भारतातील मोस्ट वॉन्टेड अतिरेकी हरप्रीत सिंग ऊर्फ हॅपी पासिया याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारताकडून त्याच्या अटकेची विनंती करण्यात आली होती. कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे खलिस्तानी दहशतवाद्याच्या अटकेनंतर फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक काश पटेल यांनी त्याच्या अटकेची माहिती दिली. हरप्रीत सिंग हा अमेरिकेतदेखील अवैधरीत्या घुसला होता. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. कोण आहे हरप्रीत सिंग? त्याची अटक भारतासाठी महत्त्वाची का मानली जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

हरप्रीत सिंग कोण आहे?

हरप्रीत सिंग ऊर्फ ​​हॅपी पसिया हा पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील पछिया गावातील आहे. हे क्षेत्र रामदास पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. सुरुवातीला शहरी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. मात्र, आता त्याची ओळख जागतिक दहशतवादी, अशी झाली आहे. जग्गू भगवानपुरिया टोळीशी त्याचा संबंध आल्यानंतर त्याचे नाव संघटित गुन्ह्यांमध्ये आले. रिंदा म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय)च्या सर्वांत सक्रिय सदस्यांपैकी एक आहे.

त्याच्या मार्गदर्शनानंतर हरप्रीत सिंग याच्या कारवाया वाढत गेल्या. हरप्रीत सिंग १ एप्रिल २०१८ रोजी भारत सोडून दुबईला पळून गेला आणि ४ फेब्रुवारी २०१९ ला काही काळासाठी भारतात परतला. त्यानंतर तो ११ ऑक्टोबर २०२० रोजी ब्रिटनला गेला आणि त्यानंतर त्याने भारतीय पासपोर्टचा वापर करून अमेरिकेत बेकायदा प्रवेश केला.

अमेरिकन अधिकाऱ्यांना त्याच्या नावाचे दोन पासपोर्ट सापडले आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, १७ जानेवारी २०२५ रोजी त्याच्याविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती आणि सध्या त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाबमधील १६ प्रमुख दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामध्ये १४ ग्रेनेड हल्ले, एक आयईडी स्फोट व रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) हल्ल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये त्यांनी पोलीस कर्मचारी, धार्मिक मिरवणुका, हिंदू नेते, दारू कंत्राटदार व सेवानिवृत्त अधिकारी यांना लक्ष्य केले होते.

रिंदा-हरप्रीत सिंग यांच्या नेटवर्कने केलेले हल्ले

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंगचे संबंध हरविंदर सिंगबरोबरच्या वाढल्यामुळे त्याच्या हिंसक कारवायांचे प्रमाणदेखील वाढले. पंजाबमध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी हल्ले रचले, असा आरोप त्यांच्यावर आहे. एप्रिल २०२५ मध्ये गुरुदासपूरमधील किला लाल सिंग पोलीस ठाण्यावर त्यांनी केलेला हल्ला सर्वांत भीषण हल्ल्यांपैकी एक होता. दुसरी घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये अजनाला पोलिस ठाण्याबाहेर घडली होती.

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, त्यांच्या नेटवर्कने जाळपोळ व खंडणीद्वारे बटाला आणि अमृतसरमधील दारू विक्रेते आणि व्यावसायिकांना लक्ष्य केले. दहशतवादी कारवायांना निधी देण्याच्या उद्देशाने त्यांनी या कारवाया सुरू ठेवल्या. त्यांनी आपले नेटवर्क वाढवण्यासाठी अल्पवयीन मुलांनाही लक्ष्य केले. ड्रग्जच्या व्यसनाने ग्रस्त असलेल्या मुलांना पैसे आणि अमली पदार्थांची लालूच दाखवून गटात भरती केले, असे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये एका १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आणि त्याने अजनाला पोलिस ठाण्यात ड्रग्ज आणि रोख रकमेच्या बदल्यात आयईडी पेरले असल्याची कबुली दिली. त्यांच्या नेटवर्कचे अनेक परदेशी कार्यकर्त्यांशी संबंध असल्याचे तपासकर्त्यांना आढळून आले. त्यात अमेरिकेत स्थित गुरदेव सिंग ऊर्फ जैसल पहेलवान, गुरप्रीत सिंग ऊर्फ गोपी नवनशरिया जर्मनीस्थित स्वरण सिंग ऊर्फ जीवन फौजिया यांचा समावेश आहे. या व्यक्तींनी विविध दहशतवादी कारवाया घडवून आणण्यात त्यांना मदत केली. त्यामुळेच भारतासाठी हा केवळ देशांतर्गत चिंतेचा विषय नसून, ते जागतिक दहशतवादविरोधी आव्हान आहे. १८ एप्रिल रोजी जारी केलेल्या निवेदनात एफबीआय सॅक्रामेंटो कार्यालयाने नमूद केले की, सिंग याचा बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) या दोघांशीही संबंध आहे.

एफबीआयच्या निवेदनात असे म्हटले आहे, “सिंगने पाकिस्तानच्या इंटर-स्टेट इंटेलिजेन्स (आयएसआय) आणि खलिस्तानी दहशतवादी गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय)शी संपर्क केल्याचा संशय आहे.” पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनीही म्हटले की, पासियाची अटक ही आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कवरच्या कारवाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

काश पटेल यांचे विधान काय?

एफबीआय संचालक काश पटेल यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे पासियाच्या अटकेची आणि त्याला दहशतवादी घोषित करण्याची माहिती दिली. “हरप्रीत सिंग अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करीत होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. तो विदेशी दहशतवादी टोळीचा भाग होता, ज्यांनी भारतासह अमेरिकेतही हल्ल्यांचे नियोजन केले. एफबीआय अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपास सुरू केला आहे. हिंसाचार घडवून आणणाऱ्यांचा एफबीआय नेहमी मागोवा घेत राहील,” असेही ते म्हणाले. दहशतवादविरोधात भविष्यातील भारत-अमेरिका सहकार्यासाठी आता या प्रकरणाकडे एक मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.

भारत-अमेरिका सुरक्षा संबंधांसाठी या अटकेचा अर्थ काय?

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि रॉ यांसारख्या भारतीय संस्थांनी बीकेआय आणि खलिस्तान झिंदाबाद फोर्स (केझेडएफ) यांसारख्या गटांना सुरक्षेसाठी धोकादायक मानले आहे. चंदिगडमधील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात पासिया याचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘एनआयए’ने पासियाला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळेच त्याची अटक ही भारतासाठी महत्त्वाची आहे.