भारतीय सिनेसृष्टीत पौराणिक कथांनी नेहमीच मध्यवर्ती भूमिका बजावलेली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला नाग अश्विनचा कल्की २८९८ एडी (Kalki 2898 AD) हा सिनेमाही त्याच्या आगळ्यावेगळ्या कथानकासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात भविष्यातील सुमारे ९०० वर्षांचा कालखंड दाखविण्यात आला आहे. आजवर कोणत्याही भारतीय चित्रपटात वापरण्यात न आलेल्या जगावेगळ्या व्हिज्युअल इफेक्ट्सनी प्रेक्षकांना प्रेमात पाडले आहे. या पौराणिक कथेतील अश्वत्थाम्याची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. अश्वत्थामा हा भारतीय पुराणकथेतील प्रसिद्ध चिरंजीव आहे. त्यामुळे भारतीय पुराकथांमधील चिरंजीव ही संकल्पनाही विशेष चर्चेत आली आहे.
अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
पुराणातील सात चिरंजीव
चिरंजीव या संस्कृत शब्दाचा अर्थ दीर्घायुषी असा आहे. चिरंजीव म्हणजे अमरत्त्व प्राप्त झाले आहे अशी व्यक्तिमत्त्वे. लेखक रमेश सोनी यांनी त्यांच्या ‘द सेवन इमॉर्टल्स’ (२००३) या ग्रंथात भारतीय पौराणिक कथांमधील सात प्रसिद्ध चिरंजीवांची माहिती दिलेली आहे. या सात चिरंजीवांमध्ये अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचारी आणि परशुराम यांचा समावेश होतो. ‘द इटरनल गार्डियन्स ऑफ हिंदूइझम’चे लेखक सागर शर्मा लिहितात, “या चिरंजीवांचा उल्लेख महाभारत आणि रामायणासारख्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. या संदर्भानुसार हे चिरंजीव वैश्विक कार्यात ईश्वरी शक्तींना मदतनीस ठरतात.
कल्की या सिनेमात अश्वत्थामाच्या निमित्ताने हेच दाखवण्यात आले आहे. कल्की या विष्णूच्या दहाव्या अवताराच्या जन्माची पार्श्वभूमी अश्वत्थामा तयार करतो. या चित्रपटात अश्वत्थामा महाभारतातील घटनांचा एक जिवंत दुवा म्हणून काम करतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये चिरंजीव असलेल्या प्राणी- पक्षी- वनस्पतींचेही वर्णन करण्यात आलेले आहे. यात नारदांना रामायण सांगणारा (कावळा) काक भुशुण्डि, प्रलय किंवा महापुरात टिकणारे अक्षय-वट (वड), समुद्रमंथनातील शेष इत्यादी काही प्रसिद्ध उदाहरणांचा समावेश होतो. ही उदाहरणे हिंदू संस्कृतीतील अमरत्वाच्या संकल्पनेचे व्यापक स्वरूप दर्शवतात. ‘द इमॉर्टल्स’ (२०१६) या शीर्षकाच्या एका ब्लॉगमध्ये, लेखक आणि लोकप्रिय मिथकशास्त्र अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी या चिरंजिवांचे महत्त्व विशद केले आहे. हे चिरंजीव आपल्या अस्तित्त्वाने या अस्थिर जगात स्थायित्त्व आणि अमरत्त्व प्रस्थापित करतात असे पट्टनायक लिहितात.
चीन ते इजिप्त: चिरंजीवांचे आकर्षण
चिनी संस्कृतीतही चिरंजीव ही संकल्पना अस्तित्त्वात आहे. त्यांच्या पौराणिक कथांमध्ये आठ चिरंजीव आढळतात. यात प्राण्यांचाही समावेश आहे. डब्ल्यू पर्सेव्हल येट्स हे लंडन विद्यापीठात चिनी कला आणि पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी चिनी संस्कृतीतील चिरंजीव या संकल्पनेवर संशोधन केले आहे. ‘द जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’, १९१६ मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले होते. ते लिहितात, काही संदर्भांनुसार या आठ चिरंजीवांची संकल्पना युआन राजवंशाच्या (१२७१-१३६८) कालखंडात सुरू असावी. परंतु, प्रत्यक्षात मात्र त्यापूर्वीच ही संकल्पना अस्तित्त्वात होती याचे पुरावे सापडतात, कदाचित तांग राजवंशाच्या (६१८-९०७) काळातही ही संकल्पना अस्तित्त्वात होती. आठ चिरंजीवांपैकी प्रत्येकाची एक विशेष शक्ती आणि प्रतीक आहेत, ही प्रतीक चिनी संस्कृतीत महत्त्वाची मानली जातात. या शक्ती आणि प्रतीक पुरुष आणि स्त्रिया, श्रीमंत आणि गरीब, वृद्ध आणि तरुण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच अनेक कथा, चित्र आणि सजावटीत आढळून येतात. त्यांना शुभेच्छा आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
अधिक वाचा: फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?
चिरंजीव प्राण्यांची संकल्पना प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतही आहे. इतिहासकार आणि लेखक पॉल पिएरेट यांनी प्राचीन इजिप्शियन लोकांमधील पुनरुत्थानाचा सिद्धांत (The Dogma of the Resurrection among the Ancient Egyptians (1885)) या लेखात इजिप्शियन लोकांना मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल असलेल्या आकर्षणाची माहिती दिली आहे. या संस्कृतीचा अमरत्त्वाच्या संकल्पनेवर विश्वास होता, त्याचा त्यांच्या कला आणि दैनंदिन जीवनावर सखोल परिणाम झाला. अमरतत्व हे सर्वांसाठी नसते, अशी त्यांची धारणा होती. एखादी व्यक्ती अमरत्त्वासाठी योग्य आहे का? याची पडताळणी केली जात होती. ‘हॉल ऑफ माट’मध्ये ‘हृदयाचे वजन’ करणे हा समारंभ मध्यवर्ती भाग होता. यात मृत व्यक्तीचे हृदय सत्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंखाबरोबर तोलले जाते. ही चाचणी उत्तीर्ण करणाऱ्याला ओसिरिसच्या दैवी क्षेत्रात सामील होण्याची, रा सोबत प्रवास करण्याची, स्टार होण्याची किंवा इच्छेनुसार आकार बदलण्याची परवानगी दिली जात होती. अशाप्रकारे, निरनिराळ्या पौराणिक कथांमधील अमर प्राण्यांची कथा मानवतेच्या चिरंतन जीवनाबद्दलच्या आकर्षणाची एक झलक देतात आणि शाश्वत जगात कायमस्वरूपी राहण्याची आपली सामूहिक तळमळ प्रतिबिंबित करतात.
Kalki 2898 AD (कल्की २८९८ एडी) सारख्या आधुनिक चित्रपटांमधील पौराणिक संदर्भही आपल्याला मोहीत करतात, मिथक आणि समकालीन कथनामधील अंतर कमी करतात. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर असे चित्रपट मानवी इतिहासातील अनेक पैलूंचे दर्शन घडवतात.