अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्या जागी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना आगामी अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षामध्ये नवे चैतन्य संचारले आहे. हॅरिस या बायडेन यांच्यापेक्षा अधिक आक्रमक ठरत असताना ट्रम्प काहीसे ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र तयार झाले आहे. जनमत चाचण्यांमध्ये आतापर्यंत मागे असलेल्या हॅरिस आता ट्रम्प यांना मागे टाकू लागल्याचे दिसत असताना ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा अधिक वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताज्या जनमत चाचणीचा निष्कर्ष काय?

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंतच्या सर्वच चाचण्यांमध्ये पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र बायडेन यांच्या जागी हॅरिसना उमेदवारी मिळाल्यानंतर चित्र झपाट्याने बदलले. गुरुवारी जाहीर झालेल्या ‘इप्सॉस’च्या सर्वेक्षणानुसार हॅरिस यांना ४२ टक्के तर ट्रम्पना ३७ टक्के जनतेचा पाठिंबा आहे. यापूर्वीच्या ‘इप्सॉस’ सर्वेक्षणात दोघांमध्ये तीन टक्क्यांचा फरक होता. त्यात झालेली दोन टक्क्यांची वाढही महत्त्वाची आहे. कारण ‘इप्सॉस’ने रॉयटर्सच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे सर्वेक्षण केले असून त्यात तीन टक्के त्रुटी राहण्याची शक्यता गृहित धरली होती. आता ही त्रुटी राहिली, तरीदेखील हॅरिस यांनाच अधिक पसंती असल्याचे दिसते. दुसरीकडे अपक्ष उमेदवार रॉबर्ट केनेडी ज्युनिअर यांची लोकप्रियता १० टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. इप्सॉस’च्या अन्य एका सर्वेक्षणानुसार, गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांत सर्वात कमी अंतर राहिलेल्या ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांत ४२ विरुद्ध ४० टक्क्यांनी हॅरिस आघाडीवर आहेत.

हेही वाचा >>> ‘या’ देशात गुन्हेगारांची संख्या शून्यावर; तुरुंगातील कर्मचार्‍यांवर बेरोजगारीचे संकट; काय आहे कारण?

हॅरिस यांच्या आक्रमकतेचा फायदा?

जोपर्यंत बायडेन विरुद्ध ट्रम्प अशी लढत होती, तोपर्यंत ट्रम्प हे अधिक आक्रमक असल्याचे जाणवत होते. विशेषत: पहिल्या अध्यक्षीय वादविवादात बायडेन यांनी पारच नांगी टाकल्याचे दिसले. त्यानंतरच डेमोक्रॅटिक पक्षात खऱ्या अर्थाने उमेदवार बदलाची चर्चा सुरू झाली आणि ज्येष्ठ नेत्यांपासून सामान्य सदस्यांपर्यंत, अनेकांनी बायडेन यांना माघार घेण्याचा सल्ला दिला. अखेर पक्षांतर्गत दबावापुढे झुकून बायडेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि अत्यंत झपाट्याने हॅरिस यांनी निवडणुकीचे लगाम आपल्या हाती घेतले. या काळात ट्रम्प प्रचारयंत्रणा बुचकळ्यात पडल्याचे स्पष्ट दिसत होते. याच काळात ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या ‘कृष्णवर्णीय’ असण्यावर एका मुलाखतीत शंका उपस्थित केल्यानंतर हॅरिस यांनी अत्यंत आक्रमकपणे त्याचा प्रतिवाद केला. या घटनेनंतर ट्रम्प यांना ही लढाई आधी वाटत होती तितकी सोपी जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. आता १० सप्टेंबरला ट्रम्प विरुद्ध हॅरिस यांची पहिली अध्यक्षीय वादचर्चा होणार आहे. त्यानंतरही कदाचित दोन-तीन वेळा हे दोन्ही उमेदवार आमनेसामने येतील. शिवाय टिम वॉल्झ आणि जे. डी. व्हान्स या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्येही जाहीर वादचर्चा होण्याची शक्यता आहे. यात हॅरिस-वॉल्झ किती आक्रमक राहतात, याचा नोव्हेंबरच्या निकालावर निश्चित परिणाम होणार आहे.

हेही वाचा >>> विकास प्रकल्पांसाठी केलं जाणारं वृक्ष प्रत्यारोपण का फसतं?

ट्रम्प-हॅरिस लढतीवर रिपब्लिकन्सचे म्हणणे काय?

ट्रम्प यांचे दीर्घकाळ सल्लागार असलेले कोरी लेवांडोस्की यांनी हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे स्पर्धा बदलल्याचे मान्य केले. बायडेन यांचा अत्यंत सहज पराभव करता येईल, याची खात्री ट्रम्प प्रचारयंत्रणेला होती. बायडेन यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार असताना ‘डावी’कडे झुकलेल्या विचारसरणीवरून हॅरिस यांना रिपब्लिकन पक्षाने लक्ष्य केले होते. मात्र आता ट्रम्प-हॅरिस या लढतीत या टिकेला वेगळे परिमाण प्राप्त झाल्याचे रिपब्लिकन नेते खासगीत मान्य करू लागले आहेत. बायडेन यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल निर्माण झालेल्या शंका या ‘ट्रम्प कॅम्प’ला अनुकूलच होत्या. मात्र हॅरिस या अधिक कडव्या विरोधक ठरतील, असे कमीत कमी नऊ रिपब्लिकन्सना वाटत असल्याचे ‘रॉयटर्स’ने म्हटले आहे.

अमेरिकेतील प्रचाराचा ‘भूगोल’ कसा बदलला?

हॅरिस अचानकपणे प्रमुख भूमिकेत आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला केवळ प्रचाराचे मुद्देच नव्हे, तर ‘नकाशा’ही बदलावा लागला आहे. बायडेन उमेदवार असताना डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या मिनेसोटा, व्हर्जिनिया या राज्यांत ट्रम्प यांना संधी खुणावत होती. मात्र आता रिपब्लिकन पक्षाला या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे कारण उरलेले नाही. न्यूजर्सी या राज्याकडूनही आता अपेक्षा नसल्याची कबुली रिपब्लिकन पक्षाच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘रॉयटर्स’कडे दिली आहे. एका अर्थी, हॅरिस यांच्यामुळे रिपब्लिकनांमागे जाण्याची शक्यता असलेल्या राज्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या एका वरिष्ठ सल्लागाराने तर हॅरिस यांच्या विजयाची शक्यताही बोलून दाखविली आहे. निवडणुकीला ८७ दिवस बाकी असताना ट्रम्प यांचे ‘निवडणूक यंत्र’ घरघर करू लागल्याचे दिसत आहे. कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारपर्यंत हॅरिस यांनी निर्विवाद विजयाची शक्यताही निर्माण केलेली असू शकेल…

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamala harris is lead in public opinion against donald trump print exp zws