– निमा पाटील
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्सचा (ईआययू) जागतिक जीवनमान निर्देशांक २०२३ नुकताच प्रसिद्ध झाला. ‘अस्थैर्याच्या काळात आशेला वाव’ असे या निर्देशांक यादीचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील एकूण १७३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. १३ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळात करण्यात आलेल्या या अर्धवार्षिक सर्वेक्षणामध्ये जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य आणि अयोग्य शहरांचा धांडोळा घेण्यात आला. भारतीय शहरे पहिल्या शंभरातही नाहीत, असे हा अहवाल सांगतो. त्याविषयी…
ईआययू २०२३ जीवनमान निर्देशांकांचे ढोबळ निरीक्षण काय आहे?
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्सच्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, या वर्षात जीवनमान लक्षणीयरीत्या उंचावले आहे. गेल्या १५ वर्षांची आकडेवारी पाहिली तर २०२३ मधील जीवनमान सर्वोच्च स्तराला गेले आहे. गेल्या वर्षी सरासरी जीवनमान निर्देशांक १०० पैकी ७३.२ इतके होते, या वर्षी ते ७६.२ इतके आहे. यावरून जग कोविडोत्तर काळापासून पुढे सरकले आहे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आशिया, पश्चिम आशिया (मध्य-पूर्व) आणि आफ्रिकी देशांमधील शहरांमध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षण या क्षेत्रांनी चांगली कामगिरी बजावली आहे. त्याच वेळी जगभरात अनेक ठिकाणी नागरी संघर्षामुळे स्थैर्याचा निर्देशांक घसरला आहे.
पहिल्या १० मध्ये कोणत्या शहरांचा समावेश आहे?
ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्कचे कोपेनहेगन आहे. पुढे तिसऱ्या ते दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे मेलबर्न, सिडनी (दोन्ही ऑस्ट्रेलिया), व्हँकुव्हर (कॅनडा), झुरिच (स्वित्झर्लंड), कॅल्गरी (कॅनडा), जीनिव्हा (स्वित्झर्लंड), टोरोंटो (कॅनडा), ओसाका (जपान) आणि ऑकलंड (न्यूझीलंड) या शहरांचा समावेश आहे. कॅल्गरी आणि जीनिव्हा हे संयुक्तरीत्या सातव्या तर ओसाका आणि ऑकलंड संयुक्तरीत्या दहाव्या क्रमांकावर आहेत.
तळाची १० शहरे कोणती आहेत?
युद्धग्रस्त सीरियातील दमास्कस तळाला म्हणजे १७३ व्या क्रमांकावर आहे. तळाकडून वर येताना म्हणजे १७२ ते १६४ व्या क्रमांकांवरील शहरे अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत : त्रिपोली (लिबिया), अल्जियर्स (अल्जिरिया), लागोस (नायजेरिया), कराची (पाकिस्तान), पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी), ढाका (बांगलादेश), हरारे (झिम्बाब्वे), कीव्ह (युक्रेन) आणि दुआला (कॅमेरून).
यादीत कोणत्या भारतीय शहरांचा समावेश आहे?
भारतामधील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळूरु या पाच शहरांचा यादीमध्ये समावेश आहे. नवी दिल्ली आणि मुंबई संयुक्तरीत्या १४१ व्या स्थानावर आहेत. चेन्नई १४४ व्या, अहमदाबाद १४७ व्या आणि बंगळूरु १४८ व्या क्रमांकावर आहेत.
आघाडीच्या शहरांची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
पहिल्या क्रमांकावर असलेले व्हिएन्ना हे इकॉनॉमिस्टच्या सर्वेक्षणानुसार गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्या आठांमध्ये आहे. मात्र, २०२१ आणि २०२२ मध्ये कोविड-१९ मुळे व्हिएन्नाने पहिले स्थान गमावले होते. स्थैर्य, चांगली संस्कृती आणि मनोरंजन, विश्वासार्ह पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट शिक्षण व आरोग्य सेवा ही या शहराची वैशिष्ट्ये आहेत. करोनाकाळात कोपेनहेगन, मेलबर्न आणि सिडनीचेदेखील स्थान घसरले होते. आता ही शहरे पुन्हा पहिल्या दहांमध्ये आहेत. पहिल्या दहा क्रमांकांवर असलेल्या शहरांमध्ये हेच निकष महत्त्वाचे राहिले आहेत. गेल्या वर्षी कोविड लसविरोधात केलेल्या निदर्शनांमुळे अनेक शहरांमधील स्थैर्य कमी होऊन त्यांना पहिल्या दहांतील स्थान गमवावे लागले होते. त्यामध्ये प्रामुख्याने कॅनडातील शहरांचा समावेश आहे.
प्रादेशिक पातळीवर कोणते निरीक्षण आहे?
या यादीतील पहिल्या १० शहरांपैकी सात शहरे ही आशियाई-प्रशांत प्रदेशातील आहेत. पहिल्या क्रमांकावरील व्हिएन्ना आणि दुसऱ्या क्रमांकावरील कोपेनहेगन ही दोन युरोपीय शहरे आहेत. तर कॅनडातील तीन, ऑस्ट्रेलियातीन प्रत्येकी दोन, जपान आणि न्यूझीलंडमधील प्रत्येकी एकेक शहर अशी सात शहरे आशियाई-प्रशांत प्रदेशातील आहेत. त्याशिवाय न्यूझीलंडमधील वेलिंग्टन आणि व्हिएतनामच्या हनोई या शहरांनी मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे २३ आणि २० स्थानांनी प्रगती केली.
शहरांमधील संघर्षाचा यादीवर काय परिणाम झाला?
गेल्या वर्षीच्या तुलनेत पश्चिम युरोपमधील अनेक शहरे यादीत खाली घसरली आहेत. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी इत्यादी देशांमध्ये कामगारांच्या वाढत्या संपाच्या घटना आणि नागरी असंतोष ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनची राजधानी कीव्ह हे शहर मागील वर्षी यादीतून पूर्णपणे बाहेर फेकले गेले होते. यंदा त्यामध्ये काहीशी सुधारणा होऊन ते १६५ व्या स्थानी म्हणजे तळाच्या १० शहरांमध्ये आहे. मॉस्को गेल्या वर्षी ९२ व्या स्थानावर होते, यंदाही ते त्याच स्थानावर आहे.
तळाच्या शहरांच्या दुरवस्थेचे कारण काय?
सामाजिक असंतोष, दहशतवादी आणि नागरी संघर्ष यांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने फटके बसत असलेले सीरियामधील दमास्कस आणि लिबियाचे त्रिपोली ही शहरे तळाला आहेत. भारताच्या शेजारी देश असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशातील अनुक्रमे कराची आणि ढाका ही शहरे तळाच्या १० शहरांच्या यादीत आहेत. दमास्कसची स्थिती जैसे थे असून त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. दुसरीकडे, करोनाची महासाथ ओसरल्यानंतर त्रिपोली आणि इतर शहरांमध्ये परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. तरीही स्थैर्य, आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा सर्वच आघाड्यांवर या शहरांची परिस्थिती चांगली नाही.
कोणते निकष सर्वात महत्त्वाचे मानले आहेत?
स्थैर्य आणि संस्कृती व मनोरंजन या दोन निकषांना प्रत्येकी २५ टक्के महत्त्व देण्यात आले आहे. स्थैर्यामध्ये किरकोळ गुन्हे, गंभीर गुन्हे, दहशतवाद, लष्करी संघर्ष, नागरी अशांतता किंवा संघर्ष या सूचकांचा आधार घेण्यात आला आहे. संस्कृती व मनोरंजन या निकषामध्ये आर्द्रता व तापमान, प्रवाशांना हवामानाचा होणारा त्रास, भ्रष्टाचाराची पातळी, सामाजिक किंवा धार्मिक बंधने, सेन्सॉरशिपचे प्रमाण, क्रीडा सुविधांची उपलब्धता, सांस्कृतिक उपक्रमांची उपलब्धता, अन्न आणि पेय, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा हे सूचक महत्त्वाचे मानले आहेत.
हेही वाचा : एकटं फिरायला जायचंय? सोलो ट्रिपसाठी जगभरातील सर्वोत्तम १० ठिकाणांची यादी पाहाच!
इतर निकषांना किती महत्त्व देण्यात आले?
आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधेच्या निकषाला प्रत्येकी २० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. खासगी आरोग्य सेवेची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता, सार्वजनिक आरोग्य सेवेची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता, थेट दुकानातून औषध विकत घेण्याची सुविधा, आरोग्य सेवेचे सामान्य सूचक यांचा त्यासाठी विचार करण्यात आला. तसेच रस्त्यांचे जाळे, सार्वजनिक वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण यांची गुणवत्ता, दर्जेदार घरांची उपलब्धता, वीज, पाणी आणि दूरसंचार सेवेची गुणवत्ता यांच्या आधारे हा निकष मोजला गेला. तर शिक्षणाचा निकष १० टक्के महत्त्वाचा मानण्यात आला आहे. खासगी शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता आणि सार्वजनिक शिक्षणाचे सूचक त्यासाठी विचारात घेण्यात आले आहेत.