नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्यासाठी तयार असलेल्या ‘महाराज’ चित्रपटाविरोधात वादाची राळ उठली आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असून ब्रिटिशांच्या काळात घडलेल्या एका महत्त्वपूर्ण कायदेशीर खटल्याचे प्रामुख्याने चित्रण करतो. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान प्रमुख भूमिकेत आहे. मात्र, त्याच्या पहिल्याच चित्रपटाला वादाचे ग्रहण लागल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. या चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेनंतर गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी (१८ जून) या चित्रपटाच्या प्रदर्शनास तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुष्टीमार्गी वैष्णव संप्रदायाच्या अनुयायांनी या चित्रपटाविरोधात भूमिका घेतली असून बंदीची मागणी केली आहे. पुष्टीमार्गी वैष्णव हे भगवान कृष्णाचे भक्त मानले जातात. हा चित्रपट १८६२ सालच्या ‘महाराज मानहानी खटल्या’वर आधारित आहे. अभिनेता जुनैद खानने या चित्रपटात करसनदास मुळजी यांची भूमिका केली आहे. या चित्रपटात जुनैद खानबरोबरच जयदीप अहलावत, शर्वरी वाघ आणि शालिनी पांडे अशा अनेक कलाकारांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची यशराज फिल्म्स प्रोडक्शनद्वारे निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर हरकत घेणारी याचिका दाखल केल्यानंतर एक सदस्यीय खंडपीठाच्या न्यायाधीश संगीता विशेन यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनावरील अंतरिम स्थगिती बुधवारपर्यंत कायम राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे. करसनदास मुलजी कोण होते आणि त्यांच्याबाबतचा खटला काय होता, याची माहिती घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : लोकसभेचा हंगामी अध्यक्ष कोण असतो? त्याची निवड कशी केली जाते?

करसनदास मुलजी कोण होते?

करसनदास मुळजी हे गुजराती पत्रकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून १९ व्या शतकातील सनातनी रुढी-परंपरांवर आसूड ओढले. त्यांचा जन्म १८३२ साली तत्कालीन बॉम्बेमध्ये झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मावशीने त्यांचा सांभाळ केला. १८५३ मध्ये, मुलजी एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले. इथे त्यांना कवी नर्मद आणि शिक्षणतज्ज्ञ महिपतराम नीलकंठ यांच्यासारखे उल्लेखनीय गुजराती सुधारणावादी वर्गमित्र लाभले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाल्यामुळे मुलजी यांच्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या. त्यांना पाश्चिमात्त्य उदारमतवादी विचारांच्या प्रेरणेमधूनच भारतामध्येही प्रबोधनाची आवश्यकता वाटू लागली.

१८५१ पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. ‘रास्त गोफ्तार’ (सत्य सांगणारा) या एँग्लो-गुजराती वृत्तपत्रात ते काम करू लागले. या वृत्तपत्राची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. मुलजी हे स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या याच स्वतंत्र विचारांमुळे ते बरेचदा अडचणीतही आले. १८५३ मध्ये, त्यांनी एका साहित्यविषयक स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले होते. याबाबत त्यांच्या वयस्कर मावशीला समजल्यानंतर तिने त्यांना घराबाहेर काढले होते. त्यानंतर त्यांना केलर शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यांनी आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यानंतर १८५५ मध्ये मुलजी यांनी ‘सत्यप्रकाश’ नावाचे स्वत:चे मासिक सुरू केले. त्यांनी या मासिकाच्या माध्यमातून सनातनी परंपरांवर प्रश्न उपस्थित केले आणि समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याची बाजू लावून धरली. त्यांनी १८५७ मध्ये खास स्त्रियांसाठी ‘स्त्रीबोध’ नावाचे मासिक सुरू केले. मुलजींनी त्यांच्या एका पुस्तकात त्यांचा इंग्लंडप्रवासही शब्दबद्ध केला आहे.

महाराजा मानहानी खटला, १८६२

मुळजी यांनी आपल्या ‘सत्य प्रकाश’ या मासिकामध्ये लिहिलेला एक लेख वादग्रस्त ठरला होता. या लेखामध्ये त्यांनी धार्मिक गुरु महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागले. ‘हिंदुओनो असल धर्म अने हालना पाखंडी मतों’ अर्थात ‘हिंदूंचा खरा धर्म आणि आताची पाखंडी मते’ असे त्या लेखाचे शीर्षक होते. २१ सप्टेंबर १९६१ साली प्रकाशित झालेल्या या लेखामुळे बरेच वादंग माजले. या लेखामध्ये मुळजी यांनी हिंदू धर्मातील वल्लभाचार्य पंथाच्या प्रथांवर सडकून टीका केली होती. या पंथाचे धर्मगुरु अर्थात ‘महाराज’ हे धर्माच्या नावावर अनैतिक गोष्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या लेखात केलेल्या आरोपांनुसार, महाराज अर्थात धर्मगुरु हे आपल्या महिला भक्तांबरोबर लैंगिक संबंध ठेवतात. त्यातील बहुतांश महिला या विवाहित असतात. या महाराजांचे वर्तन व्यभिचारी असते, तसेच या महाराजांनी त्यांच्या भक्तांच्या बायकांचे तसेच मुलींचे चारित्र्य कलुषित केले असल्याचाही आरोप त्यांनी या लेखात केला.

हेही वाचा : भारतीय राजकारणात आणखी एक ‘गांधी’! प्रियंका काँग्रेस आणि भारताच्या राजकारणात किती प्रभाव पाडतील?

प्रिंटने दिलेल्या माहितीनुसार, पुष्टीमार्ग पंथाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचे नातू गोकूळनाथ यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये अनैतिक गोष्टींना प्रोत्साहन दिले असल्याचाही आरोप त्यांनी आपल्या लेखात केला होता. या लेखानंतर त्यावेळी मुंबईत असलेले सुरतमधील तरुण पुजारी जदुनाथ महाराज यांनी मुंबई न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला. मुळजी आणि त्यांचे प्रकाशक नानाभाई रानीना यांच्याविरोधात तब्बल ५० हजार रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. मुळजी हे स्वत: वैष्णव होते. तत्कालीन बॉम्बे सर्वोच्च न्यायालयामध्ये २५ जानेवारी १८६२ साली या खटल्याला सुरुवात झाली. हा वादग्रस्त खटला त्या काळात फारच गाजला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या साक्षीदारांची साक्ष ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेर मानहानीचा दावा फेटाळून लावला. तत्कालीन ब्रिटीश न्यायाधीश जोसेफ अर्नाल्ड यांनी एप्रिलमध्ये या खटल्याचा निकाल सुनावताना लिहिले की, “हा आपल्यापुढचा धर्मशास्त्राचा प्रश्न नाही! हा नैतिकतेचा प्रश्न आहे. प्रतिवादी आणि त्यांचे साक्षीदार ज्या तत्त्वासाठी वाद घालत आहेत, ते तत्त्व असे आहे की, जे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, ते धार्मिकदृष्ट्या बरोबर असू शकत नाही.” द प्रिंटने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने मुलजींना फक्त निर्दोष मुक्तच केले नाही तर त्यांना ११,५०० रुपये देऊन सन्मानितही केले. मात्र, हा खटला चालवण्यासाठी मुळजींना १४ हजार रुपयांचा खर्च आला होता.

पंतप्रधान मोदींनी उधळली होती स्तुतीसुमने

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी करसनदास मुळजी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने २०१० साली लिहिलेल्या एका लेखात नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, “समाजसुधारक आणि पत्रकार करसनदास मुळजी यांनी ‘सत्य प्रकाश’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. सर्व प्रकारच्या अन्यायाविरोधात तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृत्तीविरोधात लढण्यासाठी गुजरातने सत्याचा मार्ग स्वीकारला. सत्य बोलणे चुकीचे वा अपमानास्पद नसते, कधी ना कधी सत्य बाहेर येतेच. सत्यमेव जयते.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karsandas mulji journalist praised by modi netflix maharaj film controversy vsh