– अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे. केवळ अमेरिकाच नव्हे तर अमेरिकेची शत्रूराष्ट्रे रशिया, उत्तर कोरिया यामुळे हादरली आहेतच. पण दक्षिण कोरिया, इस्रायल, ऑस्ट्रेलियासारख्या मित्रांच्या मनातही अमेरिकेच्या हेतूंबाबत शंका उपस्थित करणारी ही घटना आहे. युक्रेनने तर या कागदपत्रांच्या आधारे आपली युद्धनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. असे या कागदपत्रांमध्ये काय आहे, ती कुणी आणि का फोडली, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आगामी काळातील युद्धाची वाटचाल अवलंबून असेल.

ही कागदपत्रे नेमकी कसली आहेत?

अन्य कोणत्याही देशाप्रमाणे अमेरिकेचेही गुप्तहेर जगभरात आहेत आणि ते आपल्या देशाला गोपनीय माहिती पाठवत असतात. ही माहिती संकलित करून त्या आधारे एखाद्या आंतरराष्ट्रीय घटनेवरील भूमिका ठरविली जाते. अलीकडे उघड झालेली पेंटॅगॉनची कागदपत्रे ही या प्रकारचीच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाबाबत गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काही गृहितके यात मांडण्यात आलेली आहेत. यातील काही कागदपत्रे ही सहा आठवड्यांपूर्वीची आहेत, तर काही अगदी अलीकडची आहेत. यात युद्धाबाबत केली गेलेली भाकिते ही पुरेशी स्फोटक असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

युक्रेन युद्धाबाबत गोपनीय अहवाल काय सांगतो?

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यास १४ महिने झाले आहेत. या काळात युक्रेन वापरत असलेल्या सोव्हिएटकालीन एस-३०० आणि ‘बल्क एअर डिफेन्स सिस्टिम’ या हवाई संरक्षण यंत्रणांनी रशियाला बऱ्यापैकी जखडून ठेवले आहे. क्षेपणास्त्रे आणि इराक बनावटीचे आत्मघातकी ड्रोन या पलीकडे रशियाला जाता आलेले नाही. मात्र उघड झालेल्या कागदपत्रांनुसार ‘एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात युक्रेनकडील दारूगोळा संपुष्टात येऊ शकेल. असे झाल्यास रशियाला हवाईदलाच्या मदतीने युक्रेनच्या शहरांची राखरांगोळी करता येऊ शकेल आणि त्यामुळे युद्धाचे चित्र बदलेल.’ दुसऱ्या एका कागदपत्रानुसार बाख्मुतच्या लढाईमध्ये युक्रेनचा पराभव होता-होता राहिला. त्यासाठी युक्रेनला आपली राखीव ताकद वापरावी लागल्याचा फटका अन्यत्र बसत असल्याचे यात म्हटले आहे.

या कागदपत्रांबाबत युक्रेनची प्रतिक्रिया काय?

कागदपत्रे फुटणे हा रशियाचा बनाव असू शकतो, अशी शंका युक्रेनच्या राज्यकर्त्यांना आहे. मात्र युद्धात कोणताही धोका पत्करण्याचीही त्यांची तयारी नाही. त्यामुळे बचाव आणि प्रतिहल्ल्यांच्या धोरणांमध्ये आगामी काळात काही बदल केले जाऊ शकतात, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निकटवर्तियांनी दिली. मे महिन्यात युक्रेनचा दारूगोळासाठा आटणे, बाख्मुुतमधील लढाईचा युद्धसज्जतेवरील परिणाम आदी विषय युक्रेनची चिंता वाढविणारे आहेतच, शिवाय या कागदपत्रांनी आणखी एक महत्त्वाचा मुुद्दा ऐरणीवर आणला आहे. अमेरिका केवळ शत्रूराष्ट्रांवरच नव्हे, तर आपल्या जवळच्या मित्रांवरही पाळत ठेवत असल्याचे या कागदपत्रांनी उघड केले आहे.

अमेरिकेची कोणत्या मित्रराष्ट्रांवर हेरगिरी?

या कागदपत्रांमध्ये युक्रेनचे रणगाडे नष्ट करण्यासाठी रशियाने दाखविलेले ‘बोनस’चे आमिष किंवा रशियाचे खासगी लष्कर ‘वॅग्नर गट’ यांची जशी माहिती आहे तशीच युक्रेन, दक्षिण कोरिया, इस्रायल या सहकारी देशांमधील अत्यंत गोपनीय माहितीही त्यात आहे. युक्रेन युद्धात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी द. कोरिया, इस्रायल यांनी आखडता हात घेतल्याचे यात नमूद आहे. युक्रेनला विध्वंसक शस्त्रास्त्रे देण्यास या दोन्ही देशांमधून विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्रायलने युक्रेनला हल्ल्याची सूचना देण्याची यंत्रणा पुरविली असली तरी घातक शस्त्रे अद्याप दिलेली नाहीत. मात्र लवकरच एका मध्यस्थामार्फत इस्रायल अशी शस्त्रे युक्रेनला देणार असल्याचा उल्लेखही या कागदपत्रांमध्ये आढळतो, हे विशेष.

हेरगिरीवर अमेरिकेच्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?

दक्षिण कोरियाने कागदपत्रे बनावट असल्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या कथित संभाषणाच्या आधारे असलेली माहिती एकतर ‘असत्य’ किंवा ‘फेरफार केलेली’ आहे, असे या देशाचे म्हणणे आहे. २६ एप्रिल रोजी द. कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी या कागदपत्रांमुळे संंबंध ताणले जाऊ नयेत, अशीच द. कोरियाची भूमिका यातून दिसते. ऑस्ट्रेलियाने मात्र कागदपत्रे उघड होणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने आपल्या दोस्त राष्ट्रांना विश्वासात घ्यायला हवे होते, असा सूर ऑस्ट्रेलियाने लावला आहे. त्यामुळे अमेरिकेची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : गुलामांच्या व्यापारावर उभे राहिले ब्रिटिश राजेशाहीचे वैभव; पूर्वजांचे पाप उघड करण्यासाठी किंग चार्ल्स का तयार झाले?

कागदपत्रे फुटीवर अमेरिकेचे म्हणणे काय?

एकतर ही कागदपत्रे बहुतांश खरी असल्याचे पेंटॅगॉनने मान्य केले आहे. त्यामुळे आता ती समाजमाध्यमांवर कशी आली हे शोधून काढण्याचे काम यंत्रणांना करायचे आहे. प्राथमिक माहितीनुसार कुठल्यातरी टेबलवर कागदपत्रे ठेवून त्याची छायाचित्रे घेतली गेली आणि ती एक ‘रियल टाइम गेमिंग ॲप’वर प्रसृत झाली. तिथून मग ती प्रचलित समाजमाध्यमांवर आली, असे आतापर्यंत समोर आले आहे. मात्र यामागे अमेरिकेतील एखादा उच्चपदस्थ आहे की ही रशियाच्या गुप्तहेरांची चाल आहे, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. दुसरीकडे आपण केलेल्या कथित हेरगिरीबाबत मित्रराष्ट्रांच्या मनातील शंकांचेही अमेरिकेला निरसन करावे लागणार आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about leaked us secret documents about russia ukraine war pbs
Show comments