जो कोणी कोणत्याही कंपनीत दीर्घकाळ काम करतो तो ग्रॅच्युइटी मिळवण्यास पात्र ठरतो. Gratuity कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाते. परंतु ही ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी तुम्हाला किमान ठराविक वेळेपर्यंत काम करावं लागेल, असा नियम आहे. याशिवाय तुम्हाला Gratuity मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी आणखी काही नियम पाळावे लागतील. या नियमांबद्दल तुम्हाला माहीत नसेल, तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला ग्रॅच्युइटी संदर्भात सर्व नियम सांगणार आहोत.
खरं तर कोणत्याही कंपनीत ठराविक काळ काम केल्यास कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी मिळतो, त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे. जर कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला एका निश्चित फॉर्म्युलानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल. ग्रॅच्युइटीचा कायदा काय आहे आणि त्याची गणना कशी केली जाते, हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ग्रॅच्युइटी कधी मिळते?
ग्रॅच्युइटी हा तुमच्या पगाराचा छोटा भाग आहे जो कंपनीकडून तुमच्या पगारातून कापला जातो. नियमांनुसार एखाद्या कंपनीत किमान ५ वर्षे काम केल्यास कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळते. तुम्ही ५ वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ नुसार, ज्या कंपनीत दररोज किमान दहा कर्मचारी काम करतात त्या कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो. ग्रॅच्युइटीच्या नियमांची पूर्तता केल्यानंतर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा कोणत्याही कारणाने नोकरी सोडल्यास त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.
ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?
ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा शेवटचा पगार १५ ने गुणाकार करून आणि २६ ने भागून तुम्ही कंपनीत काम केलेल्या वर्षांच्या संख्येसोबत गुणाकार करावा लागेल. म्हणजेच, जर तुम्ही एखाद्या कंपनीत २० वर्षे काम केले असेल आणि तुमचा शेवटचा पगार ७५,००० रुपये असेल, तर तुम्हाला सुमारे ८.६५ लाख रुपये ग्रॅच्युइटी म्हणून मिळतील. ग्रॅच्युइटी मोजण्याच्या सूत्रामध्ये, प्रत्येक महिन्यातील फक्त २६ दिवस मोजले जातात, कारण महिन्यातील ४ दिवसांच्या सुट्ट्या गृहीत धरल्या जातात. याशिवाय एका वर्षात १५ दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.
ग्रॅच्युइटीच्या फॉर्म्युल्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम केले असेल तर ते एक वर्ष म्हणून मोजले जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने ७ वर्षे ८ महिने एखाद्या कंपनीत काम केले असेल, तर त्याचा कार्यकाळ ८ वर्षे मोजला जातो. जर ७ वर्षे ३ महिने एखाद्या व्यक्तीनं काम केलं असेल तर ते फक्त सात वर्षच मोजले जातात.