कुस्ती आणि कबड्डी या भारतीय पारंपरिक खेळांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ केव्हाच मिळविले. कुस्तीचे अस्तित्व अद्याप कायम आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत असल्यामुळे कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तर टिकवून आहे. आता या पाठोपाठ खो-खो हा आणखी एक भारतीय त्याहीपेक्षा मराठी मातीतला खेळ आंतरराष्ट्रीय स्तराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. १३ जानेवारीपासून नवी दिल्लीत खो-खो खेळाची पहिलीवहिली विश्वकरंडक स्पर्धा पार पडत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा…
खो-खो विश्वचषक कुठे?
खो-खो खेळ हा मुळात भारतीय असल्यामुळे पहिली स्पर्धा भारतातच होणे हे सहाजिकच होते. आशियातील देशांबरोबर युरोपियन देशांनीदेखील यात रस दाखवला. सहभागी देशांशी चर्चा करुन त्यांचा सहभाग निश्चित झाल्यावर सर्वानुमते चर्चा करून पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला देण्यावर शिक्कामोर्तब झाले. सर्व सहभागी देशांतील संघांना प्रवास सहज आणि सोपा व्हावा हे लक्षात घेऊन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर ही स्पर्धा भरवली जात आहे.
किती देशांचा सहभाग?
खो-खो विश्वचषक स्पर्धा घेताना देशांचा सहभाग आता ओशियाना, आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका अशा खंडात्मक रचनेनुसार निश्चित करण्यात आला. एकूण २४ देशांचा सहभाग आणि पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी १६ संघ अशी रचना करण्यात आली. भारतासह पाकिस्तान (अद्याप अधांतरी), बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया या देशांचा सहभाग आहे. आफ्रिकेतून घाना, केनया, युगांडा, दक्षिण आफ्रिका; युरोपमधून इंग्लंड, नेदरलॅण्ड्स, पोलंड, जर्मनी; उत्तर अमेरिकेतून अमेरिका; दक्षिण अमेरिकेतून ब्राझील, अर्जेंन्टिना; ओशियानातून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे संघ येतील. महिला विभागात उत्तर अमेरिकेतील एकाही देशाचा सहभाग नसेल.
आयोजनाचे नेमके उद्दिष्ट काय?
खो-खो हा खेळ अजूनही केवळ भारतीय राष्ट्रीय स्पर्धांपुरताच मर्यादित राहिला आहे. पूर्वीपासून अगदी अलिकडच्या काळापर्यंत खो-खो खेळाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. संघटनात्मक पेचामुळे आशियाई ऑलिम्पिक समितीने खो-खो आशियाई संघटनेची मान्यता काढून घेतलेली आहे. त्यामुळे या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध नव्हते. भारतात सुरू झालेल्या खो-खो अल्टिमेट लीगच्या थेट प्रसारणामुळे या खेळाच्या जगातील प्रसाराला नव्याने चालना मिळाली. ही चालना अशीच कायम ठेवण्यासाठी आणि खो-खो खेळाला वैश्विक करण्यासाठी थेट विश्वचषक स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, या खेळाला आंतरराष्ट्रीय संघटनादेखील नाही. नावापुरती असलेली आंतरराष्ट्रीय खो-खो संघटना एक कंपनी म्हणून काम करते आणि त्याच माध्यमातून खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करुन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे ठरले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाच घ्यायचीच तर मग ती विश्वचषक का नको, असा सारासार विचार करुन ही स्पर्धा प्रत्यक्षात उतरली.
ऑलिम्पिकची खात्री कशी?
आशियाई महासंघाची मान्यताच रद्द असल्यामुळे खो-खो खेळाचा तातडीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समावेशाची शक्यताच नाही. त्यामुळे हा खेळ ऑलिम्पिकपासून दूर राहणार अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. त्याच वेळी २०३६ ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाल्यास मल्लखांब, योगासन, कबड्डी, खो-खो या खेळांचा आग्रह भारत धरणार यात शंका नाही. त्यामुळेच ही स्पर्धा त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल ठरते.
विश्वचषक स्पर्धा कशी पार पडणार?
भारतीय खेळांपैकी खो-खो या आणखी एका खेळाची विश्वचषक स्पर्धा पार पडणार असली, तरी त्या स्पर्धेत पारंपरिक खेळाचा लवलेशही दिसणार नाही. केवळ थेट प्रक्षेपण सुलभ व्हावे आणि परदेशी खेळाडूंना जुळवून घेता यावे यासाठी परंपरेला छेद देण्यात आला आहे. अर्थात, हा छेद अल्टिमेट लीगपासूनच देण्यात आला आहे. त्यामुळे ‘वजीर’ या नव्या सकंल्पनेसह मैदान छोटे करून ९ ऐवजी सात खेळाडूंमध्येच ही स्पर्धा होणार आहे.
अंतर्गत नाराजीचा सूर का?
विश्वचषक स्पर्धा ही पारंपरिक खो-खो खेळाला तडा देऊन खेळवली जात असल्यामुळे संघटक, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. या खेळाचे नियम पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आणि आजही त्याच नियमानुसार राष्ट्रीय स्पर्धा पार पडत आहे. या नियमानुसार आक्रमक आणि बचावपटू या दोघांचा कस लागतो. पण, लीग आणि विश्वचषक स्पर्धेसाठी नव्याने नियम करून सामने खेळविले जाणार आहेत. ‘वजीर’ या संकल्पनेचा समावेश, बचावासाठी उतरणाऱ्या फळीतील चक्राकार पद्धती यामुळे खो-खो खेळाचा आत्माच नाहीसा होतो, अशी भावना अनेक जण बोलून दाखवतात.