गेल्याच आठवड्यात, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या ग्वाल्हेर दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंधिया कुटुंबाला लक्ष्य करणारी पोस्टर्स शहरभर लावण्यात आली होती. ज्योतिरादित्य सिंधिया, २०२० मध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले, त्याच्याशी या फलकबाजीचा संबंध होता. २०२० साली केलेल्या पक्षबदलाच्या पार्श्वभूमीवर सिंधिया कुटुंबावर ‘गद्दारी’चा (विश्वासघाताचा) आरोप पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पोस्टर्सवर नमूद करण्यात आलेल्या मजकुरात “१८५७ साली राणी लक्ष्मीबाईंचा विश्वासघात; १९६७ साली काँग्रेसचे मुख्यमंत्री डी. पी. मिश्रा यांचा विश्वासघात; २०२० साली काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा विश्वासघात,असा घटनाक्रम खोचक पद्धतीने देण्यात आला होता. या जाहीर फलकाने ग्वाल्हेरच्या पूर्वीच्या राजघराण्यातील “राजमाता” विजया राजे आणि त्यांचे पुत्र माधवराव (म्हणजेच ज्योतिरादित्य यांचे वडील) यांनी स्वतंत्र भारतात त्यांचे राज्य जोडल्यानंतरच्या काही वर्षांत काँग्रेसमध्ये सामील झाल्याच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानिमित्ताने या राजघराण्याचा इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य भारत ते मध्य प्रदेश आणि जिवाजीराव सिंधिया

स्वातंत्र्यानंतर, मध्य भारत २८ मे १९४८ रोजी अस्तित्वात आला, विजयाराजे यांचे पती जिवाजीराव सिंधिया हे त्या प्रांताचे ‘राजप्रमुख’ किंवा ‘राज्यपाल’ होते. फझल अली यांच्या नेतृत्वाखालील राज्य पुनर्रचना आयोगाच्या आधारे, मध्य भारत १ नोव्हेंबर १९५६ रोजी मध्यप्रदेशात विलीन झाला आणि जिवाजीरावांनी त्यांचा दर्जा गमावला तसेच त्यांची ‘प्रजा’ ही स्वतंत्र भारताची नागरिक झाली.

आणखी वाचा : गांधीजी, गुजरात विद्यापीठ आणि ग्रामशिल्पी ! २१ व्या शतकातील ग्रामविकासाची नवी गुंफण

जिवाजीराव आणि हिंदू महासभा

त्या कालखंडात, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस देशभरात प्रबळ राजकीय शक्ती म्हणून अस्तित्त्वात होती तर तत्कालिन विरोधी पक्ष खूपच कमकुवत होते. राजकारणात फारसा रस नसलेल्या जिवाजीरावांना ‘हिंदू महासभे’बद्दल आपुलकी होती, विरोधी पक्षात सक्रिय असलेल्या आणि ग्वाल्हेर- गुणा प्रदेशात लोकप्रिय असलेला पक्ष म्हणून ‘हिंदू महासभे’ची ओळख होती आणि त्यांना जिवाजीरावांकडून संरक्षण मिळाले होते.

‘राजपथ से, लोकपथ पर’, गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी संपादित केलेल्या विजया राजे (जिवाजीराव सिंधिया यांच्या पत्नी) यांच्या आत्मचरित्रात, ‘राजमाता’ लिहितात: “जिवाजी यांनी काँग्रेसला कधीच सामान्य लोकांसाठी अनुकूल मानले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात उभ्या राहिलेल्या पक्षाच्या दिशेने असलेली त्यांची ओढ साहजिकच होती. परंतु जिवाजींच्या (हिंदुत्ववादी ‘महासभे’च्या) दृष्टिकोनाने मात्र पंतप्रधान नेहरू डिवचले गेले होते.

राजकीय चाणाक्ष विजयाराजे

राजकीयदृष्ट्या अधिक चतुर विजयाराजे यांना काँग्रेसला विरोध करणे शहाणपणाचे नाही, हे माहीत होते. बडोद्याचे तत्कालिन महाराज प्रताप सिंग यांनी काँग्रेसला विरोध केल्यामुळे त्यांना भोगाव्या लागलेल्या परिणामांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. सिंग यांनी तत्कालीन महाराजांची संघटना स्थापन केली होती, त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा प्रिव्हीपर्स (राजभत्ता) बंद करण्यात आला आणि त्यांचे सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात आले. हिंदू महासभेला आपल्या पतीच्या पाठिंब्यामुळे सरकारचा असाच रोष ओढवू घ्यावा लागू शकतो या भीतीने विजयाराजे यांनी केंद्र सरकारच्या बरोबरीने जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे राजघराण्यातील स्वारस्य लोकसभेच्या आठ जागा आणि पूर्वीच्या ग्वाल्हेर इस्टेटचा भाग असलेल्या विधानसभेच्या ६० जागांपर्यंत मर्यादित होते.

या भीतीच्या काळात, १९५६ मध्ये, ‘महाराजा’ मुंबईत असताना, विजया राजे यांनी नेहरू आणि त्यांची मुलगी इंदिराजी यांच्या भेटीची वेळ मागितली. ही भेट दिल्लीतील तीन मूर्ती, पंतप्रधानांच्या तत्कालिन निवासस्थान असलेल्या ठिकाणी झाली. त्यांच्या या भेटीबद्दल, विजयाराजे लिहितात, ‘त्यांनी नेहरू आणि इंदिराजींना आश्वासन दिले की, जिवाजीरावांना राजकारणात रस नाही आणि ते हिंदू महासभेला समर्थन किंवा वित्तपुरवठा करत नाहीत. पंडितजी, तुमचा काही गैरसमज झाला आहे, पण मी इथे हे स्पष्ट करण्यासाठी आले आहे की, माझ्या पतीला किंवा मला राजकारणात रस नाही. महाराज कधीच काँग्रेसला विरोध करणार नाहीत’. त्यांचे हे म्हणणे नेहरूंना फारसे पटले नाही. “तुमचे पती काँग्रेसविरोधी नाहीत असे माझे मत असले तरी याचा अर्थ ते काँग्रेससोबत आहेत असा होत नाही. कृपया पंतजी (गोविंद बल्लभ पंत, तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री) आणि शास्त्रीजी (लाल बहादूर शास्त्री, तत्कालीन रेल्वे आणि वाहतूक मंत्री) यांच्याकडे इंदिरासोबत (गांधी) जा आणि त्यांना सर्व काही सांगा,” असे उत्तर पंडित नेहरूंनी दिले होते.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

विजयाराजे यांच्या लिखाणावरून ते संभाषण अवघड ठरले हे स्पष्ट आहे. “त्यांनी (पंत, शास्त्री) माझे ऐकले आणि मला जिवाजीरावांना काँग्रेसच्या तिकिटावर (१९५७ मध्ये) लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगा, असे सांगितले. पण त्यांना राजकारणात रस नाही हे मी त्यांना वारंवार सांगितल्यावर त्यांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की, मलाही राजकारणात रस नाही, पण त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. ग्वाल्हेरमध्ये निवडणूक लढवण्यास नकार दिला तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे जिवाजीराव व विजयाराजे यांच्या लक्षात आले. अखेरीस विजयाराजे या काँग्रेसमध्ये जाण्यास तयार झाल्या आणि १९५७ मध्ये गुनामधून लोकसभेवर निवडून आल्या.

विजयाराजे यांचा प्रवास

खासदार असतानाही विजयाराजे यांना राजकीय घडामोडी आणि सभागृहाच्या कामकाजात फारसा रस नव्हता. “माझ्या पतीला मी राजकारण्यांमध्ये बसावे असे वाटत नव्हते, म्हणून मी अनेकदा (संसदेच्या कामकाजासाठी) दिल्लीला जात नसे.” असे त्या नमूद करतात. असे असले तरी ‘राजमाता’ यांनी लवकरच राजकारणात आपला ठसा उमटवला. १९६२ मध्ये त्यांनी पुन्हा ग्वाल्हेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्याच दरम्यान १९६१ मध्ये आजारी असलेल्या महाराज जिवाजीराव यांचे निधन झाले.

आणीबाणीचा काळ

१९६४ मध्ये नेहरूंच्या निधनाने देशात राजकीय मंथन झाले. राम मनोहर लोहिया (संयुक्त समाजवादी पक्षाचे), पंडित दीनदयाळ उपाध्याय (भारतीय जनसंघाचे आघाडीचे नेते) आणि इतर यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष एकत्र आले. मध्य प्रदेशमध्ये विजया राजे यांचे काँग्रेस नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा (त्यांचा मुलगा ब्रजेश मिश्रा हे नंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रधान सचिव झाले) यांच्याशी संबंध बिघडले आणि त्यांनी १९६६ मध्ये काँग्रेस सोडली. १९६७ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत, त्यांनी ग्वाल्हेरमधील करेरा विधानसभा मतदारसंघातून बीजेएसच्या तिकिटावर आणि गुना लोकसभा मतदारसंघातून ‘स्वतंत्र पक्षा’च्या (चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी स्थापन केलेल्या) उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी दोन्ही निवडणुका त्या जिंकल्या आणि मध्यप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेतील आपल्या जागेचा राजीनामा दिला. याच सुमारास त्यांचा मुलगा माधवराव सिंधिया यांनीही राजकारणात प्रवेश केला परंतु त्यांच्या आईच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत ते बीजेएसमधून काँग्रेसकडे गेले. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत, विजया राजे यांनी बीजेएसच्या तिकिटावर भिंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकलीही त्याचवेळेस त्यांनी गुना सोडले. त्याच वेळी २६ वर्षांच्या माधवराव यांनी बीजेएस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. ग्वाल्हेरची जागा बीजेएसचे दुसरे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी जिंकली होती.

आणखी वाचा : विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

२५ -२६ जून १९७५ च्या रात्री आणीबाणी लागू झाली तेव्हा विजयाराजे यांना तुरुंगात टाकण्यात आले. नंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आणि इंदिरा गांधी सरकारने त्यांना अटक केली जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर माधवराव नेपाळमधून भारतात परतले. “भैय्या (माधवराव) यांनी मला सांगितले की, जर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्यास नकार दिला तर मला पुन्हा तुरुंगात टाकले जाईल,” असे विजयाराजे त्यांच्या पुस्तकात नमूद करतात. आणीबाणीनंतर निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा माधवरावांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पुस्तकात, विजयाराजे आपल्या मुलाचे शब्द नमूद करताना लिहितात, “मी आता माझे निर्णय स्वतः घेईन. मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.” १९७७ च्या निवडणुकीत माधवरावांनी गुनातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही. विजयाराजे प्रतिस्पर्धी पक्षात असतानाही त्यांनी आपल्या मुलाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांचे आपल्या मुलाशी असलेले नाते अधिकच बिघडले.

भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक

एप्रिल १९८० मध्ये बीजेएसचा भाजपा म्हणून पुनर्जन्म झाला, तेव्हा विजया राजे त्या पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या आणि जानेवारी २००१ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या प्रमुख नेत्यांमध्ये होत्या. सप्टेंबर २००१ मध्ये विमान अपघातात मृत्यू होईपर्यंत माधराव काँग्रेसमध्ये राहिले. ज्योतिरादित्य यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेची जागा लढवली, परंतु त्यांना त्यांचेच माजी सहाय्यक के. पी. यादव यांच्यासमोर हार पत्करावी लागली, त्या नंतरच्याच वर्षी ते भाजपमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले व त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of gwaliors royal family vijayaraje madhavrao jyotiraditya scindia from congress to bjp svs
Show comments