इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ मोहसीन फाखरीझादेह यांची शुक्रवारी घात लावून हत्या करण्यात आली. तेहरानपासून ४० मैल अंतरावर अबसार्ड येथे फाखरीझादेह यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मोहसेन फाखरीझादेह यांच्या हत्येमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण तापण्याची शक्यता आहे. इराण-इस्रायल संघर्षाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण इराणने या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचे संकेत दिले आहेत.
फाखरीझादेह यांच्या हत्येनंतर तेहरानमध्ये सरकारी इमारतीबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. फाखरीझादेह यांच्या हत्येचा बदला घेण्याची मागणी होत आहे. यावर्षी तीन जानेवरीला कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या ड्रोन स्ट्राइकमध्ये मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये अशीच संतापाची लाट उसळली होती. आता सुद्धा तशीच भावना आहे. अमेरिका, इस्रायलसह पाश्चिमात्यदेश फाखरीझादेह यांच्याकडे इराणच्या अण्वस्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून पाहत होते.
इराणच्या अण्वस्त्र शास्त्रज्ञावर झालेल्या हल्ल्यामागे इस्रायलचा हात आहे असे एक अमेरिकन अधिकारी आणि दोन गुप्तचर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. न्यू यॉर्क टाइम्सने हे वृत्त दिले आहे. अमेरिकेला आधीपासून या ऑपरेशनबद्दल किती माहिती होते, ते ठाऊक नाही. पण अमेरिका-इस्रायल दोन्ही देशांमध्ये दृढ मैत्रीचे नाते आहे. इराणसंबंधी ते नेहमीच त्यांच्यामध्ये माहितीचे आदान-प्रदान सुरु असते.
इराणने अण्वस्त्र बनवले, तर आपल्याला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे काहीही करुन हे तंत्रज्ञान इराणच्या हाती लागण्यापासून रोखणे हा इस्रायलचा उद्देश आहे. आमचा अण्वस्त्र कार्यक्रम हा शस्त्रांसाठी नाही, तर शांततेसाठी आहे. या हत्येला इस्रायलने दहशतवादी कृत्य ठरवले असून बदल्याची भावना बोलून दाखवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शेवटचे काही आठवडे राहिलेले असताना ही घटना घडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात इराण बरोबर करार झाला होता. इराणने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणल्या होत्या. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता संभाळल्यानंतर हा करार रद्द केला. यंदा अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना इराण बरोबर पुन्हा हा करार करायचा आहे. पण मोहसीन फाखरीझादेह यांच्या हत्येमुळे बायडेन यांचा नव्याने इराण बरोबर संबंध जोडण्याचा मार्ग आणखी खडतर होणार आहे.