्हे करतात. २००८ सालाच्या सप्टेंबर महिन्यातही असाच एक भयंकर गुन्हा घडला होता. काही माणसांनी एका २५ वर्षीय सौम्या विश्वनाथन नावाच्या महिला पत्रकाराची हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याच हत्येप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येप्रकरणी पुरावे शोधणे हे पोलिसांसाठी चांगलेच आव्हानात्मक ठरले होते. याच पार्श्वभूमीवर हे हत्या प्रकरण काय आहे? पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला होता? आरोपींना नेमकी काय शिक्षा झाली? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येच्या साधारण १५ वर्षांनंतर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप तर एका आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी घेणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांच्या न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार दिला. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नाही, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

सौम्या यांच्या आईने काय प्रतिक्रिया दिली?

न्यायालयाच्या या निकालानंतर सौम्या विश्वनाथन यांच्या आई माधवी विश्वनाथन यांनी प्रतिक्रिया दिली. या निकालाबाबत मी समाधानी आहे, मात्र आनंदी नाही, असे त्या म्हणाल्या. “मला ज्या यातना झाल्या, मी जे भोगतोय तेच या आरोपींनीही भोगावे अशी माझी इच्छा आहे. या निकालामुळे मी समाधानी आहे. मात्र मी आनंदी नाही. माझे पती हे सध्या अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे,” असे माधवी विश्वनाथन म्हणाल्या.

सौम्या विश्वनाथन होत्या टीव्ही पत्रकार

सौम्या विश्वनाथन या इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकार होत्या. त्या ३० सप्टेंबर २००८ रोजी कारने आपल्या घरी जात होत्या. मात्र काही दरोडेखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. हे दरोडेखोर वॅग्नर कारने सौम्या यांचा पाठलाग करत होते. दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गाजवळ आल्यानंतर दरोडेखोरांनी सौम्या यांना गाठलं. त्यानंतर सौम्या यांनी आपली कार थांबवावी यासाठी दरोडेखोरांनी गोळीबार केला. यातील एक गोळी सौम्या यांच्या थेट डोक्यात गेली. ज्यामुळे सौम्या यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पदपथावर जाऊन आदळली. यातच त्यांचा मृत्यू झाला.

सहा महिन्यांपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही

या घटनेनंतर वसंतकुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र सहा महिन्यांपर्यंत पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही. ज्या ठिकाणी अपघात झाला होता, ज्या ठिकाणी दरोडेखोरांनी सौम्या यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या भागात सीसीटीव्ही नव्हते. तसेच दरोडेखोर ज्या वॅग्नर कारने आले होते, त्या कारचा क्रमांकही कोणी पाहिलेला नव्हता. या घटनेचा प्रत्यक्षदर्शीदेखील नव्हता. त्यामुळे पोलिसांना सहा महिन्यांपर्यंत कोणतेही धागेदोरे सापडले नव्हते.

…आणि २००९ साली केली अटकेची कारवाई

सौम्या यांच्या हत्येचे प्रकरण मागे पडल्यानंतर २३ मार्च २००९ रोजी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक अशा तिघांना अन्य एका लूटमार आणि हत्या प्रकरणात अटक केले. आयटी एक्झिक्युटिव्ह जिगिशा घोष यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. जिगिशा यांचे वसंत विहार येथून अपहरण झाले होते. काही दिवसांनंतर हरियाणातील सुरजकुंड येथे त्यांचा मृतदेह आढळला होता.

जिगिशा मृत्यूप्रकरणाची चौकशी करताना लागला सुगावा

जिगिशा यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांना सौम्या यांच्या हत्याप्रकरणाचे काही धागेदोरे सापडले. चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी हे सौम्या यांच्या हत्याप्रकरणात सामील होते, असे पोलिसांना समजले. पोलिसांनी याआधी इंडियन एक्स्प्रेसला याबाबत सविस्तर माहिती दिली होती. “आम्ही सौम्या यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी आमच्यासोबत अजय कुमार नावाचा आणखी एक साथिदार होता. २००९ साली आम्ही एका टॅक्सी चालकालाही लुटल्यानंतर मारले होते, असे आरोपींनी आम्हाला सांगितले,” असे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या या माहितीनंतर पोलिसांनी नंतर अजय सेठी या आरोपीलाही अटक केले होते.

पोलिसांनी असे केले पुरावे जमा

सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला. जिगिशा यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले होते. या पिस्तुलातील गोळ्या आणि सौम्या यांच्यावर झाडण्यात आलेली गोळी यांच्यात साम्य आढळले. पोलिसांनी पुढे सौम्या यांच्यावर हल्ला करताना आरोपींना वापरलेली वॅग्नर कारदेखील जप्त केली. या सर्व पुराव्यांमुळे सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येमध्ये जिगिशा यांच्या मृत्यूप्रकरणातील आरोपींचाच समावेश आहे, हे पोलीस सिद्ध करू शकले.

रात्री मद्यप्राशन करून लुटमार करायचे

अधिक तपास केल्यानंतर अटक केलेले आरोपी हे इतर गुन्ह्यांमध्येही सामील होते, असे पोलिसांना आढळले. “हे आरोपी मालवीय नगर या परिसरात राहायचे. ते रात्री मद्यप्राशन करायचे आणि रस्त्यांवर कारमध्ये फिरायचे. रात्रीच्या अंधारात महिला किंवा टॅक्सी चालक दिसल्यास ते हल्ला करून लुटमार करायचे. सर्व आरोपींनी दिलेल्या जबाबातून सौम्या यांच्या हत्येवेळी ते सर्वजण घटनास्थळी उपस्थित होते, याचादेखील आम्ही शोध लावू शकलो,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते.

…आणि २०११ साली आरोपपत्र दाखल

हा सर्व तपास केल्यानंतर पोलिसांनी २०११ साली या सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात मकोका गुन्ह्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केले. पुरव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता असल्यामुळे आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान २०११ सालापासून या प्रकरणात सुनावणी सुरू होती. हे आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. गेल्या अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर आता न्यायालयाने आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक आणि अजय कुमार हे दोषी असल्याचा निर्णय दिला. अजय कुमारला चोरीची मालमत्ता स्वीकारणे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, गुन्हा करण्यास मदत करणे अशा आरोपांत दोषी ठरवण्यात आले.

चौघांना जन्मठेप, एकाला तीन वर्षांचा कारावास

दरम्यान, न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक आणि अजय कुमार यांना जन्मठेप तर पाचवा दोषी अजय सेठीला तीन वर्षांच्या सामान्य कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह न्यायालयाने कपूर, शुक्ला, मलिक आणि कुमार यांना प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपयांचा आणि सेठीला सात लाख २५ हजारांचा रुपयांचा दंड ठोठावला आहे.