हृषिकेश देशपांडे
भारतीय जनता पक्षात लोकप्रियतेच्या बाबतीत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले जाते. मात्र त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव आहे तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई कुप्पुस्वामी (के. अण्णामलाई). भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) या माजी अधिकाऱ्याची देशभर चर्चा आहे.
कचाथीवू प्रकरणामुळे चर्चेत
काँग्रेसने कचाथीवू हे भारतीय बेट श्रीलंकेला ‘दान केले’ असा प्रचार सध्या भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. यासंबंधी जुनी कागदपत्रे खणून काढण्याचे श्रेय अण्णामलाई यांना दिले जाते. त्यांनी माहितीच्या अधिकारातून याविषयीचा सविस्तर तपशील मिळवला. भाजपसाठी तो निवडणूक प्रचाराचा शक्तिशाली मुद्दा बनला. भाजपवर हिंदी भाषिक पट्ट्यातील पक्ष असा शिक्का बसल्याने तमिळनाडूत पक्षाचे अस्तित्व जेमतेमच. मात्र अण्णामलाई यांनी मेहनतीने गेल्या दोन वर्षांत तमिळनाडूत भाजपला एक पर्याय म्हणून पुढे आणले. राज्यातील सत्तारूढ द्रमुक तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकला अण्णामलाईंच्या ताकदीची दखल घ्यावी लागते.
आणखी वाचा-विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
पोलीस सेवेतून राजकारणात
३९ वर्षीय अण्णामलाई बंगळूरुत पोलीस उपायुक्त होते. ‘दक्षिणेतील सिंघम’ अशी त्यांची ओळख आहे. सेवेचा राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले. विविध भाषांमध्ये उत्तम संवादकौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य. इतिहास तसेच सांस्कृतिक घडामोडींची अचूक माहिती, भविष्यातील योजनांच्या आराखड्याची मांडणी याद्वारे जनतेत ते लोकप्रिय झाले. ८ जुलै २०२१ रोजी तमिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. गेले आठ ते नऊ महिने त्यांनी ‘एममएन मक्कल’ म्हणजेच ‘माझी भूमी, माझे लोक’ ही पदयात्रा काढली. तमिळनाडूतील विधानसभेच्या सर्व २३४ मतदारसंघांतून त्यांचा प्रवास झाला. या यात्रेच्या समारोपाला खास पंतप्रधान आले होते, त्यांनी अण्णामलाई यांचे विशेष कौतुक केले. ज्या राज्यात शहरी भागापलीकडे भाजप फारसा ठाऊक नव्हता, तो या यात्रेने तमिळनाडूत परिचित झाला. आता मतांमध्ये त्याचे परिवर्तन किती होईल हे सांगता येत नसले तरी, राज्यात एक राजकीय शक्ती म्हणून भाजप पुढे आला. त्याचे श्रेय अण्णामलाई यांचेच आहे. अण्णा द्रमुकच्या मदतीने आजवर भाजपने राज्यात लोकसभा किंवा विधानसभेला काही जागा जिंकल्या. मात्र फारसा विस्तार झाला नाही. आता दक्षिण तमिळनाडूत भाजपची ताकद वाढल्याचे सांगितले जाते. यंदा लोकसभेला भाजप राज्यातील ३९ पैकी २३ जागा लढवत आहे. पट्टल मक्कल काची हा प्रमुख मित्रपक्ष. उर्वरित छोटे पक्ष या आघाडीत आहेत. या आघाडीचे नेतृत्व अण्णामलाई हेच राज्यभर फिरून करत आहेत.
लोकसभेला चाचणी
फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप तिसऱ्या स्थानी राहिला. त्यावेळीच अण्णामलाई यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसली. काही महिन्यांपूर्वी अण्णा द्रमुक राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. त्याचे खापर त्यांनी अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर फोडले. मात्र भाजप श्रेष्ठींनी अण्णामलाई यांची पाठराखण करत, अण्णा द्रमुक आघाडीत राहावा यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. भाजपने लोकसभेला दक्षिणेकडील तमिळनाडू तसेच केरळ या दोन राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही ३९ जागा असलेले तमिळनाडू सर्वात मोठे राज्य आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एकच जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अण्णा द्रमुकच्या रूपात जिंकता आली. विरोधी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५३ टक्के तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३० टक्के मते मिळाली. त्यातही अण्णा द्रमुकला २० टक्के तर भाजपला जेमतेम चार टक्के मते पडली. लोकसभेला यश मिळवायचे असेल तर द्रमुक तसेच अण्णा द्रमुकची २० टक्के वळवावी लागतील. तरच एक ते दोन जागा जिंकता येतील. त्यातही द्रमुकची मते मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे कठीण आहे. अण्णा द्रमुककडे जयललितांच्या पश्चात तोलामोलाचा नेता नसल्याने भाजपला त्यांची काही मते किमान लोकसभेला मिळतील अशी अपेक्षा आहे. अण्णामलाई हे प्रतिष्ठेच्या कोईम्बतूर मतदारसंघातून भाग्य अजमावत आहेत. डाव्यांकडील ही जागा लढवण्यासाठी द्रमुकने आपल्याकडे घेतली. त्यांच्या दृष्टीने अण्णामलाई यांचा पराभव महत्त्वाचा आहे. अगदी त्यांचा अर्ज छाननीत बाद व्हावा यासाठी खटाटोप करण्यात आले. आरोप-प्रत्यारोप झाले. यावरून विरोधकांतील अण्णामलाई यांची धास्ती लक्षात येते.
विधानसभा लक्ष्य
तमिळनाडूत अजून दोन वर्षांनी म्हणजेच २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामध्ये भाजप विजय मिळवेल असे अण्णामलाई सातत्याने सांगत आहेत. सध्या भाजपचे चार आमदार आहेत. गेल्या म्हणजेच २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २० जागा लढत अण्णा द्रमकुच्या मदतीने चार जागा जिंकल्या. मते मिळाली होती तीन टक्के. ही आकडेवारी पाहता भाजप द्रमुकला हरवून सत्तेत येईल ही अतिशयोक्ती वाटते. मात्र अण्णामलाई यांनी राज्यात भाजपची एक प्रतिमा निर्माण केली आहे. गेली पाच दशके येथील राजकारण दोन द्रविड पक्षांभोवती फिरते आहे. यात आता एक स्पर्धक म्हणून तरी भाजपचे नाव घेतले जात आहे. संघ परिवाराबाहेरून येत अण्णामलाई यांनी पक्ष संघटनेत वजन निर्माण केले. समाजमाध्यमावर ते सक्रिय असतात. त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळेच त्यांनी जी यात्रा काढली त्याची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली तर समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाला. भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी अण्णामलाई यांचे संघटनकौशल्य ओळखले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सहप्रभारी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. काही महिन्यांपूर्वीच दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद झाली. त्यातही जमिनीवर बसून टिपण घेत असलेल्या अण्णामलाई यांची छायाचित्रे समाजमाध्यमावर सर्वदूर पसरली. अर्थात साऱ्याच बाबी सकारात्मक आहेत अशातील भाग नाही. त्यांच्या कार्यपद्धतीवर राज्यातील पक्षांतर्गत विरोधकांनी टीकाही केली होती. मात्र हिंदुत्व, तमिळ संस्कृती, त्याला विकासाची जोड याच्या आधारे अण्णामलाई राज्यात भाजपच्या रूपाने नवा पर्याय उभा करू पाहात आहेत. लोकसभेला दक्षिणेत कर्नाटकपाठोपाठ जर तमिळनाडूत भाजपने काही जिंकल्या तर श्रेय अण्णामलाईंना मिळेल. त्याचबरोबर पक्षातही त्यांचे वजन आणखी वाढेल.
hrishikesh.deshpande@expressindia.com