रशिया-युक्रेन युद्ध वाढणार, असे चित्र आहे. आता या युद्धात उत्तर कोरियादेखील उतरला आहे. किम जोंग उन यांनी या युद्धात आपल्या लष्करी कर्मचाऱ्यांना सहभागी करून, मुत्सद्देगिरीने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. या घडामोडींमध्ये सध्या एक नाव चर्चेत येत आहे आणि ते म्हणजे कर्नल जनरल किम योंग बोक. ते कोरियन पीपल्स आर्मी (केपीए) मध्ये उच्च रँकिंगवर आहेत; पण अनेकांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही. रशियाला युद्धात मदत करताना उत्तर कोरियाच्या लष्करी योगदानावर देखरेख ठेवण्याची त्यांची भूमिका असणार आहे. कोण आहेत जनरल किम योंग बोक? रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाच्या समावेशाचा काय परिणाम होणार? उत्तर कोरिया रशियाला मदत का करत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत किम योंग बोक?

किम योंग बोक सध्या केपीएचे जनरल स्टाफचे डेप्युटी चीफ आहेत; ज्यांना आता आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळू लागली आहे. अंदाजे उत्तर कोरियाच्या दोन लाख (२,००,०००) विशेष सैन्याचे कमांडिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. किम यांच्यावर उत्तर कोरियाच्या सैन्याला युक्रेनमधील रशियन सैन्यात समावेशित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत किम यांनी कोरियन द्वीपकल्पातील युद्धकाळातील परिस्थितींसाठी डिझाइन करण्यात आलेल्या मोहिमांवर मुख्य लक्ष केंद्रित करून, गुप्ततेने कार्य केले. कोरिया इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स ॲनालिसिसचे संशोधक जिओन क्युंग-जू यांच्या मते, किम यांचे युनिट गुप्त ऑपरेशन्ससाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले, जे त्यांचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करते.

हेही वाचा : १४ मित्रांना विष देऊन हत्या केल्याप्रकरणी महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे ॲम सायनाइड?

परंतु, जून २०२४ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या महत्त्वपूर्ण भेटीनंतर किम सार्वजनिकपणे दिसू लागले. या भेटीदरम्यान प्योंगयांग आणि मॉस्को यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे करार केले. तेव्हापासून किम वारंवार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याबरोबर दिसले आहेत. त्यातून त्यांचे सैन्यातील महत्त्व अधोरेखित होते. तज्ज्ञांनी आता त्यांना उत्तर कोरियातील पहिल्या १० सर्वांत प्रभावशाली लष्करी व्यक्तींमध्ये स्थान दिले आहे. काहींनी सुचवले आहे की, युक्रेनमधील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीला पुढे नेऊ शकते.

किम योंग बोक सध्या केपीएचे जनरल स्टाफचे डेप्युटी चीफ आहेत; ज्यांना आता आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळू लागली आहे. (छायाचित्र-एपी)

युक्रेनमध्ये उत्तर कोरियाची लष्करी तैनात कशी करण्यात आली?

युक्रेनियन अधिकाऱ्यांनी रशियामध्ये किमान ११ हजार उत्तर कोरियाचे सैनिक तैनात करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. कुर्स्क प्रदेश आणि इतर मोक्याच्या भागांत ही युनिट्स तैनात आहेत. या सैन्याची प्रत्येकी दोन ते तीन हजार सैनिकांच्या पाच फॉर्मेशनमध्ये व्यवस्था केली जात आहे आणि त्यांची ओळख अस्पष्ट करण्यासाठी रशियन युनिट्समध्ये त्यांना समाकलित केले जात आहे.

या सैन्याबरोबर तीन प्रमुख जनरलसह ५०० हून अधिक उत्तर कोरियाचे अधिकारी आहेत. ते तीन प्रमुख जनरल खालीलप्रमाणे :

  • कर्नल जनरल किम योंग बोक – सैन्याच्या समन्वयाची देखरेख.
  • कर्नल जनरल री चांग हो – गुप्तचर आणि हेरगिरी ऑपरेशन्सचे काम सोपवलेले रिकॉनिसन्स जनरल ब्यूरोचे प्रमुख.
  • मेजर जनरल सिन कम चेओल – ते वरिष्ठ जनरल आहेत, जे उत्तर कोरियाला परतल्यावर कमांड स्वीकारण्याची अपेक्षा आहे.

या घडामोडींमुळे नाटोकडून टीका झाली आहे. त्यामध्ये त्यांनी या तैनातीचे वर्णन, कोरिया आणि रशिया यांच्यातील लष्करी सहकार्याचा धोकादायक विस्तार, असे केले आहे. संयुक्त निवेदनात, नाटो आणि त्याचे मित्र राष्ट्र म्हणजेच ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युक्रेनसह युरो-अटलांटिक आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेवरील परिणामांबद्दल इशारा दिला आहे. रशियामध्ये किम योंग बोकची उपस्थिती प्रामुख्याने प्रशासकीय आणि धोरणात्मक आहे. स्टिमसन सेंटरमधील मायकेल मॅडेनसारख्या तज्ज्ञांनी सांगितले की, जबाबदाऱ्यांमध्ये सैन्य तैनातीवर देखरेख करणे, रशियन सैन्यासह समन्वय सुनिश्चित करणे आदींची जबाबदारी आहे.

किमने थेट लढाईत भाग घेणे अपेक्षित नाही; परंतु ते ऑपरेशनल कमांड वरिष्ठ कर्नल किंवा मेजर जनरलकडे हस्तांतरित करू शकतात. दरम्यान, कर्नल जनरल री चांग हो गुप्तचर ऑपरेशन्समध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी ओळखले जातात आणि मेजर जनरल सिन कुम चेओल कदाचित ते लढाऊ रणनीतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. युक्रेनियन आणि रशियन दोन्ही स्रोत सूचित करतात की, उत्तर कोरियाचे सैनिक आधीच दक्षिण युक्रेनमध्ये विशेषत: कुर्स्क प्रदेशात तैनात आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला की, उत्तर कोरियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात रशियन आक्रमणात सामील होते आणि त्यांनी याचा सामना करण्यासाठी अधिक पाश्चात्त्य समर्थनाची मागणी केली आहे.

हेही वाचा : लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?

पुढे काय?

रशियाच्या लष्करी प्रयत्नांमध्ये उत्तर कोरियाच्या सैन्याचा समावेश जागतिक भू-राजकारणातील महत्त्वपूर्ण विकासाचे चिन्ह आहे. रशियाला उत्तर कोरियाचा पाठिंबा दोन्ही देशांतील मजबूत संबंधांवर भर देते. रशियन राजदूत वॅसिली नेबेन्झ्या यांनी लष्करी या सहकार्याचा बचाव केला आणि असे सांगितले की, ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करतात आणि रशियाच्या मित्रराष्ट्रांकडून पाठिंबा मिळविण्याचा अधिकार त्यांना आहे. या तैनातीमुळे उत्तर कोरियाला दोन फायदे होतात. रशियाच्या सैन्याबरोबर व्यावहारिक लढाईचा अनुभव मिळतो आणि रशियाप्रति असणारी त्यांची निष्ठाही दिसून येते. विश्लेषकांनी सुचवले आहे की, उत्तर कोरिया जागतिक मंचावर ठाम आहे, हे सांगण्याच्या व्यापक धोरणाचा हा एक भाग आहे. परंतु, उत्तर कोरियाच्या सैन्याच्या उपस्थितीचा व्यापक निषेध करण्यात आला आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी प्रादेशिक स्थैर्याला हा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे आणि युक्रेनियन लष्करी नेत्यांनी परदेशी सैन्याने केलेल्या रशियन हल्ल्यांना तोंड देण्याची आव्हाने वाढली असल्याचे मत नोंदवले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kim yong bok the secretive north korean general leading troops in the russia ukraine war rac