उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२ सप्टेंबर) रशियात पोहोचले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाकडून रशियाला शस्त्रास्त्र पुरविली जाण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. किम जोंग-उन यांनी रविवारी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग शहरातील रेल्वे स्थानकावरून त्यांच्या खासगी रेल्वेने रशियाच्या दिशेने प्रवास सुरू केला. गडद हिरव्या रंगाची आणि कमालीची संथ असणारी ही रेल्वे बुलेटप्रूफ आणि सर्व सुरक्षेने युक्त आहे. २०११ साली सत्तेत आल्यानंतर किम जोंग-उन हे आपले आजोबा आणि वडिलांप्रमाणे याच रेल्वेने देशात आणि परदेशात प्रवास करत आले आहेत. या रेल्वेचे २१ डबे आहेत. पण, आधुनिक जगातील हुकूमशहा रेल्वेने प्रवास का करतोय? या रेल्वेत अशी कोणती खास गोष्ट आहे? तसेच जेवणासाठी आणि मनोरंजनासाठी कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, याबद्दल घेतलेला हा आढावा …..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला रेल्वेची आवड का?

उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी परदेश प्रवासासाठी रेल्वेचा वापर करणे, ही परंपरा किम यांचे आजोबा किम इल सुंग यांच्यापासून चालत आली आहे. किम इल सुंग हे उत्तर कोरियाचे संस्थापक मानले जातात. कोरियन युद्धाच्या काळापासून (१९५०-१९५३) ते आयुष्यभर प्रवासासाठी रेल्वेचा वापर करत आले आणि त्यानंतर आलेल्या हुकूमशहांनीही हीच पद्धत पुढे सुरू ठेवली. त्यांचे सुपुत्र किम जोंग इल यांनीही हवाई प्रवासाच्या ऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य दिले.

हे वाचा >> स्पा, जिम, वृद्धत्व रोखणारी मशीन आणि बरेच काही; कशी आहे पुतिन यांची गुप्त ट्रेन?

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०११ साली किम जोंग इल रेल्वेने प्रवास करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. क्षेत्रीय मार्गदर्शनासाठी दौऱ्यावर जात असताना ही घटना घडली, असे उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले. त्यांचे उत्तराधिकारी किम जोंग-उनदेखील हीच परंपरा पुढे नेत आहेत. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत ते विमानानेही प्रवास करतात. उदाहरणार्थ, २०१८ साली एका उच्चस्तरीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांनी एअर चायनाच्या बोईंग ७४७ या विमानाचा वापर केला होता. या परिषदेदरम्यान त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.

चालता फिरता किल्ला

किम जोंग यांच्या रेल्वेमध्ये काय काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असली तरी रेल्वेबाबतचे अनेक तपशील बाहेर आलेले नाही. रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती गूढ ठेवण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर अहवालाच्या माध्यमातून या रेल्वेबद्दल आतापर्यंतची माहिती समोर आली आहे. किम यांच्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या आठवणी आणि उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने जाहीर केलेल्या व्हिडीओमधून रेल्वेबाबतची माहिती इतरांना कळते.

२००९ साली उत्तर कोरियाचा शेजारी आणि प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने रेल्वेबद्दलची काही माहिती दिली होती. त्यानुसार, हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ९० बख्तरबंद गाड्या असून नेत्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी या वाहनाची असते. किम जोंग इल यांच्या राजवटीबद्दल लिहिलेल्या लिखाणात नमूद केले की, किम जोंग इल यांच्या प्रवासासाठी देशात सहा शाही रेल्वे निर्माण केल्या होत्या. तसेच २० रेल्वे स्थानके बांधण्यात आली होती.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा जेव्हा रेल्वेने प्रवास करतात, तेव्हा त्यांच्या मागे आणि पुढे अशी एक-एक रेल्वे धावत असते. पुढे चालणारी खासगी रेल्वे पटरीवरील सुरक्षेची हमी घेत जाते आणि मागच्या मुख्य रेल्वेला तसा संदेश देते; तर मागून चाललेल्या तिसऱ्या रेल्वेत सुरक्षा रक्षक आणि इतर सहकारी कर्मचारी वर्ग असतो, अशी माहिती द वॉशिंग्टन पोस्टच्या एका लेखात देण्यात आली आहे.

रेल्वेचा प्रत्येक डबा हा बुलेटप्रूफ धातूने तयार केलेला आहे. त्यामुळे सरासरी वजनापेक्षा कितीतरी पटीने अधिक त्याचे वजन आहे. एवढ्या वजनाचे डबे खेचावे लागत असल्यामुळे ही रेल्वे संथ गतीने चालते. काही अहवालानुसार, या रेल्वेचा सर्वाधिक वेग ताशी ५९.५ किमी इतका आहे.

जेव्हा हुकूमशहा रेल्वेतून परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा रेल्वेतील सुरक्षा अधिक वाढविली जाते. २००९ साली आलेल्या एका अहवालानुसार, मुख्य रेल्वेच्या पुढे चाललेल्या रेल्वेमध्ये १०० सुरक्षा अधिकारी तैनात होते, जे पुढील स्थानकावर पोहोचून बॉम्ब आणि इतर धोक्याची तपासणी करायचे. तसेच रेल्वे ट्रॅक सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करत असत. तसेच न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सुरक्षेसाठी रेल्वेच्या वर हेलिकॉप्टर्स आणि विमानही टेहाळणी करत प्रवास करत असे.

शिवाय किम यांना ट्रेनमध्ये घेऊन जाणे आणि बाहेर काढण्यासाठी दोन चिलखती मर्सिडीज गाड्यादेखील होत्या

आतमध्ये आलिशान आणि आरामदायी सुविधा

गेल्या काही वर्षांपासून उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने जाहीर केलेल्या व्हिडिओद्वारे रेल्वेच्या आतमधील भागाकडे डोकावण्याची संधी इतर माध्यमांना मिळाली. उदाहरणार्थ २०१५ साली जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये किम जोंग उन एका मोठ्या पांढऱ्या रंगाच्या टेबलाजवळ बसलेले दिसत आहेत. त्यावरून ती कॉन्फरन्स रुम असावी, असा अंदाज बांधता येतो. याचप्रकारे २०११ साली एका व्हिडिओत किम जोंग इल त्याच रुममध्ये बसून बैठक घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता.

आणखी वाचा >> World News: किम जोंग-उन रशियात दाखल; पुतिन यांच्याशी वाटाघाटी होणार, अमेरिकेची चिंता वाढली!

न्यूयॉर्क टाइम्सने थोरले किम जोंग सहलीला जात असल्याच्या एका व्हिडिओबद्दल माहिती दिली आहे. किम जोंग इल प्रवाशांचा डबा दिसावा अशा एका डब्यात आरामदायी खूर्चीवर रेलून बसल्याचे दिसते. तसेच लाकडाची नक्षीकाम असलेल्या एका डब्यात मेजवानीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग इल यांच्या रेल्वे गाडीत कॉन्फरन्स रूम, शयनकक्ष, प्रेक्षक दालन, सॅटेलाईट फोन आणि प्रत्येक डब्यात प्लॅट स्क्रिन टेलिव्हिजन बसवलेले होते.

शाही खानपान आणि मनोरंजनाची रेलचेल

रशियाचे अधिकारी कॉन्स्टँटिन पुलिकोव्स्की यांनी २०११ साली किम जोंग इल यांच्यासह रशियात रेल्वेने प्रवास केला होता. त्यांनी या रेल्वेच्या भव्यतेचे तपशीलवार वर्णन केले आहे. या रेल्वेत तुम्ही रशियन, चायनीज, कोरियन, जापनीज किंवा फ्रेंच पाककृतीचे (Cuisine) कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली तरी ते तुम्हाला मिळू शकतात. या पदार्थांमध्ये पारंगत असलेले आचारी रेल्वेत उपलब्ध आहेत. ‘ओरियन्ट एक्सप्रेस’ या पुस्तकात कॉन्स्टँटिन पुलिकोव्स्की यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

पुलिकोव्स्की यांनी सांगितलेली आठवणीचा हवाला देऊन न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले की, हुकूमशहा किम जोंग इलच्या मागणीनुसार रेल्वेत जिवंत लॉबस्टर तयार करून आणि इतर ताजे पदार्थ ट्रेनमध्ये वितरित केले गेले होते. रशियाच्या दौऱ्यात ते सायबेरियातून प्रवास करताना ही मेजवाणी देण्यात आली होती. एवढेच नाही तर, पॅरिसमधून ब्राडऑक्‍स (Bordeaux) सारख्या सुरेख वाईन्सचे कॅरेटही रेल्वेत आणले होते.

मनोरंजनाच्या बाबतीतही रेल्वेत मौजमजा होती. रशियान अधिकाऱ्याने लिहिले आहे की, या रेल्वेत मनोरंजन करणाऱ्या सुंदर महिलांना महिला कंडक्टर असे संबोधले जायचे. या महिला कंडक्टर रशियन आणि कोरियन भाषेत गाणे सादर करायच्या. पुतिन यांच्या खासगी रेल्वेत ज्या सुविधा नाहीत, त्यादेखील किम जोंग इल यांच्या रेल्वेत होत्या, असेही रशियन अधिकारी पुलिकोव्स्की यांनी आपल्या पुस्तकात लिहिले.

किम जोंग उन यांच्या रेल्वेत काय?

किम जोंग इल यांच्या रेल्वेतील बरीच माहिती रशियन अधिकाऱ्याच्या पुस्तकातून समोर आली असली तरी किम जोंग उन यांनी रेल्वेत कोणते नवे बदल केले? खानपान आणि मनोरंजनासाठी कोणत्या सुविधा आहेत? याबद्दल फारशी माहिती बाहेर येऊ शकलेली नाही. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, हुकूमशहा किम जोंग उन स्विस चीज, क्रिस्टल शॅम्पेन आणि हेनेसी कॉग्नाकला जास्त प्राधान्य देतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim jong un arrives in russia by train bulletproof carriages luxurious facility lady conductors and more kvg