Know About King Charles III’s Coronation : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन (सप्टेंबर २०२२) झाल्यानंतर किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा होणार आहे. ब्रिटिश परंपरेनुसार ६ मे २०२३ रोजी लंडनच्या वेस्टमिन्सटर ॲबे येथे राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या वेळी किंग चार्ल्स सेंट एडवर्ड मुकुट परिधान करतील. रत्नजडित मुकुटासह राजदंड, अंगठी आणि चांदी-सोनेमिश्रित असलेला चमचा अशा पवित्र आणि पारंपरिक वस्तू राजाला बहाल करण्यात येतील. राणी एलिझाबेथ यांनी १९५३ मध्ये राज्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुकुट परिधान केला होता. त्यानंतर हा मुकुट वस्तुसंग्रहालयात जमा करण्यात आला. आता पुन्हा एकदा राज्याभिषेकाच्या निमित्ताने राजाच्या डोक्यावर हा मुकुट पाहता येईल. मात्र या वेळी मुकुटात काही बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने रविवारी दिली. हे बदल नक्की कसे आहेत? ते का करण्यात आले? याचा घेतलेला हा आढावा.
कसा आहे सेंट एडवर्ड मुकुट?
ब्रिटनच्या राजेशाहीच्या इतिहासातील सर्वात जुना आणि पवित्र मानला जाणारा सेंट एडवर्ड मुकुट चार्ल्स यांच्या डोक्यावर चढविण्यात येणार आहे. १६६१ मध्ये किंग चार्ल्स द्वितीय यांच्या राज्याभिषेकासाठी हा मुकुट तयार करण्यात आला होता. १६५० च्या दशकात बंडखोर नेते ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन झाल्यानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा राजेशाहीची सुरुवात झाली होती. तेव्हापासून ब्रिटनच्या प्रत्येक राजा आणि राणीच्या राज्याभिषेकासाठी हा मुकुट वापरण्यात येत आहे. किंग चार्ल्स यांच्या डोक्यावर मुकुट व्यवस्थित बसावा यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये त्यामध्ये बदल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
या मुकुटाचे वजन अंदाजे २.२ किलो एवढे आहे. सोन्याच्या या मुकुटावर माणिक, नीलम, गार्नेट खडे, पुष्कराज, विविध रत्नांसहित जांभळ्या रंगाच्या मखमली कापडाचे आच्छादन आहे. सेंट एडवर्ड मुकुट हा अकराव्या शतकातील राजे ‘एडवर्ड द कन्फेसर’ (Edward The Confessor) यांच्या मूळ मुकुटाची नक्कल आहे.
सेंट एडवर्ड मुकुट हा केवळ राज्याभिषेक सोहळ्यासाठीच परिधान करण्यात येतो. याखेरीज किंग चार्ल्स ‘इम्पिरियल स्टेट क्राउन’ नावाचा दुसरा मुकुट राज्याभिषेक सोहळ्याच्या शेवटी परिधान करतील. या मुकुटाचे वजन एक किलो आहे. ब्रिटिश राजे इतर महत्त्वाच्या प्रसंगी इम्पिरियल स्टेट मुकुटच परिधान करतात.
चार्ल्स यांचे आजोबा जॉर्ज सहावे यांच्या १९३७ साली झालेल्या राज्याभिषेकासाठी मुकुटात अनेक बदल करण्यात आले होते. त्या वेळी मुकुटाला २,८६८ हिरे जडविण्यात आले होते. यामध्ये कलिनान हिऱ्यातील (Cullinan Diamond) सर्वात मोठा १०५ कॅरेटचा हिरा (कलिनान द्वितीय हिरा) जडविण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवल सरकारने १९०७ साली एडवर्ड सातवे यांच्या वाढदिवसानिमित्त हा हिरा भेट म्हणून दिला होता. या मुकुटावर ब्लॅक प्रिन्स रुबी नावाने ओळखला जाणारा लाल रंगाचा रत्न, १९ नीलम, ११ पाचू आणि २६९ मोती जडलेले आहेत.
क्रॉस मार्क असलेले सार्वभौम राजदंड
‘कलिनान प्रथम हिरा’ ज्याचे वजन ५३० कॅरेट एवढे आहे. ज्याला ‘आफ्रिकेचा तारा’ म्हटले जाते. जगातील सर्वात मोठा रंगहीन हिरा म्हणून याची ओळख आहे. सोन्याच्या राजदंडावर हा हिरा मढवला असून त्यावर ब्रिटनचे क्रॉस हे चिन्ह आहे. १६६१ पासून राज्याभिषेक सोहळ्यासाठी या राजदंडाचा वापर होत आहे. या राजदंडामध्ये शतकानुशतके अनेक बदल करण्यात आले आहेत. राजदंड सार्वभौम सत्ता आणि सुसाशनाचे प्रतीक मानले जाते.
पक्ष्याचे चिन्ह असलेला राजदंड
राज्याभिषेक सोहळ्यात हा दुसरा राजदंड राजाला प्रदान करण्यात येतो. हा राजदंड राजाची सार्वभौम आध्यात्मिक भूमिका विशद करतो. हा राजदंडदेखील १६६१ पासून वापरण्यात येत आहे. सोन्यापासून बनलेल्या या राजदंडाचे तीन भाग आहेत. हिरे, माणिक, पाचू आणि नीलम यांसारखी रत्ने राजदंडावर जडवलेली आहेत. सर्वात वरच्या भागावर पंख पसरलेल्या पक्ष्याचे चिन्ह आहे. हे चिन्ह पवित्र आत्म्याचे प्रतिनिधित्व करते.
सार्वभौम ओर्ब (पृथ्वीसदृश गोलाकार चिन्ह)
मुकुट, दोन राजदंड यांच्यासह सार्वभौम ओर्ब हे चिन्हदेखील राजाला देण्यात येते. गोलाकार पृथ्वीसदृश असलेले हे चिन्ह सोन्याचे असून त्यावर वरच्या बाजूला ख्रिश्चन धर्माचे प्रतीक क्रॉस चिन्ह आहे. गोळ्याच्या मध्यभागावर रत्न जडलेले आहेत. हे गोलाकार चिन्ह ख्रिस्ती सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करते.
अंगठी
राज्याभिषेक सोहळ्यात देण्यात येणाऱ्या अंगठीला ‘The Wedding Ring of England’ असेही म्हणतात. नीलम, माणिक आणि इतर रत्नांनी मढवलेली ही अंगठी १८३१ मध्ये राजे विल्यम सहावे यांच्या राज्याभिषेकावेळी तयार करण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्येक राज्याभिषेक सोहळ्याला ही अंगठी देण्यात येते. ही अंगठी राजाच्या सन्मानाचे प्रतीक आहे.
तलवार आणि गदा
राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान अनेक तलवारी समोर ठेवण्यात येतात. राजाला शाही अधिकार प्रदान करणारी ‘स्वॉर्ड ऑफ स्टेट’ ही तलवार १६७८ साली बनविण्यात आली होती. १९६९ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या राजकुमारपदी चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या वेळी ही तलवार सोहळ्यासाठी वापरण्यात आली होती. यासोबतच चिरकाल न्याय (Sword of Temporal Justice), आध्यात्मिक न्याय (Sword of Spiritual Justice), क्षमा (Sword of Mercy) या तलवारी राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान समोर ठेवल्या जातील. चार्ल्स पहिले यांचा १६२६ मध्ये जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हापासून या तलवारी समारंभासाठी वापरण्यात येतात. दागिन्यांनी, रत्नांनी मढवलेली तलवारदेखील (The bejewelled Sword of Offering) जॉर्ज चौथे यांच्या १८२१ च्या राज्याभिषेक सोहळ्यापासून समारंभासाठी वापरण्यात येते.
चांदीच्या दोन गदा, ज्यांचा वापर १६६० आणि १६९५ मध्ये करण्यात आला होता, त्यादेखील समारंभात दाखविण्यात येतील. ही सर्व ब्रिटनची ऐतिहासिक आणि औपचारिक चिन्हे असून देशाचे सार्वभौमत्व दर्शविणाऱ्या प्रसंगांत त्यांचे प्रदर्शन करण्यात येते. जसे की, राज्याभिषेक, संसदेचे अधिवेशन सुरू होताना.
आणखी वाचा >> प्रिन्स चार्ल्स किंग झाल्यानंतरचा अग्रलेख : राखील तो इमान!
कलश (AMPULLA)
१६६१ च्या राज्याभिषेकापासून वापरण्यात येणारा सोन्याचा कलश या वेळी पुन्हा पाहायला मिळेल. गरुडाचे चिन्ह असलेला हा कलश पवित्र तेलाने (holy oil) भरलेला आहे, असे मानले जाते. जेरुसलेम येथून मार्च महिन्यात हा कलश भरून आणण्यात आला आहे. ज्याचा वापर राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान होईल.
सोन्या-चांदीचा चमचा
मुकुट, गदा, तलावर, कलश या पवित्र वस्तूंसह सोने आणि चांदीमिश्रित चमचादेखील राज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरण्यात येतो. हा चमचा १२ व्या शतकात हेन्री द्वितीय किंवा रिचर्ड प्रथम यांच्या राज्याभिषेकावेळी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर किंग जेम्स प्रथम यांच्या १६०३ रोजी झालेल्या राज्याभिषेक सोहळ्यात हा चमचा वापरण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सोहळ्यात चमच्याचा वापर होत आहे.
कडी
राजाला प्रदान करण्यात येणारी दोन कडी प्रामाणिकपणा आणि शहाणपण याचे प्रतिनिधित्व करतात. राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी राजाच्या मनगटावर कडी घालण्यात येतात. ही कडी सैन्याच्या नेतृत्वाचीदेखील प्रतीक आहेत. ही कडीदेखील १६६१ पासून १९३७ पर्यंतच्या प्रत्येक राज्याभिषेक सोहळ्यात वापरण्यात आलेली आहेत. १९५३ साली राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मात्र वेगळ्या पद्धतीची कडी बनविण्यात आली होती.