समाजात असे काही विषय आहेत ज्याबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक विषय म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळी नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट असताना आजही मासिक पाळीमुळे स्त्रियांना सामाजिक स्तरावर भेदभावाला सामोरं जावं लागतं. मातृप्रधान संस्कृतीचा प्रभाव असणाऱ्या आदिवासी समाजातही मासिक पाळीविषयी वेगवेगळे गैरसमज आहेत. त्याचाच भाग म्हणजे आदिवासी समाजातील कुर्मा प्रथा. ही कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत काय मतप्रवाह आहेत? आणि कुर्मा प्रथेवर समाजात नेमकं काय काम होत आहे? या प्रश्नांचा हा आढावा…
कुर्मा प्रथा काय आहे?
काही आदिवासी जमातींमध्ये मासिक पाळीच्या काळात दर महिन्यात महिलांना घराबाहेर रहावं लागतं. त्यासाठी गावाबाहेर स्वतंत्र झोपडी तयार केली जाते. या झोपडीलाच ‘कुर्माघर’ असं म्हटलं जातं. अनेकदा या झोपड्यांची अवस्था अस्वच्छ आणि असुरक्षित असते. त्यामुळेच त्या झोपडीत राहणं महिलांसाठी प्रचंड त्रासाचं व भीतीचं असतं. मात्र, प्रथा म्हणून ते त्यांना आजही पाळावं लागत आहे. गडचिरोली, रायगड, बिजापूर, बस्तर, नारायणपूर अशा काही भागातील गोंड आणि माडिया आदिवासी समाजात ही प्रथा पाळली जात असल्याचं पाहायला मिळतं.
कुर्मा प्रथेचे दुष्परिणाम काय?
याविषयी बोलताना समाजबंध संस्थेच्या कार्यकर्त्या शर्वरी सुरेखा अरुण म्हणाल्या, “कुर्माघरात महिला साप, विंचू अशा विषारी प्राण्यांच्या दंशाने मरण पावल्याच्या घटनाही घडतात. गंभीर म्हणजे कुर्माघरात असताना आजारी महिला दवाखान्यातही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे इतर आजारही बळावतात आणि स्वच्छता नसल्याने जंतुसंसर्ग होतो. एकट्या महिलांना भर वादळात, पावसात तकलादू अशा झोपडीत रहावे लागते. रात्री भीतीने आणि पाणी गळत असल्याने झोप येत नाही. इतरवेळी आश्रमशाळेत असणाऱ्या मुलींना सुट्टीत गावात आलं की हे पाळावं लागल्याने शाळकरी मुलींना, नोकरीला असलेल्या, तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या, बाहेरगावी सासर असलेल्या मुलींना आता गाव नकोसा वाटायला लागला आहे.”
“गावातीलही बहुतांश महिलांना या प्रथेतील फोलपणा लक्षात येत आहे. चाळीशीच्या आतील महिलांना तर हे सर्व नकोच आहे. गावातील शिकलेल्या पुरुषांना, युवकांनाही या प्रथेची गरज नाही असं वाटतं. ‘पण….’, हा ‘पण’ फार मोठा आहे. गावातीलच काही प्रस्थापित प्रतिष्ठित व्यक्तींना कुर्माप्रथा मोडणे मान्य नाही. कारण ही प्रथा त्यांनी त्यांच्या आदिवासी संस्कृतीचा भाग आहे, असा त्यांचा दावा आहे. या निर्णयप्रक्रियेत वर्चस्व असलेल्या ‘त्या ४ लोकांचा’ रोष ओढवून कोण घेणार? वाळीत टाकलं, दंड वसूल केला तर? या भीतीमुळे कोणीही याविरोधात बोलायला-कृती करायला तयार होत नाही,” असं समाजबंधचं निरीक्षण असल्याचं सचिन आशा सुभाष यांनी सांगितलं.
“संस्कृती, प्रथा आणि कुप्रथा यातील फरक जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत महिलांचं हे असं शोषण थांबणार नाही. यासाठी सातत्याने लोकांशी याविषयी बोलणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या विषयावर सातत्याने समाजबंध काम करत आहे,” असंही सचिन आशा सुभाष यांनी नमूद केलं.
कुर्मा प्रथेवर मतमतांतरं
कुर्मा प्रथेवर महिलांना भेदभावाचा सामना करावा लागत असला तरी त्यावर काही मतमतांतरेही आहेत. या प्रथेचं समर्थन करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुर्मा प्रथा आदिवासींच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून पारंपारिक कुर्मा घरांऐवजी चांगल्या सुविधा असलेली कुर्मा घरं बांधून देण्याच्या पर्यायाचं समर्थन होत आहे. विशेष म्हणजे काही संस्था आणि सरकारी यंत्रणाही लोकांच्या भावना दुखवायला नको म्हणून हा आदिवासी संस्कृतीचा भाग आहेत असं म्हणत आहेत. तसेच लोकांचा रोष नको म्हणून कुर्मा प्रथा बदलणार नाही म्हणत त्यापासून अंतर राखून आहेत. त्यावर पर्याय म्हणून सिमेंटची कुर्माघरे बांधून देत आहेत, असा आरोप समाजबंध संस्थेने केला आहे.
कुर्मा प्रथेला विरोध करणाऱ्यांकडून कुर्मा घरं भेदभावाचं प्रतिक असल्याचं म्हणत त्याला विरोध होत आहे. कुर्मा घर सोयी सुविधांनी युक्त असलं तरी महिलांना त्यांच्या पाळीमुळे स्वतःच्याच घराबाहेर राहावं लागतं आणि भेदभावाला सामोरं जावं लागतं, अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली जाते.
कुर्मा प्रथेवर काय प्रयत्न सुरू?
कुर्मा प्रथेत सुधारणा व्हावी म्हणून समाजबंध या संस्थेने गडचिरोलीतील गावांमध्ये काम सुरू केलं आहे. याचाच भाग म्हणून या गावांमधील पाळीविषयी जाणीव असलेल्या मुलींची ‘आरोग्य सखी’ म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. यानंतर याच आरोग्य सखी ‘मासिक पाळी आणि महिला आरोग्य’ या विषयावर गावात राहून काम करत आहेत. यात स्थानिक प्रशासन, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांकडूनही सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे दर सहा महिन्यांनी असे शिबीर विविध गावांमध्ये आयोजित करण्याचा संकल्पही समाजबंध या संस्थेने व्यक्त केला आहे.
इतकंच नाही, तर समाजातील काही संवेदनशील युवक समाजबंधच्या छत्राखाली एकत्र येत कुर्मा प्रथा पाळली जात असलेल्या गडचिरोली आणि रायगड जिल्ह्यात ‘सत्याचे प्रयोग’ नावाची मोहीम हाती घेतली आहे. यानुसार या जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातील अनोळखी गावात जाऊन आदिवासी लोकांसोबत ‘सहजीवन आणि सहभोजन’ या पद्धतीने प्रबोधनात्मक काम केलं जातंय. गडचिरोलीत काही आदिवासी समुदायात असणाऱ्या कुर्मा प्रथेत चांगले बदल व्हावेत यासाठी समाजबंधने एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील १८ गावात पहिलं आठ दिवसीय निवासी शिबिर राबवलं.
समाजबंध व्यतिरिक्त कुर्मा निर्मूलनासाठी काम ‘स्पर्श’ (SPARSH) नावाची संस्थाही गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात काम करत आहे. कुर्मा प्रथेविषयी प्रबोधन करताना महिलांना हाताला काम दिलं, त्यांनी आर्थिक सक्षमता मिळवली तर त्यांच्या आवाजाला बळ प्राप्त होईल. तसेच यातून महिलांना वापरण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध करून देणे या दुहेरी हेतूने स्पर्श संस्थेचे प्रमुख दिलीप बारसागडे यांनी आदिवासी गावांमधील महिलांसाठी एका गावात ४ शिलाई मशीन याप्रमाणे आतापर्यंत १६ गावात हा उपक्रम राबवला आहे.
समाजबंधने भामरागडमधील १६ गावं फिरून तेथील परिस्थिती पाहिली, लोकांच्या भेटी घेतल्या. तसेच भामरागडमधे शासनाने बांधलेली, धानोरात संस्थांनी, आदर्श गावांनी बांधलेली कुर्माघरं पाहिली आणि त्यातल्या महिलांची भेट घेतली. भामरागडमधे सत्याचे प्रयोग शिबिरात १२०० महिलांना जवळपास ५ लाख रुपयांचे कापडी पॅड समाजबंधने एकदा म्हणून मोफत दिले. समाजबंधने मागील सहा वर्षात पुणे व रायगड येथील कापडी पॅड निर्मिती प्रकल्पासह एकूण २२ जिल्ह्यात ९५० हून अधिक प्रबोधन सत्र घेत ३८,००० महिला-मुलींना याचा लाभ दिला. तसेच भामरागड-गडचिरोलीमध्ये कुर्माप्रथेला घेऊन १९ गावात ‘सत्याचे प्रयोग’ केले.
महिलांना कुर्माघरात ठेवावं कि घरी यावर चर्चा करण्यासाठी भरवलेल्या महिला सभेला काही गावात सुमारे १००च्या आसपास अधिक स्त्री-पुरुष उपस्थित होते. ३ गावांतील पारंपरिक नेतृत्व/प्रतिष्ठित पुरुषांनी महिलांनी कुर्माघरात रहावं की घरात की अंगणात हे त्यांचं त्यांनी ठरवलं तरी आमची हरकत नसेल आणि आम्ही त्यासाठी कुणाकडून दंड घेणार नाही असे भर सभेत घोषित केले. हे कुर्मा निर्मूलनाच्या प्रवासातील फार क्रांतिकारक पाऊल आहे, असं मत सचिन आशा सुभाष यांनी व्यक्त केलं.
प्रबोधनाच्या प्रयत्नांना यश
सत्याचे प्रयोग या समाजबंधच्या मोहिमेला यशही मिळालं आहे. गडचिरोलीतील १० गावांमधील जवळपास ४०० महिलांनी मी कुर्माघरात राहणार नाही अशी शपथ भरसभेत पुरुषांसमोर घेतली. तसेच घोषणापत्रावर अंगठा/सही करत आपला निर्णय जाहीर केला. १०० हून अधिक पुरुषांनीही त्याला अनुमोदन देत त्यावर सह्या केल्या.
हेही वाचा : Women’s Day 2019 : मी, ती आणि आमची मासिक पाळी
असं असलं तरी सर्वच गावांमध्ये असाच प्रतिसाद मिळाला असं नाही. काही गावात अजिबातच ऐकून घेतलं गेलं नाही, तर काही गावांतून कार्यकर्त्यांना हाकलून देण्यात आलं. मात्र, यानंतरही समाजबंधचे कार्यकर्ते खचले नाही. आपण प्रबोधन करत राहिलो, तर विरोध होतो, पण काही ठिकाणी बदलही होतो हेच सत्याच्या प्रयोगातून समोर येत आहे. त्यामुळे न घाबरता अनिष्ठ प्रथेच्या विरोधात जात महिलांचं आरोग्य, सुरक्षा आणि आत्मसन्मान जपला पाहिजे, यासाठी समाजबंधसारख्या संस्था काम करत आहेत.