– राखी चव्हाण
पक्ष्यांच्या स्थलांतरणाचे कुतूहल साऱ्यांनाच असते. पक्ष्यांना स्थलांतरणाचा मार्ग कसा आठवत असेल, त्यांची दिशा कशी ठरत असेल, असे प्रश्न नेहमीच चर्चिले जातात. स्थलांतर करणारे विविध प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या लांबीचे मार्ग शोधतात. काही पक्ष्यांचे स्थलांतर खूपच कमी अंतराचे असते तर काही पक्षी जगाला दोन फेऱ्या मारल्यासारखे स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वात मोठा म्हणजेच ३६ हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतो. विशेषकरून हिवाळ्याच्या सुरुवातीला पक्षी स्थलांतर करतात. भारतातून बाहेर पक्षी स्थलांतरणाचे प्रमाण नगण्य आहे, पण बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात पक्षी भारतात येतात. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्यांच्या परतीचा प्रवास सुरू होतो.
कोणते पक्षी भारतात स्थलांतर करून येतात?
भारतात दरवर्षी सुमारे २९ देशांतील पक्षी स्थलांतर करून येतात. यात सुमारे ३७० प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश असून १७५ प्रजाती दीर्घकाळपर्यंत प्रवास करतात. सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान पक्ष्यांचे मोठे थवे भारताच्या दिशेने स्थलांतरणास सुरुवात करतात. मध्य आशियाई उड्डाणमार्गाचा वापर करून अमूर फाल्कन्स, इजिप्शियन गिधाडे, प्लवर्स, बदके, करकोचा, आयबिस, रोहित किंवा फ्लेमिंगो, जॅकनास, पोचार्ड्स आदी पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच पिंटेल डक्स, कर्ल्यूज, फ्लेमिंगो, ऑस्प्रे आणि लिटल स्टिंट्स दरवर्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. किंगफिशर व कॉम्ब डक्स उन्हाळ्यात व पावसाळ्यात भारतात स्थलांतर करतात.
भारतातून इतरत्र स्थलांतर करून जाणारे पक्षी कोणते?
भारतातून इतर प्रदेशात स्थलांतर करणाऱ्या पक्षांची संख्या अतिशय कमी आहे. स्पॉटेड फ्लायकॅचर, रुफ्स-टेल्ड स्क्रब रॉबिन आणि युरोपियन रोलर यासारखे काही पक्षी भारतातून स्थलांतर करतात. ते पश्चिम भारतातून हिवाळ्यात आफ्रिकेत स्थलांतर करतात. तर अमूर फाल्कन डिसेंबरमध्ये भारतातून जातात. चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वात मोठे स्थलांतर करतो.
भारतीय उपखंडात कोणत्या मार्गांनी पक्षी येतात?
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला, पाणथळीच्या पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात येणारे बहुतेक पक्षी या मार्गाने येतात. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा इशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.
स्थलांतरित पक्षी न चुकता त्या-त्या भागात कसे पाेहोचतात?
पक्षी सहज स्थलांतर करत नाहीत तर त्यांच्या गरजेसाठी ते स्थलांतर करतात. जगण्यासाठी लागणाऱ्या अधिवासात होणारा बदल, अन्नाची कमतरता, प्रजोत्पादनासाठी स्थिती, अशी अनेक कारणे पक्ष्यांच्या स्थलांतरणामागे आहेत. निसर्गानेच त्यांना स्थलांतरणाची प्रेरणा दिली आहे. नदी, समुद्री किनारे यांचा ते उपयोग करतात. स्थलांतरित पक्षी ठरलेल्या वेळी छोट्या, मध्य, लांब अंतराचे स्थलांतर करतात.
पक्ष्याच्या स्थलांतरणाचा मागोवा कसा घेतला जातो?
थेट निरीक्षणाद्वारे स्थलांतरित पक्ष्यांची नोंद घेण्याची पद्धत अतिशय जुनी, सोपी आणि वारंवार वापरली जाणारी आहे. पक्ष्याचा आकार, रंग, आवाज काढण्याची पद्धत अणि वेगवेगळ्या प्रजातीचे उड्डाण या बाबी पक्षी अभ्यासकांना मदत करतात. स्थलांतरित पक्ष्यांना पकडून, त्यांना इजा न पोहोचवता चिन्हांकित करून त्यांना परत नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. त्यातून पक्ष्यांच्या हालचालींबद्दल माहिती मिळते. रेडिओ ट्रॅकिंग किंवा टेलीमेट्रीचा उपयोग करूनही स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचालीचा मागोवा घेतात. स्थलांतरित पक्ष्याला एक लहान रेडिओ ट्रान्समीटर लावला जातो तो सिग्नल देत असतो आणि रेडिओ रिसिव्हिंग सेटच्या माध्यमातून स्थलांतरित पक्ष्याच्या प्रगतीचा शोध घेता येतो. आधुनिक काळात एअरक्राफ्ट मार्ग पाहणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रडार स्क्रीनवर स्थलांतरित पक्षी दिसतात असे दिसून आले आहे.
हेही वाचा : विश्लेषण: ओझोनच्या थराची छिद्रं दुरूस्त होऊ लागल्याचा अर्थ काय?
स्थलांतरित पक्ष्यांना कोणता धोका असतो?
गेल्या काही वर्षांत स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासावर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड या मानवी कृतीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. शेतातील कीटकनाशकांचा वापर, हवामान बदल यासारख्या इतर धोक्यांचा स्थलांतरित पक्ष्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. स्थलांतरणादरम्यान पूर्वी खैबरखिंडीत पक्ष्यांच्या शिकारी होत. आता हे प्रकार सर्वत्र वाढीस लागल्याने पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष्यांचे मांस आणि सजावटीसाठी होणारा पंख व पिसांचा वापर यामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. नागालँडमध्ये होणारी ससाण्याची शिकार हे त्याचे एक उदाहरण आहे.
rakhi.chavhan@expressindia.com