रस्त्यांवर आकर्षक पद्धतीने विक्रीसाठी ठेवलेले खाद्यपदार्थ आपण मोठ्या चवीने खातो. त्यांची चवही आपल्याला हवीहवीशी वाटते. मात्र, आकर्षक रंग आणि चवीसाठी या पदार्थांमध्ये हानिकारक पदार्थ वापरले जात असावेत का, याचा विचारही आपण कधी केलेला नसतो. बरेचदा खाद्यपदार्थांची आकर्षकता वाढवण्यासाठी त्यामध्ये कृत्रिम रंग घातले जातात. मात्र, हे खाद्यरंग आपल्या आरोग्यासाठी धोकादायकही असू शकतात. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये कबाब, मासे अशा मांसाहारी पदार्थांसहित शाकाहारी पदार्थांमध्येही कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी आणली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. खाद्यपदार्थांना अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच त्यांची चव चटकदार करण्यासाठी त्यामध्ये कृत्रिम पदार्थ घालण्याचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे. मात्र, कृत्रिम पदार्थांच्या अशा वापरामुळे आरोग्याबाबतच्या चिंता वाढल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील आरोग्य विभागाने सोमवारी (२४ जून) कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. कृत्रिम खाद्यरंगांबाबत काय चिंता व्यक्त केल्या गेल्या आहेत? यामुळे नेमके काय नुकसान होते?
हेही वाचा : विश्लेषण : इंदिरा गांधींनी राबवलेली आणीबाणी नेमकी काय होती? कारणे कोणती? परिणाम काय?
कृत्रिम खाद्यरंगांवर बंदी
कर्नाटकमधील विविध माध्यमांनी दिलेल्या माहितीनंतर आणि लोकांच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, राज्यामध्ये खराब गुणवत्ता असलेल्या कबाब या खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे, त्यामध्ये कृत्रिम रंग वापरले जातात. या कृत्रिम रंगांमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आरोग्य विभागाने धडक कारवाई करत राज्यभरातील कबाब खाद्यपदार्थांचे ३९ नमुने गोळा केले. या नमुन्यांना प्रयोगशाळांमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या चाचणीनंतर असे उघड झाले की, त्यातील आठ कबाबचे नमुने कृत्रिम रंगांमुळे दूषित झाले होते. तसेच त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी असुरक्षित आणि धोकादायक होते. कबाबच्या ३९ नमुन्यांपैकी सात नमुन्यांमध्ये पिवळसर (सनसेट यलो) कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आला होता तर दुसऱ्या एका नमुन्यामध्ये गाजरजन्य लाल खाद्यरंग कारमॉइझीन आणि पिवळसर अशा दोन्ही रंगांचे नमुने आढळले होते. सनसेट यलो हा रंग केशरी आणि पिवळ्या रंगांचे मिश्रण असतो. तो सामान्यत: कँडी, सॉसेस, बेक केलेले खाद्यपदार्थ आणि फळांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येतो. दुसरीकडे, कारमॉइझीन हा लालसर रंग विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येतो. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, “फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट, २००६ आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड (फूड प्रोडक्ट्स, स्टँडर्ड्स अँड फूड ॲडीटीव्ह्ज्) रेग्यूलेशन, २०११ नुसार, अशा कृत्रिम पदार्थांचा वापर करणे ग्राहकांच्या आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक असू शकते.” या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामध्ये सात वर्षे ते जन्मठेप आणि दहा लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
आरोग्याला धोका
खाद्यरंगांचा वापर खाद्यपदार्थांना आकर्षक करण्यासाठी केला जातो. असा वापर करण्यास अलीकडेच सुरुवात झाली असे नाही. गेल्या अनेक शतकांपासून खाद्यरंगांचा वापर करण्यात येतो. कोळशाच्या डांबरापासून १८५६ मध्ये पहिला कृत्रिम खाद्यरंग विकसित करण्यात आला. आज हे रंग प्रामुख्याने पेट्रोलियमपासून तयार केले जातात. वर्षानुवर्षे शेकडो कृत्रिम खाद्यरंग आजवर विकसित केले गेले आहेत, परंतु त्यापैकी बरेच खाद्यरंग विषारी असल्याचे आढळले आहे. अमृता हॉस्पिटल, फरीदाबादच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. चारू दुआ यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “खाद्यरंगांचा दिलेल्या मर्यादेत, पण तरीही वारंवार वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. दुर्दैवाने पुरेशी माहिती नसलेले अशिक्षित लोक याचा अधिक वापर करून आरोग्याला धोका निर्माण करून घेत आहेत. मात्र, याची त्यांना जाणीवही नाही.” एन्व्हायर्नमेंट हेल्थ परस्पेक्टिव्ह जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सनसेट यलो आणि इतर तीन प्रकारच्या खाद्यरंगांच्या वापरामुळे ॲलर्जीक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. त्यामध्ये त्वचेला सूज येणे आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे अशा समस्या येऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले आणि डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांनी प्रकाशित केलेल्या २०२१ च्या एका अभ्यासानुसार, या कृत्रिम खाद्यरंगांच्या संपर्कात आल्याने मुलांमध्ये अतिक्रियाशीलता आणि इतर मज्जातंतू वर्तणुकीसंबंधीच्या समस्याही उत्पन्न होऊ शकतात.
हेही वाचा : ‘केरळ’चे नाव बदलून ‘केरळम’ करा! राज्य सरकारने का संमत केला आहे हा ठराव?
कर्नाटक सरकारची याआधीही कारवाई
मार्चमध्ये, राज्य सरकारने गोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीसारख्या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातली होती. या अन्नपदार्थांच्या निर्मितीमध्ये कर्करोगजन्य पदार्थ रोडामाइन-बी (Rhodamine-B) आणि टार्ट्राझिन (Tartrazine) वापरण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली. रोडामाइन-बी हा एक हानिकारक रासायनिक रंग देणारा पदार्थ आहे. याचा वापर टेक्स्टाईल उद्योगामध्ये कापडाला रंग देण्यासाठी, तसेच कागद उद्योगात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या रंगाच्या वापरामुळे चमकदारपणा येत असल्याने त्याचा वापर गोबी मंच्युरियन तसेच कॉटन कँडीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही केला जात होता. तर खाद्यपदार्थाला चमकदार नारिंगी किंवा आकर्षक पिवळा रंग देण्यासाठी टार्ट्राझिनचा वापर केला जात होता. फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) दिलेल्या माहितीनुसार, सिंथेटिक फूड कलरंट्सचा वापर खाद्यपदार्थ आणि पेये (FSSAI 2009) यांच्यामध्ये 100 ppm पेक्षा जास्त नसावा.