-ज्ञानेश भुरे
फ्रान्स आणि रेयाल माद्रिदचा आघाडीपटू करीम बेन्झिमाने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी ओर पुरस्कारावर मोहोर उमटवली. या पुरस्काराच्या इतिहासात युरोपियन खेळाडूंचे वर्चस्व राहिले असले, तरी गेली १३ वर्षे दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीने विक्रमी सात वेळा हा पुरस्कार पटकावला. मात्र, तेव्हा तो युरोपीय संघ बार्सिलोनाचा (स्पेन) सदस्य होता. या वेळी त्याला पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले नाही. तसेच माजी विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डो २०व्या स्थानी राहिला. परंतु यंदाच्या पुरस्काराची चर्चा बेन्झिमाभोवतीच फिरत आहे.
बॅलन डी ओर पुरस्काराची सुरुवात कशी झाली?
फ्रेंच फुटबॉल मासिकाच्या वतीने फुटबॉल जगतातील खेळाडूंच्या वर्षातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी बॅलन डी ओर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. फुटबॉल जगतातील हा सर्वांत जुना पुरस्कार असून, १९५६ पासून तो दिला जात आहे. फुटबॉलपटूच्या एका वर्षातील (जानेवारी ते डिसेंबर) कामगिरीवर जगभरातून मतांचा कौल घेत मुख्य पुरस्कारार्थींची निवड केली जाते. या वेळी प्रथमच केवळ गेल्या हंगामातील कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्याची निवड केली गेली. पुरस्काराच्या ६६ वर्षांत युरोपीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. हा पुरस्कार पटकाविणारा लायबेरियाचा जॉर्ज वी (१९९५) पहिला आफ्रिकन आणि युरोपीयन देशाबाहेरील खेळाडू ठरला. त्यानंतर ब्राझीलचा रोनाल्डो (१९९७) हा पुरस्कारा पटकाविणारा पहिला दक्षिण अमेरिकी खेळाडू ठरला.
बॅलन डी ओरचा विजेता कोण ठरवतो?
पुरस्कार आयोजकांनी विजेतेपदाच्या शर्यतीमधील खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर केल्यावर जगभरातील मतांचा कौल घेतला होता. ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत असणाऱ्या १०० देशातील पत्रकारांच्या मतांवरून पुरस्कारार्थीची अंतिम घोषणा करण्यात येते.
महिलांमध्ये हा पुरस्कार मिळविणारी पहिली खेळाडू कोण?
बॅलन डी ओर पुरस्काराचा इतिहास ६६ वर्षांचा असला, तरी महिलांसाठी या पुरस्काराची सुरुवात २०१८मध्ये झाली. नॉर्वेची अदा हेगेरबर्ग ही पहिली विजेती ठरली होती. त्यानंतर अमेरिकेच्या मेगन रॅपिनोने हा पुरस्कार पटकावला. २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्षे स्पेनची अलेक्सिया पुतेयास ही या पुरस्काराची विजेती ठरली. सलग दोन वर्षे पुरस्कार मिळविणारी अलेक्सिया पहिली खेळाडू आहे.
यंदा पुरस्कारासाठी बेन्झिमाची निवड का?
मेसी आणि रोनाल्डोच्या वलयातून बाहेर पडताना या वेळी बेन्झिमा, सेनेगल व बायर्न म्युनिकचा सादिओ माने, तसेच बेल्जियम व मँचेस्टर सिटीचा केव्हिन डीब्रूएने यांच्यात स्पर्धा होती. मात्र, बेन्झिमाची गेल्या वर्षातील कामगिरी सरस ठरली. बेन्झिमाने रेयाल माद्रिदसाठी ४६ सामन्यांत ४४ गोल केले. यामध्ये ला लिगा स्पर्धेतील २७ आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील १२ सामन्यांतील १५ गोलांचा समावेश होता. फ्रान्सच्या नेशन्स चषक विजेत्या कामगिरीतही बेन्झिमाचा मोलाचा वाटा राहिला.
मेसी, रोनाल्डोच्या वर्चस्वाला धक्का मानायचा का?
फुटबॉल जगतात गेल्या दशकभराहूनही अधिक काळ अर्जेंटिनाचा मेसी आणि पोर्तुगालचा रोनाल्डो यांचाच दरारा होता. फुटबॉल जगत म्हणजे जणू या खेळाडूंची मक्तेदारी झाली होती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या दोघांनाही आव्हान मिळू लागले आहे. याचा प्रत्यय या वेळच्या बॅलन डी ओर पुरस्कार सोहळ्यात आला. गेल्या १३ वर्षांत १२ वेळा हा पुरस्कार मेसी आणि रोनाल्डो यांच्यातच विभागला गेला. यात मेसीने सर्वाधिक ७ वेळा, तर रोनाल्डोने ५ वेळा हा पुरस्कार मिळविला आहे. केवळ २०१८ मध्ये लुका मॉड्रिच या क्रोएशियाच्या खेळाडूने हा पुरस्कार मिळविला होता. मात्र, त्या वेळी मेसी आणि रोनाल्डो किमान मानांकन यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये होते. या वेळी रोनाल्डो तीस खेळाडूंच्या यादीत २०वा होता. याहून धक्कादायक म्हणजे मेसीला पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले नाही. पुरस्काराच्या इतिहासात गेल्या सोळा वर्षांत प्रथमच या दोघांना विजयमंचावर स्थान मिळाले नाही.
यापूर्वी फ्रान्सच्या कोणत्या खेळाडूंनी या पुरस्कारावर मोहोर उमटवली?
फुटबॉल जगतातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर मोहोर उमटविणारा बेन्झिमा फ्रान्सचा पाचवा फुटबॉलपटू ठरला. विशेष म्हणजे २४ वर्षांनी फ्रान्सला हा बहुमान मिळाला. यापूर्वी १९९८ मध्ये फ्रान्सने विश्वचषक उंचावला होता, तेव्हा मध्यरक्षक झिनेदेन झिदान या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यापूर्वी रेमंड कोपा, मिशेल प्लॅटिनी, जीन-पिएर पापिन यांनीही हा पुरस्कार मिळविला होता. १९८२ ते १९८५ अशी सलग तीन वर्षे हा पुरस्कार पटकाविण्याचा पहिला मान फ्रान्सच्याच मिशेल प्लॅटिनी यांनी मिळविला होता.
हा पुरस्कार मिळविणारा सर्वात वयस्क खेळाडू कोण?
या पुरस्कारावर मोहोर उमटविणारा ३४ वर्षीय बेन्झिमा दुसरा सर्वात वयस्क खेळाडू ठरला. इंग्लंडचा स्टॅनले मॅथ्यूज हा पुरस्कार मिळविणारा सर्वात वयस्क खेळाडू आहे. स्टॅनलेने वयाच्या ४१व्या वर्षी हा पुरस्कार मिळविला. विशेष म्हणजे स्टॅनले बॅलन डी ओर पुरस्काराचा पहिला विजेता आहे.