कृत्रिम तंत्रज्ञानात (एआय) आज मानवाने मोठी प्रगती केली आहे. एआयमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती होत आहे. फॅशन आयकॉन होण्यापासून ते स्कॅमर्सना मागे टाकणाऱ्या व्हर्च्युअल आजीपर्यंत अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. वृत्तवाहिन्यांवरही एआय वार्ताहर पाहायला मिळत आहेत. आता सोशल मीडियावर चक्क एआय आईची चर्चा सुरू आहे. एआय मॉम इन्फ्लुएन्सर काव्या मेहरा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. कोण आहे काव्या मेहरा? एआय मॉम म्हणजे नक्की काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आधुनिक मातृत्वाचे मूर्त रूप”

काव्या मेहरा ही टॅलेंट मॅनेजमेंट फर्म कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कने तयार केलेली व्हर्च्युअल व्यक्तिरेखा आहे. ती भारतातील पहिली एआय मॉम इन्फ्लुएन्सर आहे. मातृत्वाचे सर्व पैलू प्रेक्षकांना दाखविण्यासाठी तिला डिझाईन करण्यात आले आहे. “भारताची पहिली एआय मॉम, वास्तविक मॉम्सद्वारे समर्थित,” असे काव्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिले आहे. तिचे आतापर्यंत ३५० हून अधिक फॉलोअर्स आहेत. काव्या अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी शेअर करते. पारंपरिक पदार्थ तयार करण्यापासून ते दिवाळीसारखे सण साजरे करण्यापर्यंत आणि पेंटिंग ते स्किनकेअरपर्यंत दिनचर्येतील सर्व गोष्टी ती शेअर करते. तिने अनेक गोष्टी शेअर केल्या, ज्या पालकत्वाच्या विविध पैलूंशी संबंधित आहेत.

हेही वाचा : अल्लू अर्जुनवर का झाला गुन्हा दाखल? प्रीमियरदरम्यान महिलेच्या मृत्यूचं प्रकरण काय आहे?

एआय मॉम काव्यादेखील गरोदर असताना तिला कोणत्या प्रकारची आई व्हायचे आहे, याविषयीचे विचारदेखील सोशल मीडियावर मांडते. “एक आई जी भावनिकदृष्ट्या जुळलेली आणि स्वत:वर अवलंबून राहू शकते,” असे तिने एक व्हिडीओ शेअर करीत सांगितले. ती “काव्या मेहरा हा केवळ डिजिटल अवतार नाही; ती आधुनिक मातृत्वाचे मूर्त स्वरूप आहे. काव्या एआय समर्थित असली तरी मानवी अनुभवांमध्ये खोलवर रुजलेली आहे,” असे कंपनीने ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. ती आपल्या गर्भधारणेपासून तर मुलांच्या संगोपनापर्यंत सर्व गोष्टी शेअर करते.

एआय इन्फ्लुएन्सरची भूमिका काय?

एआय मॉम हे व्हर्च्युअल पात्र वापरकर्त्यांशी भावनिकरीत्या जुळले जावे, या उद्दिष्टाने तयार करण्यात आले आहे. कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक व ग्रुप सीईओ विजय सुब्रह्मण्यम यांनी ‘सीएनबीसी-टीव्ही १८’ला सांगितले, “आम्हाला वास्तविक जीवनातील अनुभव भावनिकदृष्ट्या एआय कसे जाणून घेतो, या शक्यतांचा शोध घ्यायचा होता. काव्या हे व्हर्च्युअल पात्र विविध ब्रॅण्ड्ससाठी काम करू शकते आणि मातांचे आयुष्य लोकांसमोर आणू शकते.”

हेही वाचा : नवजात बालकांच्या शरीरावर प्राण्यासारखे केस, काय आहे ‘वेअरवॉल्फ सिंड्रोम’? 

कॉफी पिण्यापासून ते तिच्या बाळाला झोपवण्यापर्यंत, त्याचबरोबर मीटिंगमध्येही सहभागी होण्यापर्यंत काव्या मल्टीटास्किंग महिला कसे काम करतात हे लोकांना दाखवते. काव्याच्या पोस्ट्स असंख्य मातांचे दैनंदिन जीवन प्रतिबिंबित करतात. सुब्रह्मण्यम यांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, काव्या एआय समर्थित असल्यामुळे, तिच्यासाठी रीअल-टाइम डेटा जुळवून घेणे सोपे आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना काय हवे आहे किंवा काय बघायचे आहे, हे तिला लगेच कळते. “आम्ही नियमितपणे काव्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट मातांमधील ट्रेंडिंग संभाषणांनुसार अपडेट करतो आणि हे सुनिश्चित करून की, ती त्यांच्या दैनंदिन जीवनात जे घडत आहे, त्याच्याशी संबंधित असावी,” असेही त्यांनी सांगितले. ब्रॅण्डसाठी काव्या मेहरा ही गेम चेंजर आहे, असे कलेक्टिव्ह आर्टिस्ट्सने ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. ती त्यांना संबंधित सामग्रीद्वारे ग्राहकांशी गुंतण्यासाठी उपयुक्त कल्पना सुचवते, जे आजच्या डिजिटल जगात महत्त्वपूर्ण आणि फायद्याचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavya mehra indias first ai mom influencer rac