– अमोल परांजपे

पाकिस्तानच्या पेशावर शहरात मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये झालेला हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला मानला जात आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या कट्टरतावादी अतिरेकी संघटनेने याची जबाबदारी फेटाळली असली, तरी संशयाची सुई याच संघटनेकडे आहे. पाकिस्तान प्रचंड आर्थिक संकटात असताना तिथल्या दहशतवादी संघटना डोके वर काढू लागल्या आहेत. दुसरा अफगाणिस्तान होण्याच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्याच वेळी आपला सर्वात जवळचा शेजारी या नात्याने भारतालाही सावध होणे गरजेचे आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
Macoca , Demand of Marathi family,
मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश

तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटनेचा इतिहास काय आहे?

अफगाणिस्तानातील गेल्या अनेक दशकांच्या रक्तरंजित इतिहासामुळे ‘तालिबान’ हा शब्द आपल्या परिचयाचा आहेच. टीटीपी ही अतिरेकी संघटना याच अफगाणी तालिबानचा पाकिस्तानी भाऊ आहे. बैतुल्ला मेहसूद याने २००७ साली टीटीपीची स्थापना केली. सध्या नूर वली मेहसूद हा तिचा म्होरक्या आहे. त्याने अफगाणी तालिबानला जाहीरपणे आपली निष्ठा वाहिली आहे. ही खरे म्हणजे अनेक छोट्या-छोट्या सशस्त्र दहशतवादी संघटनांची शिखर संघटना आहे. तालिबानी विचारसरणी मानणारे पाकिस्तानातील बहुसंख्य अतिरेकी गट या संघटनेच्या छत्रछायेत कारवाया करतात. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील खैबर पख्तुनवा प्रांतामध्ये या संघटनेचे प्राबल्य इतके आहे, की तिथल्या काही प्रदेशात पाकिस्तान सरकारऐवजी त्यांचीच ‘सत्ता’ चालते.

टीटीपी एवढी शक्तिशाली होण्याची कारणे काय?

सर्वात महत्त्वाचे कारण अर्थातच पाकिस्तानात अतिरेक्यांना असलेला राजाश्रय. भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत आला आहे. पाकिस्तानने कायमच इन्कार केला असला, तरी भारतात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने अतिरेक्यांचे नंदनवन वसविले, हे जगजाहीर आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कर आणि त्यांची गुप्तहेर संघटना आयएसआयचा सर्वात मोठा हात आहे. टीटीपी शक्तिशाली होण्याचे दुसरे कारण म्हणजे खैबर पख्तुनवा प्रांतामधील सरकारची निष्क्रियता. अलिकडे टीटीपीला पुन्हा पंख फुटले, त्याचे कारण मात्र अफगाणिस्तानातील सत्तांतर हे आहे. तिथे आता टीटीपीचा मोठा भाऊ अफगाण तालिबान निरंकुश सत्तेत आहे. त्यांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये तालिबानी राजवट प्रस्थापित करण्याचे टीटीपीचे मनसुबे आहेत. या संघटनेची भीड एवढी चेपली आहे, की त्यांनी जानेवारीमध्ये आपण किती हल्ले केले, त्यात किती माणसे मारली याची माहिती देणारे पत्रकच जारी केले आहे. एका महिन्यात ४६ (बहुतांश खैबर पख्तुनवा प्रांतात) कारवाया केल्या, ४९ जणांना मारले आणि ५८ जखमी केले, असा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.

राजकीय अस्थिरता आणि आर्थिक दुर्बलतेचा परिणाम किती?

पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता नवी नाही. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर शाहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये अनेक पक्ष आहेत. तातडीने मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी खान यांचा शरीफ सरकारवर दबाव आहे. त्यातच पाकिस्तान प्रचंड आर्थिक गर्तेत अडकला आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेतील परकीय चलन गंगाजळी रसातळाला गेली आहे. शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, म्हणजेच आयएमएफसमोर पदर पसरला आहे आणि आता नाणेनिधी सांगेल त्या अटी मान्य करून कर्जाची फेररचना करणे आणि आणखी काही डॉलर पदरात पाडून घेणे हाच पर्याय त्यांच्यासमोर आहे. कोणत्याही क्षणी पाकिस्तान दिवाळखोरीत निघेल अशी शक्यता असताना या अराजकाचा फायदा उचलण्यासाठी तालिबान सरसावली आहे. अफगाणिस्तानातील खेळ पुन्हा खेळण्याची तयारी सुरू असली, तरी या दोन शेजारी देशांच्या परिस्थितीत जमीन-आसमानाचा फरक आहे.

पाकिस्तानात तालिबान वाढणे अधिक धोकादायक का?

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केली, त्याचा जगावर फारसा परिणाम झालेला नाही. पाकिस्तानमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. तेथे तालिबानसारखे अतिरेकी विचारसरणीचे लोक सत्तेत आले आणि त्यांच्या हाती ही अण्वस्त्रे पडली तर अनर्थ ओढवेल. एखादी दहशतवादी संघटना अण्वस्त्रसज्ज होणे, हे केवळ भारतासाठी नव्हे, तर सगळ्या जगासाठी दुःस्वप्न आहे. कारण या अण्वस्त्रांचा वापर केवळ भारतावरच होणार नाही, तर काळ्या बाजारात जगभरातील अन्य अतिरेकी संघटनांना ही अण्वस्त्रे विकली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पाकिस्तानच्या आयएमएफसोबत वाटाघाटी सुरू असतानाच पेशावर स्फोट होणे, हा योगायोग नाही.

हेही वाचा : विश्लेषण : दहशतवादाचा भस्मासुर पाकिस्तानची राख करणार? 

टीटीपीच्या वाढत्या कारवायांची भारताला चिंता का?

सध्या या अतिरेकी संघटनेचे प्रभावक्षेत्र हे प्रामुख्याने अफगाण सीमेवर आहे. भारताच्या सीमावर्ती भागात या संघटनेचे तितकेसे अस्तित्व नाही. मात्र लष्कर-ए-तोयबा, जामात-उद-दवा या बंदी घातलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे नेते आणि अतिरेकी पाकिस्तानच्या प्रत्येक प्रांतात आहेत. त्यांचा तालिबानला विरोध असला, तरी त्यांच्यातील काहीजण हे छुपे समर्थक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालिबानची वाढती ताकद लक्षात घेता यातील अनेक अतिरेकी त्यांच्याकडे जाण्याची भीती आहे. असे झाल्यास तालिबान थेट भारताच्या सीमेवर येऊ शकेल. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे या संघटनेच्या हाती पाकिस्तानची अण्वस्त्रे पडली, तर त्याचा सर्वात मोठा धोका हा अर्थातच भारताला असेल. त्यामुळेच पाकिस्तान घडणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक घडामोडींकडे सातत्याने बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader