ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून, मजूर पक्षाला (लेबर पार्टी) निर्विवाद बहुमत मिळाले आहे. गेल्या १४ वर्षांच्या काळात ब्रिटनने पाच पंतप्रधान पाहिले आहेत. भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांना हुजूर पक्षाला विजय मिळवून देता आला नाही. दुसऱ्या बाजूला मजूर पक्षाचे कीर स्टार्मर आता पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ६५० सदस्यांच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मजूर पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदानपूर्व, तसेच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मजूर पक्षाचीच सत्ता येण्याबाबतचे कल स्पष्ट झाले होते. कीर स्टार्मर हे मजूर पक्षाचे सातवे पंतप्रधान ठरणार आहेत. मजूर पक्षाचा इतिहास काय आहे आणि आजवर या पक्षाने कशी वाटचाल केली आहे ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण: ब्रिटनमध्ये ऋषी सुनक आणि हुजूर पक्षाचा ऐतिहासिक, दारूण पराभव… मजूर पक्षाच्या अभूतपूर्व विजयाची कारणे कोणती?

मजूर पक्ष काय आहे?

लेबर रिप्रेझेंटेटिव्ह कमिटी (LRC) या नावाने मजूर पक्षाची स्थापना १९०० साली करण्यात आली होती. केअर हार्डी यांनी १८९३ साली स्थापन केलेल्या इंडिपेंडन्ट लेबर पार्टीमधूनच हा पक्ष उदयास आला होता. ‘बीबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, कामगार संघटनांनी लिबरल पक्षाला पाठिंबा देणे थांबवून कामगार चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे, हे केअर हार्डी यांचे उद्दिष्ट होते. सुरुवातीपासूनच मजूर पक्षाचे ध्येय कामगारांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणे हेच होते. समाजवादी, मार्क्सवादी, लोकशाहीवादी, कामगारनेते आणि इतर सर्वांच्या एकत्र येण्यातून या पक्षाचा जन्म झाला होता. मात्र, या पक्षाला ब्रिटनच्या राजकीय पटलावर आपले वर्चस्व निर्माण करायला १९२२ हे साल उजाडावे लागले होते. या साली पहिल्यांदा मजूर पक्ष ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरीत्या दाखल झाला. तेव्हापासून आजतागायत हा पक्ष एकतर विरोधी बाकांवर बसलेला दिसतो किंवा सरकार चालविताना दिसतो. सुरुवातीला हा पक्ष डाव्या विचारसरणीकडे झुकलेला होता. मात्र, कालांतराने हा पक्ष डाव्या-मध्यम विचारसरणीकडे सरकला आहे.

मजूर पक्षाचे किती पंतप्रधान झाले आहेत? त्यांनी काय कामगिरी केली?

१९१८ पासून मजूर पक्षाने आतापर्यंत ११ सरकारे स्थापन केली आहेत; तर हुजूर पक्ष १३ वेळा सत्तास्थानी राहिला आहे. मजूर पक्षाने आतापर्यंत सहा पंतप्रधान ब्रिटनला दिले आहेत. मजूर पक्षाचे पहिले सरकार १९२४ साली सत्तेवर आले होते. ते सरकार अल्पमतात असल्याने फक्त ११ महिने टिकले. हुजूर आणि उदारमतवादी नेत्यांच्या दोन शतकांच्या वर्चस्वाचा अंत करून रॅमसे मॅकडोनाल्ड हे मजूर पक्षाचे पहिले पंतप्रधान ब्रिटनच्या सत्तेवर आले. मजूर पक्षाचे संपूर्ण बहुमतातील पहिले सरकार जुलै १९४५ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेवर आले. तेव्हा क्लेमेंट अॅटली ब्रिटनचे पंतप्रधान झाले. दुसरे जागतिक महायुद्ध (१९३९-१९४५) संपल्यानंतर ते सहा वर्ष सत्तेत होते. या कार्यकाळात मजूर पक्षाने ब्रिटनमध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा केल्या. याच काळात ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ची स्थापना करण्यात आली. कोळसा, लोह, स्टील आणि रेल्वे या सगळ्या बाबींचे राष्ट्रीयीकरणही याच काळात झाले होते. भारत, ब्रह्मदेश यांसारख्या देशांना स्वातंत्र्यही ब्रिटनच्या याच सत्ताकाळात मिळाले होते, अशी माहिती बीबीसीने दिली आहे. मजूर पक्ष १९६४ साली पुन्हा सत्तेवर आला तेव्हा हॅरोल्ड विल्सन पंतप्रधान झाले होते. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारला बराच संघर्ष करावा लागला. १९७० मध्ये एडवर्ड हीथच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाकडून ते पराभूत झाले आणि १९७४ मध्ये पुन्हा पदावर आले.

हेही वाचा : ब्रिटनमधील प्रत्येक निवडणुकीचे मतदान गुरुवारीच घेण्यामागे काय आहे कारण?

युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीमध्ये ब्रिटनच्या सदस्यत्वासाठी झालेल्या सार्वमताच्या वेळी विल्सन पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात पौंडचे मूल्य लक्षणीयरीत्या घसरल्यामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ब्रिटनच्या आर्थिक स्थैर्यासाठी पुढे सरसावला होता. त्यावेळी विल्सन यांनी पंतप्रधानपदाचा आणि मजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देऊन संपूर्ण देशाला चकित केले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या वेळचे परराष्ट्र सचिव असलेले जिम कॅलाघन हे १९७६ साली पंतप्रधानपदी आले. संसदेत अल्प बहुमताने जिम कॅलाघन पंतप्रधान झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांना संघटित कामगार संघटनांकडून सुरू असलेल्या संपांना तोंड द्यावे लागले. हे संप इतके तीव्र झाले की, १९७९ मध्ये ते पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाचा विजय झाला आणि त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यानंतर तब्बल १८ वर्षे हुजूर पक्षाचीच ब्रिटनवर सत्ता होती. त्यानंतर थेट १९९७ साली मजूर पक्षाची सत्ता ब्रिटनवर आली. त्यावेळी टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांनीच मजूर पक्षाच्या मूल्यांमध्ये बदल केला आणि पक्षाला आधुनिक केले. त्यांनी या निवडणुकीमध्ये १४६ जागांवरून थेट ४१८ जागा मिळविल्या होत्या. हा मजूर पक्षासाठी आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय ठरला होता. एकूणच ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला इतक्या जागा मिळाल्या होत्या. ब्लेअर यांनी ब्रिटनमध्ये मोठे बदल घडवून आणले आणि सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणांवर देखरेख ठेवून अर्थव्यवस्थेला अधिक चालना दिली. ब्लेअर २००७ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. सर्वांत जास्त काळ पंतप्रधानपदी राहणारे ते मजूर पक्षाचे पहिलेच पंतप्रधान ठरले. त्यांच्यानंतर २००७ ते २०१० पर्यंत गॉर्डन ब्राउन यांनी पंतप्रधानपद सांभाळले. त्यानंतर मजूर पक्ष सत्तेवरून पायउतार झाला आणि हुजूर पक्षाची सत्ता आली. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे. कीर स्टार्मर यांनी चारशेपार जागा मिळवीत ब्रिटनची सत्ता काबीज केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keir starmer labour wins uk election the history of the labour party leaders policies vsh
First published on: 05-07-2024 at 13:57 IST