देशभरात करोना व्हायरसच्या चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण करोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट यायला अजूनही बराच वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. काही वेळा चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचे निधन होते. हे असे प्रकार टाळण्यासाठी इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सोमवारी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टला मंजुरी दिली. या चाचणीमुळे आता जलदगतीने करोना चाचणीचा रिपोर्ट मिळणे शक्य होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट म्हणजे काय?

या टेस्टमध्ये रुग्णाच्या नाकातून नमुने घेऊन अँटिजेन शोधण्यात येतात. अँटिजेन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मिसळलेला परदेशी पदार्थ. SARS-CoV-2 विषाणूमध्ये हा परदेशी घटक आढळतो.

नेहमीच्या प्रयोगशाळेबाहेर ही अँटिजेन डिटेक्शन टेस्ट करता येईल, तसेच रिझल्टही लगेच मिळेल. या टेस्टसाठी ICMR ने दक्षिण कोरियन कंपनी एस. डी. बायोसेन्सरनेच बनवलेले किट्स वापरण्याची परवानगी दिली आहे. हरयाणातील मानेसरमध्ये एस.डी.बायोसेन्सरचा उत्पादन प्रकल्प आहे. या टेस्टिंग किटला स्टँडर्ड क्यू कोविड-१९ एजी डिटेक्शन किट म्हटले जाते.

आरटी-पीसीआर आणि अँटिजेन टेस्टमध्ये फरक काय आहे?
सध्या RT-PCR टेस्टने करोना व्हायरसचे निदान केले जाते. RT-PCR प्रमाणेच अँटिजेन डिटेक्शन टेस्टने शरीरामध्ये व्हायरसने शिरकाव केला आहे का? ते शोधून काढण्यात येणार आहे. दोन्ही चाचण्यांच्या पद्धतीमध्ये फरक आहे. RT-PCR टेस्टसाठी खास लॅबची आवश्यकता असते, पण अँटिजेन डिटेक्शन टेस्टसाठी अशा लॅबची गरज भासत नाही. कारण किटसोबत असलेली उपकरणे पुरेशी आहेत.

वेळ हा दोन्ही चाचण्यांमधला महत्वाचा फरक आहे. RT-PCR ने चाचणी केल्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी दोन ते पाच तासाचा कालावधी लागतो. पण तेच रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्टमुळे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आहे की, नाही ते अर्ध्या तासात समजेल. खासकरुन करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये नियंत्रण मिळवण्यात या टेस्टिंगचा जास्त फायदा होईल.

कोविड-१९ चे जलदगतीने निदान करण्यासंदर्भात जगभरात आजच्या घडीला फार कमी विश्वसनीय रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट किट उपलब्ध आहेत. त्यामुळे भारताने एस. डी. बायोसेन्सर या दक्षिण कोरियन कंपनीला परवानगी दिली. आयसीएमआरने दोन ठिकाणी या किटचे मूल्यमापन केले, अचूकतेची पडताळणी केली. त्यानंतरच परवानगी दिली आहे.

कुठे होणार टेस्ट?
कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमध्ये आता वेगाने करोना चाचण्या करणे शक्य आहे. जागेवरच वैद्यकीय देखरेखीखाली रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट करण्याला सल्ला दिला आहे. फक्त किटचे तापमान २ डिग्री ते ३० डिग्रीच्या दरम्यान असले पाहिजे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about rapid antigen detection corona test dmp