– अमोल परांजपे
अंतर्गत युद्धामुळे प्रचंड अशांत झालेल्या सुदानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ असे या मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वी जगभरात जेव्हा-जेव्हा मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा आपल्या नागरिकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने अशा विविध मोहिमा हाती घेतल्या. ‘ऑपरेशन कावेरी’च्या निमित्ताने यातील काही प्रमुख मोहिमांची ही उजळणी.
कुवेतमधून भारतीयांच्या सुटकेचा विश्वविक्रम
१९९० साली इराकचे सद्दाम हुसेन यांनी कुवेतमध्ये रातोरात एक लाख सैनिक आणि ७०० रणगाडे घुसविले. कुवेतचे अमीर-उमराव आणि अन्य महत्त्वाचे अधिकारी सौदी अरेबियामध्ये पळून गेले. हल्ल्याला १२ दिवस उलटल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी तब्बल १ लाख ७० हजार भारतीय नागरिकांना कुवेतमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. जगात तोपर्यंत झालेली ही सर्वात मोठी निष्कासन मोहीम होती. या मोहिमेसाठी ‘एअर इंडिया’चे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदविले गेले.
आखाती देशांमध्ये राबविलेल्या अन्य मोहिमा
कुवेतची ‘एअरलिफ्ट’ मोहीम ही सर्वात मोठी असली तरी अशांत आखाती देशांमधून अशा मोहिमा भारताला अनेकदा राबवाव्या लागल्या आहेत. जून २००६मध्ये इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्ध भडकल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सुकून’ राबविले. ‘बैरूत सीलिफ्ट’ नावानेही प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेमध्ये १९ जुलै ते १ ऑगस्ट यादरम्यान २,२८० नागरिकांना युद्धभूमीतून बाहेर काढण्यात आले. यामध्ये काही नेपाळी आणि श्रीलंकेच्या नागरिकांचाही समावेश होता. २०११मध्ये ‘ऑपरेशन होम कमिंग’अंतर्गत लिबियामधून १५,४०० भारतीयांना मायदेशी आणले गेले. २०१५ मध्ये येमेनचे सरकार आणि हुती बंडखोरांमध्ये संघर्ष पेटल्यानंतर तेथे असलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन राहत’ राबविण्यात आले. यामध्ये ४,६४० भारतीयांसह ४१ देशांच्या ९६० नागरिकांना यशस्वीरीत्या तेथून बाहेर काढले.
युक्रेन युद्धावेळी राबविलेले ‘ऑपरेशन गंगा’
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी जात असतात. २०२२मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर असे सुमारे १६ हजार विद्यार्थी तेथे अडकून पडले. याखेरीज सुमारे २ हजार अन्य नागरिक युक्रेनमध्ये होते. हवाई हद्द बंद होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना परत आणणे आवश्यक होते. त्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम राबविली. युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देऊन नजीकच्या रोमानिया, हंगेरी, पोलंड, मोल्डोवा आणि स्लोवाकिया या देशांमधून त्या-त्या देशांतील सरकारांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून मायदेशी आणण्यात आले. भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच काही पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन विद्यार्थ्यांचीही या मोहिमेतून सुटका करण्यात आली.
करोनाकाळात मोहीम
२०२०मध्ये जगभरात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले. दळणवळणाची सर्व साधनेही बंद झाली होती. अशा वेळी अन्य देशांमध्ये नोकरीनिमित्त गेलेले नागरिक आणि पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणणे ही मोठी जबाबदारी केंद्र सरकारवर होती. त्या वेळी दोन मोठ्या मोहिमा राबविण्यात आल्या. ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळून तब्बल ६० लाख नागरिकांना मायदेशी आणले गेले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार १८,८९,९६८ नागरिक एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांमधून, ३६,९२,२१६ नागरिकांना खासगी विमानांमधून, तर ५,०२,१५१ नागरिक जमिनीवरून सीमा ओलांडून भारतात परतले. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ‘ऑपरेशन समुद्रसेतू’ हाती घेण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत नौदलाच्या जहाजांमधून ३,९८७ जणांना आणण्यात सरकारला यश आले. आयएनएस जलाश्व, आयएनएस ऐरावत, आयएनएस शार्दूल, आयएनएस मगर ही नौदलाची जहाजे ५५ दिवस चाललेल्या या मोहिमेत सहभागी झाली होती.
नेपाळ भूकंपानंतर राबविलेले ‘ऑपरेशन मैत्री’
२०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर भारताने ‘मैत्री’ ही मोहीम राबविली. विशेष म्हणजे भूकंप झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये भारत सरकार आणि लष्कराच्या या संयुक्त मोहिमेची सुरुवात झाली. नेपाळमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू करणारा भारत हा पहिला देश ठरला. या मोहिमेमध्ये भूकंपामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या ५ हजार भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले. तसेच अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि जर्मनीच्या १७० नागरिकांचीही भारतीय मोहिमेद्वारे सुटका करण्यात आली.
विविध देशांमध्ये राबविलेल्या अन्य मोहिमा
२०१६मध्ये बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर २८ विमान कर्मचाऱ्यांसह २४२ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. त्याच वर्षी ‘ऑपरेशन संकटमोचक’ राबवून दक्षिण सुदानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले. २०१८मध्ये येमेनमधील सोकोत्रा बेटावर वादळामुळे अडकून पडलेल्या ३८ भारतीयांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन निस्तार’ राबविले. २०२१मध्ये अफगाणिस्तानमधून भारतीय कामगारांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन देवी शक्ती’ राबविण्यात आले.
amol.paranjpe@expressindia.com