बांगलादेशमध्ये अभूतपूर्व अशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) त्यांनी देशातून पलायन करून भारताचा आश्रय घेतला आहे. या सगळ्यादरम्यान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलेदा झिया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. २०१८ साली भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खलेदा झिया यांना तुरुंगवास झाला होता. शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या नजरकैदेत असलेल्या खलेदा झिया यांची नजकैदेतून सुटका करण्यात आली आहे.

खलेदा झिया यांच्या सुटकेची घोषणा

काल (५ ऑगस्ट) बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी लष्करप्रमुख जनरल वाकेर-उझ-झमान यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर देशातील प्रमुख विरोधक खलेदा झिया यांच्या सुटकेचा निर्णय घोषित केला. राष्ट्राध्यक्षांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले की, बैठकीमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीच्या प्रमुख बेगम खलेदा झिया यांना तातडीने मुक्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. मात्र, खलेदा झिया कोण आहेत आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का ठरतात, ते पाहूयात.

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

हेही वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधानपदासाठी नोबेल विजेत्याचं नाव चर्चेत; कोण आहेत नोबेल मुहम्मद युनूस?

कोण आहेत खलेदा झिया?

झिया (७८) या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या संस्थापक आणि प्रमुख आहेत. त्यांनी याआधी अनेकवेळा बांगलादेशचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. १९९१ साली पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या खलेदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. झिया यांचा जन्म ऑगस्ट १९४५ मध्ये फाळणीपूर्व भारतातील जलपाईगुडी येथे झाला. त्यांचे पती झियाउर रहमान हे १९७७ ते १९८१ या काळात देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची हत्या झाल्यानंतर खलेदा झिया यांनी सक्रिय राजकारणामध्ये उडी घेतली. १९७८ साली रहमान यांनी बीएनपी पक्षाची स्थापना केली होती. २००१ ते २००६ या कालावधीमध्येही झिया बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. झिया या पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर बांगलादेशमध्ये नागरी असंतोषाचे वातावरण होते. जेव्हा त्यांना बहुमत कमी पडू लागले तेव्हा त्यांनी जमात-ए-इस्लामी या पक्षाशी संधान बांधले. १९९६ साली त्या पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर परतल्या. मात्र, त्यांचे हे दुसरे सरकार फक्त १२ दिवसच टिकले. विरोधी पक्षांच्या मागणीनंतर, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार स्थापन केल्यानंतर त्या सत्तेवरून पायउतार झाल्या. त्यानंतर जून १९९६ मध्ये बांगलादेशमध्ये पुन्हा निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या. त्यानंतर झिया आणि हसीना यांनी काही वर्षे आलटून-पालटून बांगलादेशचे नेतृत्व केले. त्यांच्यामधील हाडवैर संपूर्ण बांगलादेशला परिचित असून बीएनपीला स्थापनेनंतर चांगला प्रतिसाद मिळाला होता. झिया यांनी २००१ साली पुनरागमन केले आणि त्या पाच वर्षे पंतप्रधानपदावर राहण्यात यशस्वी ठरल्या. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्या पदावरून पायउतार झाल्या. त्यांना २००६ साली सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. याच आरोपांखाली त्यांचा मुलगा अराफत यालाही अटक करण्यात आली होती. झिया यांचा दुसरा मुलगा तारीक रहमानदेखील काही काळ तुरुंगवासात होता. त्यानंतर तारीक रहमान ब्रिटनला परागंदा झाला असून २००८ पासून तो तिथेच स्थायिक आहे.

२०१८ मध्ये झिया यांना झाली अटक

१७ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर २०१८ मध्ये झिया यांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले. खलेदा झिया यांना तुरुंगवास झाल्यानंतर त्या लोकांच्या नजरेमधून दूर गेल्या आहेत. त्यामुळे नंतरच्या काही वर्षांमध्ये खलेदा झिया यांची लोकप्रियता कमी झाली आहे. झिया यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी म्हणून त्यांच्यावरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचा आरोपही त्यांच्या समर्थकांकडून वारंवार करण्यात येतो. ढाका विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी ‘डीडब्ल्यू’शी बोलताना म्हटले होते की, “झिया यांच्यावर चालवण्यात आलेला खटला फारच वादग्रस्त होता. अपीलच्या टप्प्यावरही उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा दुप्पट केली होती. बांगलादेशच्या इतिहासात अशी घटना फारच दुर्मीळ आहे.” पुढे ते म्हणाले की, “त्या बांगलादेशमधील सर्वांत लोकप्रिय नेत्या आहेत. मात्र, त्यांच्याशी आणि त्यांच्या लोकप्रियतेशी टक्कर देण्याऐवजी हसीना सरकारने त्यांना अटकेत टाकणे पसंत केले.”

मार्च २०२० मध्ये हसीना सरकारने झिया यांना आरोग्याच्या कारणास्तव तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी दिली. मात्र, त्यांना तेव्हापासूनच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये खलेदा झिया आपल्या आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. बांगलादेशचे तत्कालीन कायदा आणि न्याय मंत्री अनिसुल हक यांनी सांगितले होते की, “त्या उपचार घेण्यासाठी ढाक्यातील त्यांच्या निवासस्थानी राहतील आणि परदेशात जाणार नाहीत, या अटीवर त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले.” तेव्हापासून त्या ढाक्यामध्येच नजरकैदेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : शेख हसीना, खलेदा झिया ते जमात-ए-इस्लामी; बांगलादेशमध्ये राजकीयदृष्ट्या प्रमुख पक्ष आणि व्यक्ती कोण आहेत?

झिया यांच्या सुटकेचा अर्थ काय?

जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. खलेदा झिया तुरुंगाबाहेर असताना हा पक्ष लोकप्रिय होता. मात्र, त्यांच्या अटकेनंतर या पक्षाची लोकप्रियता घटत गेली आहे. आता शेख हसीना यांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने आणि सध्याच्या अस्थिर परिस्थितीमध्ये झिया यांची सुटका झाल्यामुळे बीएनपी पक्षाची लोकप्रियता पुन्हा वाढू शकते. खरे तर २०१८ साली झिया यांना अटक झाल्यानंतर बांगलादेशमध्ये प्रमुख राजकीय विरोधकच शिल्लक राहिलेला नव्हता. शिवाय, बीएनपीमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांचा मुलगा तारीक रहमान हा या पक्षाचा उपाध्यक्ष आहे. आता झिया मुक्त झाल्या आहेत आणि सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फायदा बीएनपी पक्षाला होऊ शकतो. सध्या शेख हसीना यांची लोकप्रियता प्रचंड घटली आहे; तसेच अवामी लीग या पक्षावरही लोकांचा रोष आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून झिया पुन्हा सक्रिय होऊन आपल्या पक्षालाही सक्रिय करू शकल्या तर त्याचा फायदा नक्कीच त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. हा पक्ष पुराणमतवादी, मध्य-उजवा राजकीय पक्ष मानला जातो. या पक्षाने सत्तेवर असताना नेहमीच भारतविरोधी भूमिका घेतली आहे. एकीकडे शेख हसीना यांचा अवामी लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष मानला जातो; तर बीएनपी हा पक्ष पुराणमतवादी मानला जातो. बीएनपी पक्षाने वेळोवेळी जमात-ए-इस्लामी यांसारख्या कट्टर धार्मिक पक्षांशी संधान बांधले आहे.

Story img Loader