व्हिएतनाम आणि कंबोडियाहून नुकत्याच परतलेल्या केरळमधील ७५ वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी (११ ऑक्टोबर) म्युरिन टायफस या जीवाणूजन्य आजाराचे निदान झाले. रुग्णाने ८ सप्टेंबर रोजी शरीरात वेदना आणि थकवा जाणवत असल्याने वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत त्याचे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य बिघडत असल्याचे आढळून आले. त्याच्या प्रवासाचा इतिहास बघितल्यास, डॉक्टरांना त्याला मुरिन टायफस हा आजार झाल्याचा संशय आला. या दुर्मीळ आजाराचे राज्यातील हे पहिले प्रकरण आहे. हा आजार नक्की काय आहे? त्याचा प्रसार कसा होतो? त्याचे लक्षणे अन् उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

मुरिन टायफस म्हणजे काय?

मुरिन टायफस हा एक संसर्गजन्य आजार आहे; जो पिसूजनित जीवाणू ‘रिकेटसिया टायफी’मुळे होतो. मानवामध्ये त्याचे संक्रमण पिसवांच्या चाव्याद्वारे होते. या रोगाला एंडेमिक टायफस, फ्ली-बोर्न (पिसूजनित) टायफस किंवा फ्ली-बोर्न स्पॉटेड फिवर, असेही म्हणतात. उंदीर आणि मुंगुसाद्वारे हा रोग पसरतो. संक्रमित असणारे पिसू इतर लहान सस्तन प्राण्यांवर जगू शकतात; जसे की मांजर व कुत्री.

हेही वाचा : ब्लड प्रेशर तपासताना हात कसा ठेवावा? बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय?

मुरिन टायफस कसा पसरतो?

जेव्हा संक्रमित पिसू कीटक जेव्हा विष्ठा, त्वचेच्या किंवा डोक्यातील फोडींच्या संपर्कात येते तेव्हा हा रोग पसरतो. म्युरिन टायफस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तीपासून पिसूमध्ये पसरत नाही. हा रोग किनारी उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळून आला आहे; जिथे उंदरांचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी भारतात ईशान्य, मध्य प्रदेश व काश्मीरमध्ये मुरिन टायफसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मुरिन टायफसची लक्षणे काय?

मुरिन टायफसची लागण झाल्यास साधारणत: सात ते १४ दिवसांत लक्षणे दिसून येतात. त्यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ, उलट्या व पोटदुखी या लक्षणांचा समावेश होतो. काही लोकांना सुरुवातीच्या लक्षणांनंतर काही दिवसांनी त्वचेवर पुरळ उठू शकते. हा आजार क्वचितच दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो; परंतु उपचार न केल्यास तो अनेक महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केरळच्या रुग्णाच्या बाबतीत निदान करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एनजीएस) तंत्रज्ञान वापरण्यात आले. या तंत्रज्ञानात मायक्रोबियल डीएनएचा वापर केला जातो. पुष्टीकरणासाठी सीएमसी वेल्लोरमध्ये पुढील चाचण्या करण्यात आल्या.

म्युरिन टायफसवरील उपचार

या आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. अँटिबायोटिक डॉक्सिसायक्लिन थेरपी यामध्ये प्रभावी मानली जाते. परंतु, उपचारासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार न केल्यास, हा रोग एक किंवा दोन आठवड्यांत वाढू शकतो आणि क्वचित प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतो.

हेही वाचा : नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजवरून दोन देशांत वितुष्ट; काय आहे वादाचा केंद्रबिंदू?

म्युरिन टायफसपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवता येईल?

घरात पाळीव प्राणी असलेल्या कुटुंबांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, पिसू त्यांच्या प्राण्यांपासून दूर आहेत. पाळीव प्राण्यांना आंघोळ घातली गेली पाहिजे आणि पिसूच्या लक्षणांबद्दल जागरूकताही बाळगली पाहिजे. आवश्यक असल्यास पिसूच्या समस्येवर उपचार घेतले पाहिजे. मुख्य म्हणजे उंदरांना घरापासून आणि विशेषतः स्वयंपाकघरांपासून दूर ठेवावे. अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.