Kedarnath Temple history केदारनाथ मंदिर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. सध्या दिल्लीत या प्राचीन मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत या मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. परंतु, असे असले तरी उत्तरखंडातील संत समाज, स्थानिक लोक आणि पुजारी यांच्याकडून मात्र या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी विरोध झाला आहे. केदारनाथ हे प्राचीन ज्योतिर्लिंगाचे स्थान असून हिंदू धर्मात या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केदारनाथ धाम एकच आहे आणि ते एकच राहील… त्यामुळे या मंदिराची प्रतिकृती तयार करणं हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे, असं या मंदिराला विरोध करणाऱ्याचं म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिराचा इतिहास जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

केदारनाथ हिमालयातील शिवक्षेत्र

केदारनाथ हे हिमालयातील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, ते समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर मंदाकिनी नदीच्या तीरावर आहे. या प्रदेशाचे ऐतिहासिक नाव ‘केदारखंड’ असे आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चार धाम आणि पंच केदार यांचा एक भाग आहे आणि भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे क्षेत्र केदारनाथ आणि बद्रीनाथ या हिमालयातील दोन शिखरांमध्ये वसले आहे. याला केदारपुरी असेही म्हणतात. केदारनाथाचे मंदिर गावाच्या टोकास आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानले जाते.

पौराणिक आख्यायिका

केदारनाथाचे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. पाच पांडवांपैकी भीमाने इथले मंदिर बांधले, अशी आख्यायिका आहे. पौराणिक संदर्भानुसार कुरुक्षेत्रावरील विजयानंतर पांडव काशीला पापक्षालनासाठी आले होते. परंतु शंकराने त्यांना दर्शन दिले नाही. कुरुक्षेत्रावर त्यांच्याकडून झालेल्या अप्रामाणिकपणामुळे भगवान शिव प्रचंड संतापले होते. त्यांनी पांडवांना टाळण्यासाठी गढवाल प्रदेशात आश्रय घेतला. वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. पांडव आल्याचे समजताच भगवान शिवांनी नंदीचे रूप धारण केले. भीमाने तो नंदी शिवच असल्याचे ओळखले. भीमाने नंदीला पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचलित आख्यायिकेनुसार भीम आणि इतर पांडवांनी पूजा करताना शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाले. केदारनाथमध्ये त्यांचे वशिंड प्रकट झाले, तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये चेहरा दिसला, मध्यमहेश्वरमध्ये नाभी, पोटाचा पृष्ठभाग आणि कल्पेश्वर मध्ये केस दिसले. शिव पाच वेगवेगळ्या रुपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे पांडव आनंदी झाले असं कर, त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली. ही पाच स्थळं केदार महापुरुषाची पाच अंगे ‘पंचकेदार’ (बद्रिकेश्वर, मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर) या नावाने प्रसिद्ध आहेत. बौद्धकाळात केदारनाथ हे त्या धर्माचे मोठे केंद्र होते. पण शंकराचार्यांनी पुनश्च हे स्थान हिंदू धर्माच्या कक्षेत आणले. शंकराचार्यांनी येथेच देह ठेवल्याचे सांगितले जाते.

आदि शंकराचार्यांची भूमिका

पौराणिक संदर्भानुसार हे मंदिर मूलतः पांडवांनी बांधले असले तरी या मंदिराचा जीर्णोद्धार शंकराचार्यांनी केला, असे मानले जाते.
मध्ययुगीन कालखंडात आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी भग्नावस्थेतील मूळ मंदिर शोधून काढले आणि त्याचा जीर्णोद्धार केला. इतकेच नाही तर सध्याची मंदिराची स्थापत्य रचना ही त्याच काळातील आहे असे मानले जाते शिवाय त्यांनी तीर्थयात्रा मार्गाचे पुनरुज्जीवनही केल्याचे सांगितले जाते.
शतकानुशतके, केदारनाथ हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला भेट दिल्याने मोक्ष (मुक्ती) प्राप्त होण्यास मदत होते असा भाविकांचा विश्वास आहे. केदार येथील जल प्राशन केल्यामुळे पुनर्जन्म टळतो. तो प्राणी कोणत्याही योनीत जन्मास न येताता शाश्वत पदाला जातो असे वर्णन देवीपुराणात करण्यात आले आहे. तर हे क्षेत्र शिवाचे स्वयंव्यक्त क्षेत्र असल्याचे कृत्यकल्पतरूत म्हटले आहे.

अधिक वाचा:  विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

नैसर्गिक आपत्ती

केदारनाथला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे, २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले. परंतु दगडी केदारनाथ मंदिर अबाधित राहिले. यातूनच या मंदिराच्या मूळ बांधकामाच्या मजबूतीविषयी कल्पना येते. पुरामुळे मंदिराच्या सभोवतालच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु मंदिराच्या स्थानामुळे आणि मूळ बांधकामामुळे ते टिकून राहिले. यावरून प्राचीन भारतीय स्थापत्य कलेतील तज्ज्ञतेची प्रचिती येते. यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम परत हाती घेण्यात आले होते.

केदारनाथ मंदिराची स्थापत्य रचना

मूळ मंदिर हिमालयात मंदाकिनी नदीजवळ ३,५८३ मीटर (११,७५५ फूट) उंचीवर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी स्थानिक मोठ्या खडकांचा वापर करण्यात आला होता. आणि मंदिराची रचना हिमालयासारख्या अतिथंड वातावरणात साजेशी करण्यात आली आहे. या मंदिराची स्थापत्य रचना उत्तर भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचे द्योतक आहे. गुडघाभर उंचीच्या चौथऱ्यावर केदारनाथचे चिरेबंदी मंदिर बांधलेले आहे. याचे शिखर आणि सभामंडप एकाचवेळी बांधलेले नसावेत. सभामंडपाची दोन दालने आहेत. शिखर ‘ब्राह्मी’ पद्धतीचे आहे. ते उंच असले तरी ठेंगणे वाटते. मंदिराचे महाद्वार प्रशस्त आहे. त्याच्या दोन बाजूला मोठे द्वारपाल आहेत. मंदिराच्या डाव्या आणि उजव्या अंगालाही मोठे दरवाजे आहेत. गर्भगृहातील शिवलिंग हे पिंडीच्या आकाराचे नाही,तर शंकूच्या आकाराचे आहे. मंदिराची रचना असर्वसाधारण हिंदू मंदिरा प्रमाणेच आहे. गर्भगृह, मंडप, नंदी हे प्रमुख घटक आहेत. मंडपात हिंदू देवी देवतांची शिल्प स्तंभांवर आढळतात. मंडप हा आयताकृती आहे. तर नंदीचे स्थान गर्भगृहासमोर आहे. मंदिराच्या मागे आदि शंकराचार्यांची समाधी आहे. या मंदिराच्या बाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर अष्टदिशांना आठ कुंडे लागतात. इथे जवळच भैरवझाप किंवा भृगुपतन नावाचा एक उंच कडा आहे. पूर्वी लोक इथून देहपात करीत; म्हणजेच केदारनाथचं स्थानमहात्म्य जाणून भाविक आयुष्य समर्पित करत होते. कड्यावरून स्वत:ला लोटून देत देहत्याग करीत होते. नंतरच्या काळात इंग्रजांनी यावर बंदी घातली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedarnath temple history modern controversy svs