– अभय नरहर जोशी

‘एमव्ही गंगा विलास’ या नदीतील सर्वांत लांब ‘क्रूझ’चे पर्यटन सुरू झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. वाराणसीहून निघालेली ही ‘क्रूझ’ ३२०० किलोमीटरचे अंतर कापून ५२ दिवसांनी बांग्लादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड येथे १ मार्च रोजी पोहोचणार आहे. तिच्या वैशिष्ट्यांविषयी व नदी पर्यटनविकासाविषयी…

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

या ‘क्रूझ’चा प्रवास कसा होणार?

भारताच्या ‘एमव्ही गंगा विलास’ या जगातील सर्वाधिक लांबीच्या नदीतील ‘क्रूझ’द्वारे देशाच्या पर्यटनातील नव्या अलिशान युगाची नांदी झाली आहे. ‘अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ’द्वारे चालवण्यात येणारी ही ‘क्रूझ’ भारतातील जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट, प्रमुख शहरे, ५० पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. ही ‘क्रूझ’ वाराणसीसह पाटणा, कोलकाता, ढाका आणि गुवाहाटी आदी प्रमुख शहरांना भेट देईल. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण-‘इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया’चे (आयडब्ल्यूएआय) अध्यक्ष संजय बंदोपाध्याय यांनी सांगितले, की ‘गंगा विलास’च्या या पहिल्याच प्रवासात ३२ स्विस नागरिक सहभागी होतील. ही ‘क्रूझ’ १ मार्च रोजी आसामच्या दिब्रुगड येथे पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. यंदा ‘जी-२०’चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त भारतात येणाऱ्या विदेश मान्यवरांना या ‘क्रूझ’द्वारे सफर घडवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

‘क्रूझ’ची वैशिष्ट्ये काय आहेत?

या ‘क्रूझ’ बोटीची लांबी ६२ मीटर असून, रुंदी १२ मीटर आहे. ती तीन मजली आहे. यासाठी ६८ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. यात १८ अलिशान खोल्या असून, ३६ जण त्यात वास्तव्य करू शकतील. अलिशान खोल्यांव्यतिरिक्त या ‘क्रूझ’वर ‘सूर्यस्नाना’साठी ‘डेक’, ‘स्पा’, ‘लाऊंज’, उपाहारगृह, ग्रंथालय, अद्ययावत व्यायामशाळा (जिम) आदी सुखसोयी असतील. ‘गंगा विलास’ ३२०० किलोमीटर अंतर कापून मिसिसिपी नदीवरील ‘क्रूझ’ला मागे टाकणार आहे. मिसिसिपी नदीवरील ‘क्रूझ’ २२५३ ते २५७४ किलोमीटरचा पल्ला गाठते.

प्रवास शुल्क काय आहे?

या ‘क्रूझ’चे मुक्कामाचे सर्वसमावेशक शुल्क प्रति रात्र ५० हजार असून, तिची तिकिटे ‘अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र, या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सिंग यांनी सांगितले, की ही ‘क्रूझ’ आगामी दोन वर्षांसाठी आरक्षित झालेली आहे. ही आरक्षणे रद्द झाली तरच या ‘क्रूझ’चे तिकीट उपलब्ध होऊ शकेल. दरवर्षी सहा प्रवास फेऱ्या करेल. पर्यटकांना संपूर्ण ५२ दिवसांच्या प्रवासासाठी ‘क्रूझ’वर राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय वाराणसी ते कोलकाता व कोलकाता ते दिब्रुगड अशा लहान टप्प्यांच्या प्रवासाचीही सोय असेल.

पर्यटनाचा मार्ग कसा असेल?

वाराणसीतील गंगा आरतीनंतर ही ‘क्रूझ’ बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ सारनाथकडे रवाना होईल. त्यानंतर तांत्रिक कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि आसाममधील सर्वात मोठे नदी बेट आणि वैष्णव संस्कृतीचे केंद्र असलेल्या माजुली येथेही ही ‘क्रूझ’ भेट देईल. याशिवाय ही ‘क्रूझ’ सुंदरबन आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातून मार्गक्रमण करेल. बिहारमध्ये ‘गंगा विलास’वरील अभ्यागतांना ‘बिहार स्कूल ऑफ योग’ आणि विक्रमशीला विद्यापीठास भेट घेण्याची संधी आहे. या ‘क्रूझ’चा प्रवास बांगलादेशातूनही होणार आहे. या प्रवासात येणारी बरीच ठिकाणे पवित्र धार्मिक स्थळे असल्याने, या ‘क्रूझ’मध्ये शाकाहारी पदार्थ दिले जातील. या ‘क्रूझ’वरील विविध सुविधा या धार्मिक भावना लक्षात घेऊन पुरवल्या जाणार आहेत.

सरकारची भूमिका काय आहे?

केंद्रीय जहाज, बंदरे आणि जलमार्ग मंत्रालय या ‘क्रूझ’द्वारे होणाऱ्या पर्यटन मोहिमेचे समन्वयक आहे. ही ‘क्रूझ’ भारत व बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून प्रवास करणार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, की पर्यटकांसाठी सर्व सुविधा आणि सुरक्षा संकेतांची काळजी घेण्यात आली आहे. देशातील ‘क्रूझ’ पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकार अनेक पावले उचलत आहे. देशात नदी ‘क्रूझ’ पर्यटन विकसित करण्याची गरज अधोरेखित करताना केंद्रीय जहाज व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीे सांगितले, की यामुळे किनाऱ्यांवरील प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ते म्हणाले, की देशातील या पर्यटन क्षेत्राच्या जलद विकासासाठी व ते रूढ होण्यासाठी नवीन नदी पर्यटन केंद्र विकसित करून विद्यमान पर्यटन केंद्रांशी जोडले जातील.

हेही वाचा : बार, स्पा अन् रेस्टॉरंट; जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ आतून कशी आहे? पाहा PHOTOS

नदी पर्यटन विकासासाठी कोणते उपाय?

भारतात सध्या कोलकाता आणि वाराणसी दरम्यान आठ नदी जलपर्यटन ‘क्रूझ’ कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय जलमार्ग २ (ब्रह्मपुत्रा) वरही ‘क्रूझ’सेवा कार्यरत आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. भारत सरकारने देशाच्या क्रूझ पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, ज्यात पायाभूत सुविधांत सुधारणा, सुसंगत बंदर शुल्क, ई-व्हिसा सुविधांची तरतूद आदींचा समावेश आहे. ‘क्रूझ’ प्रवासी वाहतूक सध्या चार लाख क्षमतेवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. क्रूझ पर्यटनाची आर्थिक उलाढाल येत्या काही वर्षांत ११ कोटी डॉलरवरून ५.५ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.

abhay.joshi@expressindia.com