– जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांस्कृतिक नगरी असे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या ठाणे शहराला राजरोसपणे उभी रहाणारी बेकायदा बांधकामे, त्या माध्यमातून सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे भ्रष्ट व्यवहार, या व्यवहारांना राजाश्रय देणारी व्यवस्था आणि त्याभोवती आखल्या जाणाऱ्या सुडाच्या राजकारणाचा बट्टा लागत असल्याची प्रतिक्रिया सध्या सुजाण ठाणेकरांमधून उमटू लागली आहे. अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना बुधवारी झालेल्या मारहाणीमुळे ठाण्यातील राजकीय परिघात ठराविक अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या होत असलेल्या वापराची चर्चाही नव्याने सुरू झाली आहे. महापालिकेत अभिजीत बांगर यांच्यासारखा शिस्तप्रिय आणि शहराच्या विकासासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारा अधिकारी आयुक्तपदी नियुक्त असताना त्यांच्याच प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सातत्याने होणारे आरोप, वाढत्या तक्रारी, संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या वापराची जाहीर चर्चा होत असेल तर ठाणेकरांसाठी हा दुर्दैवी योगायोग म्हणायला हवा. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना संपविण्याचा कट रचल्याचा आरोप करत बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाच्या आवारातच जो काही धुडघूस घातला त्यामुळे सुसंस्कृत ठाण्याचे राजकारण किती गढूळ झाले आहे हे दिसून आलेच. परंतु राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर ठाण्यात सुरू असलेल्या प्रशासकीय कारवायांबद्दलही शंका-कुशंकाना वाव मिळू लागला आहे.

महेश आहेर हे ठाण्यातील ‘वजनदार’ महापालिका अधिकारी म्हणून का ओळखले जातात?

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त असलेले महेश आहेर हे तसे वादग्रस्त अधिकारी म्हणूनच ठाण्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात परिचित आहे. आहेर यांच्या कामाचा धडाका तसा मोठा राहिला आहे. वरिष्ठ सांगतील ते काम मोठ्या जोशात आणि दबंग पद्धतीने करायची अशी त्यांच्या कामाची एक पद्धत राहिली आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचेही ते काही काळ गळ्यातील ताईत होते. त्यांना लिपीक पदावरून सहाय्यक आयुक्तपदी बढतीदेखील याच कार्यकाळात मिळाली. ही बढती नियमबाह्य असल्याच्या तक्रारी तेव्हाही काही समाजिक कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. जयस्वाल यांची बदली झाल्यानंतरही आहेर यांचे महत्त्व काही कमी झाले नाही. दिवा, मुंब्रा यासारख्या बेकायदा बांधकामांचे आगार असलेल्या भागात आहेर वर्षानुवर्षे कार्यरत राहिले. कळवा, मुंब्रा, दिवा ही नगरे ठाण्यातील बेकायदा बांधकामे, त्याभोवती विणले जाणारे कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण तसेच राजकीय-प्रशासकीय अव्यवस्थेचे टापू राहिली आहेत. या नगरांचा ताबा वर्षानुवर्षे आहेर यांच्याकडे राहिला यावरून त्यांचे महापालिकेतील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील ‘वजन’ लक्षात येते.

महेश आहेर विरोधकांच्या ‘ब्लॅकलिस्ट’वर का आहेत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे महापालिकेवर गेली अनेक वर्ष वर्चस्व राहिले आहे. यापैकी काही पदाधिकाऱ्यांची आणि आहेर यांची गेल्या काही वर्षात जवळीक वाढल्याचे दिसून येते. महापालिकेत नगरसेवकांची राजवट असताना सत्ताधारी पक्षातील एका गटाने आहेर यांना पंखाखाली घेतल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिवा भागात ठराविक बेकायदा बांधकामांवर होत असलेल्या कारवाईची चर्चा रंगली होती. याच काळात भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन एकसंघ असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. ठराविक बेकायदा बांधकामांवर होणारी कारवाई, त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्करलेल्या शरणागतीमुळे प्रशासकीय वापराची चर्चा जोमाने सुरू झाली. महेश आहेर हे सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरुन काम करतात असा जाहीर आरोप तेव्हा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला होता. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येताच आहेर हे कमालीचे सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले. याच काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू झाले. काही पदाधिकाऱ्यांना बेकायदा बांधकाम प्रकरणी एमआरटीपीअंतर्गत नोटिसा पाठविण्यात आल्या. काहींच्या घरावर, कार्यालयांवर, हाॅटेलांवर अतिक्रमण विभागाच्या कारवाया सुरू झाल्या. वर्षानुवर्षे महापालिकेच्या काही मालमत्तांमध्ये व्यायामशाळा तसेच इतर सुविधा पुरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मंडळे एका पत्राद्वारे खालसा करण्यात आली. या सर्वामध्ये आहेर हेच केंद्रबिंदू असल्याची चर्चाही रंगली. सुरुवातीला ठाकरे गट लक्ष्य केला जात होता. पुढे हे लोण कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघाच्या दिशेने सरकले. जितेंद्र आव्हाडांच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना, समर्थकांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. काही ठिकाणी बेकायदा बांधकामांना ठरवून अभय तर काही ठिकाणी टिपून बांधकामे पाडण्यात येत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती. उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी, भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पाठोपाठ आता आव्हाड यांनी आहेर यांच्यावर आरोप केले आहेत. वरवर पहाता आव्हाड आणि आहेर हा वाद व्यक्तिगत दिसत असला तरी त्यामागे राजकीय पार्श्वभूमी आहे हे नाकारता येणार नाही.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ, महेश आहेरांचा फोटो शेअर करत म्हणाले, “…तर धक्कादायक माहिती समोर येईल”

ठाण्याची प्रशासकीय व्यवस्थाही गढूळ होतेय?

ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर बुधवारी झालेल्या राड्यानंतर ठाण्यातील राजकारणात प्रशासकीय यंत्रणांचा होत असलेला वापर, एकमेकांवर दबाव निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या नावाचा होत असलेला वापर, प्रशासकीय केबीनमधील पैशांच्या थप्प्या, चित्रफीती-ध्वनीफिती असा सगळा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ समाजमाध्यमावर सुरू झाला आहे. ठाणेस्थित एका ज्येष्ठ पत्रकाराने समाजमाध्यमावर यानिमित्ताने टाकलेला संदेश मात्र येथील समाजिक वर्तुळात भलताच चर्चिला जात आहे. ‘या प्रशासकीय पापाचे धनी आहेत ते आजचे आणि कालचेही राज्यकर्ते. त्याला कधी यांनी तरी कधी त्यांनी खतपाणी घातले’ अशा आशयाचा हा संदेश ठाणे महापालिकेतील अव्यवस्थेचे यथार्थ चित्रण करतो अशी चर्चाच आता सुरु झाली आहे. आहेर यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणाऱ्यांनीच एकेकाळी त्यांच्या समर्थनासाठी प्रशासकीय प्रमुखांकडे वजन खर्ची घातल्याचे खमंग किस्से आता सुरू झाले आहेत. शहरात बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू असताना आणि आहेर यांच्या कथित सहभागाचे आरोप होत असताना याप्रकरणी साधी चौकशी करण्याची इच्छाशक्ती वा हिंमत महापालिकेत कुणी दाखवलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय अव्यवस्थेचे हे पाप नक्की कुणाचे, या प्रश्नाचे उत्तर त्यांचेही आणि यांचेही असेच दिले गेल्यास ते चूक ठरणार नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about thane municipal corporation corruption allegations mahesh aher jitendra awhad eknath shinde print exp pbs
Show comments