– आसिफ बागवान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅटजीपीटीच्या उगमानंतर कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) उदोउदो सर्वत्र होत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहारातले अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे सांगितले जात आहे. त्याच वेळी या तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ गरज कमी होणार असल्याने बेरोजगारी फोफावेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. ‘एआय’च्या साधकबाधक वैशिष्ट्यांवर समाजात चर्चा सुरू असतानाच आता या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांनाच त्याची धास्ती वाटू लागली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी ही भीती उघडपणे बोलून दाखवली आहे. इतकेच काय, अमेरिकेच्या सरकारलाही या तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाटू लागली असून यासाठी या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठकही बोलावण्यात आली आहे. ‘एआय’बद्दल भीती व्यक्त करणारे हे अधिकारी कोण आणि त्यांनी काय इशारा दिला, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

‘निवडणुकीत गैरवापर होईल’…

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य अर्थतज्ज्ञ मायकल श्वार्ज यांनी कृत्रिम प्रज्ञेवर ‘धोकादायक’ असा शिक्काच मारला आहे. जिनिव्हामध्ये जागतिक आर्थिक परिषदेच्या समितीमध्ये श्वार्ज यांनी जाहीरपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विरोध केला आहे. ‘हे तंत्रज्ञान खल प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हातात गेले तर ते यातून विध्वंस करतील. स्पॅमर किंवा हॅकर मंडळी एआयचा वापर निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी करतील. अन्य सार्वजनिक हितांच्या कामांतही या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जाईल,’ अशी भीती श्वार्ज यांनी व्यक्त केली.

‘एआय’च्या ‘गॉडफादर’लाच पश्चात्ताप!

मायक्रोसॉफ्टचे अर्थतज्ज्ञच ‘एआय’बद्दल चिंतित असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या गुगलमध्येही कृत्रिम प्रज्ञेबद्दल शंका व्यक्त केली आहे. तीही या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ समजले जाणारे डॉ. जेफरी हिन्टन यांनी. मानवी मेंदूच्या संरचनेप्रमाणे अल्गोरिदमचे जाळे तयार करून संगणकाला ‘डीप लर्निंग’साठी सक्षम बनवणाऱ्या संशोधनाचे श्रेय हिन्टन यांना जाते. चॅटजीपीटी तंत्रज्ञानाच्या निर्मितीत त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. ७५ वर्षीय हिन्टन यांनी नुकतीच गुगलमधून निवृत्तीची घोषणा केली. हे करत असतानाच हिन्टन यांनी एआय भविष्यात घातक ठरेल, असे भाकित वर्तवले आहे. ‘सध्या कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या सामान्य ज्ञानाची भूक भागवत असली तर, येत्या काळात हे तंत्रज्ञान मानवी मेंदूपेक्षाही अधिक वेगाने निर्णय घेऊ शकेल. हे अत्यंत धोकादायक आहे,’ असे ते म्हणाले.

हिन्टन यांना कशाची भीती वाटते?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल धोक्याचा इशारा देणारा एक लेख हिन्टन यांनी अलिकडेच ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिला आहे. त्यात त्यांनी ‘एआय’ हे समाजविघातक व्यक्तींच्या हातचे खेळणे बनू शकेल, अशी भीती व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारखी एखादी व्यक्ती या तंत्रज्ञानावर आधारित यंत्रमानव विकसित करून त्यांना त्यांच्या पद्धतीने एखादे विध्वंसक कृत्य तडीस नेण्याच्या आज्ञा देऊ शकते, असे हिन्टन म्हणाले. अशी स्वैरसंचाराची मुभा मिळालेले यंत्रमानव स्वत:ला अधिक बलशाली बनवण्यासाठी स्वत:च काम करतील, असे हिन्टन म्हणाले.

‘डिजिटल कॉपी’चा धोका…

हिन्टन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक सत्यही समोर आणले आहे. मानवापेक्षाही बुद्धिमान झालेले अतिप्रगत चॅटबॉट किती घातक ठरू शकते, हे सांगताना हिन्टन म्हणतात, ‘हे तंत्रज्ञान डिजिटल स्वरूपात असते. डिजिटल तंत्रज्ञानात एका चॅटबॉटला मिळालेली माहिती ते अन्य चॅटबॉटशी त्वरित शेअर करत असते. यामुळे अतिप्रगत झालेला एखादा राेबो अन्य रोबोंनाही तितकेच सक्षम बनवू शकतो.’

हेही वाचा : मानवी मेंदू की कृत्रिम प्रज्ञा श्रेष्ठ – कनिष्ठ ठरविता येईल?

या भीतीचे गांभीर्य किती?

हिन्टन किंवा श्वार्ज यांनी व्यक्त केलेल्या शक्यतांनी तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. ब्रिटनच्या ॲडव्हान्स रिसर्च ॲण्ड इन्व्हेन्शन एजन्सीचे अध्यक्ष मॅट क्लिफोर्ड यांनी या तंत्रज्ञानाचे नियमन आणि नियंत्रण करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे. यापूर्वी टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक उद्योगपतींनी ‘एआय’च्या अनिर्बंध वापराला वचक बसवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी नुकतेच गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय यांच्यासह काही कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. या बैठकीत ‘एआय’बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about fear of misuse of artificial intelligence ai google microsoft in worry print exp pbs