उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गुरुवारपासून ‘काशी-तमिळ संगमम’ या उत्सवाला सुरुवात होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतीक पैलू साजरे केले जाणार आहेत. प्राचीन काळापासून काशी आणि तामिळनाडूचे अतुट नाते आहे. या दोन्ही ठिकाणांवरील शंकरांच्या मंदिराबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. १५ व्या शतकात पराक्रमा पांड्या या राजाचे मदुराईवर राज्य होते. या राजाला भगवान शंकराचे मंदिर बांधायचे होते. त्यासाठी शिवलिंग आणण्यासाठी या राजाने काशीला प्रस्थान केले. परतत असताना वाटेत हा राजा विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबला. पुन्हा प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शिवलिंग घेऊन जाणाऱ्या गायीने जागेवरुन हलण्यास नकार दिला.
विश्लेषण: विकास की स्थानिकहित? गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड लोहखाणीविरोधात असंतोष का?
परमेश्वराची इच्छा समजून राजा पांड्याने याच ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. तेव्हा पासून हे ठिकाण सिवाकासी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भाविक काशीला दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी राजाने तामिळनाडूच्या दक्षिण-पश्चिम भागातील तेनकाशी जिल्ह्यात काशी विश्वनाथर मंदिर बांधले. हे मंदिर केरळ राज्याच्या सीमेलगत आहे.
काशी आणि तामिळनाडूमधील संबंधांचा इतिहास काय आहे?
काशी आणि तामिळनाडूचे संबंध सखोल आणि जुने आहेत, असे बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे डॉ. विनय कुमार यांनी सांगितले आहे. पांड्या राजानंतर अनेक वर्षांनी अधिवीर राम पांड्यान या राजाने काशीच्या तिर्थयात्रेवरुन परतल्यानंतर तेनकाशीमध्ये १९ व्या शतकात भगवान शंकराचे आणखी एक मंदिर बांधले, अशी माहिती कुमार यांनी दिली आहे.
तूतूकुडी जिल्ह्यातील संत कुमार गुरुपारा यांनी वाराणसीतील केदारघाट आणि विश्वेश्वरलिंगम यांच्या अभिषेकासाठी जागा मिळविण्यासाठी काशी संस्थानाशी वाटाघाटी केल्या होत्या. ‘काशी कळंबागम’ या काशीवरील कवितांचा संग्रहही त्यांनी रचला, असे कुमार यांनी सांगितले. तेनकाशीमधील काशी विश्वनाथर मंदिराशिवाय तामिळनाडूत शंभराहून अधिक शंकराच्या मंदिराचे नाव काशी ठेवण्यात आले आहे. यातील जवळपास १८ मंदिरं एकट्या चेन्नईमध्ये आहेत. “रामेश्वरममधील भाविक काशीला दर्शनासाठी जाण्यापूर्वी कोटितीर्थ येथील मंदिरात स्नान करतात. त्यानंतर काशीमधील गंगाजलाने रामेश्वरमधील मंदिरात अभिषेक करतात. काशी आणि रामेश्वरम या तिर्थयात्रेसाठी भाविकांना सहा महिन्यांचा कालावधी लागतो”, अशी माहिती भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ चामू क्रिष्णा शास्त्री यांनी दिली आहे.
‘काशी-तामिळ संगमम’ काय आहे?
काशी आणि तामिळनाडूच्या संस्कृतीचा दोन्ही राज्यांकडून उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव ‘काशी-तमिळ संगमम’ म्हणून प्रसिद्ध आहे. दोन्ही राज्यांमधील ज्ञान आणि सांस्कृतीक परंपरेची सांगड घालण्यासाठी आणि नागरिकांचे संबंध दृढ करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवासाठी तामिळनाडूतून दोन हजार ५०० लोक वाराणसीमध्ये दाखल होणार आहेत. हे लोक अयोध्या आणि प्रयागराजचा दौरा करणार आहेत.
विश्लेषण: ‘शत्रू संपत्ती’ विकून मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत, ही संपत्ती नेमकी असते तरी काय?
‘बीएचयू’ आणि ‘आयआयटी मद्रास’ यांच्या भागीदारीतून यंदा वाराणसीत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि वाराणसी प्रशासनाव्यतिरिक्त सांस्कृतिक, पर्यटन, रेल्वे, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयांकडून या उत्सवावर देखरेख करण्यात येत आहे. वाराणसी आणि कांचिपुरम रेशमी साड्या आणि कापडाची या उत्सवात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.