– संदीप कदम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्याच्या दोन महिन्यांनंतर चेतन शर्मा यांना शनिवारी वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली. एकदा वगळून त्यांनाच पुन्हा नियुक्त कशासाठी केले गेले, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोच. शर्मा यांनी निवड झाली असली तरी त्यांच्या समितीत इतर चेहरे पाहण्यास मिळतील. भारतात होणारा विश्वचषक पाहता त्यांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे या निवड समितीतील नवीन चेहरे कोण, त्यांच्या अनुभवाचा कितपत फायदा निवड प्रक्रियेत होईल तसेच, त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील याचा घेतलेला हा आढावा.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीत कोणाला संधी मिळाली आहे?

शर्मा यांच्या नेतृत्वाखालील नवीन निवड समितीची शनिवारी घोषणा करण्यात आली. या समितीत दक्षिण विभागातून कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष एस. शरथ यांना स्थान देण्यात आले आहे. समितीत पूर्व विभागातून माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी, पश्चिम विभागातून सलिल अंकोला आणि मध्य विभागातून कसोटी सलामी फलंदाज शिव सुंदर दास यांना स्थान देण्यात आले आहे. दासने ओदिशाकडून खेळल्यानंतर विदर्भचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे, पूर्व विभागाचा खेळाडू असूनही तो मध्य विभागाच्या प्रतिनिधित्वासाठी पात्र ठरला. त्याचा सहकारी हरविंदर सिंगनेही अर्ज दाखल केला होता, मात्र मुलाखतीनंतरही त्याचा विचार करण्यात आला नाही. ‘बीसीसीआयने’ निवड समितीच्या पाच पदांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ ला आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात दिली होती. या पदांसाठी जवळपास ६०० अर्ज आले. अर्जांच्या छाननीनंतर आणि चर्चेअंती क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मुलाखतीसाठी अकरा जणांची निवड केली. मुलाखतीनंतर ‘सीएसी’ने पुरुषांच्या निवड समितीसाठी वरील उमेदवारांच्या नावाची शिफारस केली.

चेतन शर्मा यांची अध्यक्षपदी निवड का करण्यात आली?

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली. या समितीने निवडलेल्या संघाला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावे लागले. यानंतर शर्मा यांच्या निवड समितीवर खेळाडूंच्या निवडीवरही टीका झाली होती. नवीन निवड समितीची प्रक्रिया सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठीही शर्मा यांच्या निवड समितीनेच संघ निवडला, तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच, निवड समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा शर्मा यांना अर्ज दाखल करण्यास ‘बीसीसीआय’च्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानुसार शर्मा यांची निवड समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. या पदासाठी ‘बीसीसीआय’ला चांगला पर्याय मिळाला नाही का, हा प्रश्न अनेकांना असेल. मात्र, निवड समिती अध्यक्षाला एक कोटीहून अधिकची रक्कम मिळत नसल्याने ‘बीसीसीआय’ला मोठ्या नावांना या पदासाठी आकर्षित करण्यात अपयश आले. कारण, अनेक माजी खेळाडू समालोचन आणि इतर गोष्टींमधून चांगली कमाई करतात.

निवड समितीतील सदस्यांचा अनुभव किती?

दास आणि शर्मा हे दोघेही प्रत्येकी २३ कसोटी सामने खेळले. मात्र, शर्मा हे ६५ एकदिवसीय (दास चार सामने) सामने खेळले आहेत. शर्मा यांनी कसोटीत १९८४ मध्ये, तर दास यांनी कसोटीत २००० मध्ये पदार्पण केले. चेतनने कसोटीत ६१ तर, एकदिवसीय सामन्यांत ६७ बळी मिळवले आहेत. दास यांनी कसोटीत १३२६ धावा केल्या असून त्यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. तमिळनाडूचे माजी कर्णधार असलेले शरथ भारताकडून एकही सामना खेळलेले नाहीत. त्यांनी आपल्या १३४ प्रथम श्रेणी सामन्यांत ८३९० धावा केल्या आहेत, तसेच त्यांच्या नावावर २८ शतके आहेत.

‘‘शरथ यांनी १९ वर्षांखालील क्रिकेट जवळून पाहिले आहे आणि त्यांना कनिष्ठ स्तरावरील खेळाडूंबाबत माहिती आहे. त्याचा फायदा निवड समितीला होईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. बॅनर्जी यांनी गेल्या वेळीही पदासाठी अर्ज केला होता, मात्र देबाशीष मोहंतीमुळे त्यांची संधी हुकली होती. बॅनर्जी हे नावाजलेले गोलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि सध्या ते भारतीय गोलंदाज उमेश यादवचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. तसेच, रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक होते. बॅनर्जी यांनी एक कसोटी सामना खेळला असून त्यात त्यांनी तीन बळी मिळवले. तसेच, सहा एकदिवसीय सामन्यांत त्यांना पाच गडी बाद करता आले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिग्गज संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या अनुभवाचा फायदा सलिल अंकोला यांना झाला आहे. गेल्या समितीच्या कार्यकाळात पश्चिम विभागाकडून एक वर्षासाठी कोणीच प्रतिनिधी नव्हता. कारण, ॲबे कुरूविला यांनी कनिष्ठ आणि वरिष्ठ निवड समिती मिळून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. अंकोला यांनी एक कसोटी सामना खेळत दोन गडी बाद केले. तर, २० एकदिवसीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १३ बळी मिळवले.

निवड समितीसमोर आगामी काळात कोणती आव्हाने असतील?

आगामी काळात भारतीय संघाला मोठ्या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळायची आहे. यानंतर भारतासमोर सर्वाधिक आव्हानात्मक म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवड समितीवर या मालिकांसाठी संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : विश्वविजयासाठी निवडलेले टीम इंडियाचे २० मोहरे कोण आहेत?

यासह एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असल्याने स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडू निवडण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्यावर असेल. तसेच, खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. जेणेकरून संघात तंदुरुस्त खेळाडूंची निवड करता येईल. अनुभवी खेळाडूंच्या संघात पुनरागमनानंतर त्यांना योग्य पद्धतीने संघ निवडावा लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about announcement of chetan sharma as president of bcci selection committee print exp pbs