– भक्ती बिसुरे
गेल्या काही वर्षांत हवामान बदल, तापमान वाढ या केवळ भारताच्याच नव्हे, तर जागतिक चिंतेच्या गोष्टी ठरत आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रमुख ऋतू भारतात ढोबळमानाने दिसून येतात. गेल्या काही वर्षांत या ऋतूंचे चक्रही कोलमडताना दिसत आहे. पावसाळ्यात एका विशिष्ट कालावधीत प्रचंड पाऊस आणि उरलेला काळ पावसाची सुटी, हिवाळ्यात थंडीच न पडणे आणि उन्हाळ्यात दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाच्या सरी असे संमिश्र हवामान सर्रास दिसून येत आहे. पाऊस आणि महापुराने जीवितहानी होते, थंडीच्या लाटेने माणसे मृत्यू पावतात, तसा उष्माघातही गेल्या काही वर्षांमध्ये मृत्यूचे कारण ठरताना दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर उष्णतेच्या लाटांविषयक निर्देशांक प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याबाबत हे विश्लेषण.
काय आहे निर्देशांक?
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नुकताच हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन देशाच्या विविध भागांसाठी उष्णता निर्देशांक (हीट इंडेक्स) जारी करण्यास सुरुवात केली. हा निर्देशांक सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असला, तरी पुढील वर्षीपासून तो नियमित करण्याच्या विचारात आयएमडी आहे. दिवसाचे किमान आणि कमाल तापमान देण्याच्या बरोबरीनेच प्रामुख्याने मैदानी भागासाठी उष्णता निर्देशांक प्रसिद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की दुपारी अडीचला कमाल तापमान असते. त्यामुळे त्या वेळचे तापमान आणि आर्द्रतेची माहिती उष्णता निर्देशांकासाठी वापरण्यात येत आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर असलेला हा उपक्रम पुढील वर्षीपासून नियमित करताना केवळ उष्णता निर्देशांकापुरते त्याचे स्वरूप न ठेवता वारे आणि वादळांबाबत पूर्व अंदाज व्यक्त करण्यापर्यंत त्याचा विस्तार करणार असल्याचे महापात्रा यांनी म्हटले आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
जेव्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडते आणि दिवसभराच्या सामान्य तापमानापेक्षा ते ४.५ अंश सेल्सिअसने जास्त असते तेव्हा हवामान विभाग त्या परिस्थितीला उष्णतेची लाट म्हणून घोषित करतो. तापमान ४० अंश सेल्सिअस आणि सामान्यपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसने जास्त असते तेव्हा त्या परिस्थितीला तीव्र उष्णतेची लाट म्हणून घोषित केले जाते. कमाल तापमानातील संभाव्य वाढीबाबत आगाऊ माहिती नागरिकांना अधिकाधिक अचूक स्वरूपात दिली असता, उष्माघाताच्या धोक्याबाबत योग्य वेळी नागरिकांना सावध करणेही सहजशक्य होईल. त्यामुळे उष्णता निर्देशांकाचे महत्त्व आहे.
उष्णता निर्देशांक का महत्त्वाचा?
उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक नावाचा आजार बळावल्याने माणसाचा मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढताना दिसून येत आहे. नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर इथे उष्माघाताच्या झटक्यामुळे सुमारे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा समोर आला. सन २०१० ते २०१९ आणि २००० ते २००९ अशी तुलना केली असता उष्णतेच्या लाटांचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांनी वाढले आहे. २००० ते २०१९ या काळात उष्णकटिबंधीय वादळांमुळे होणारे मृत्यू घटले, मात्र उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ६२ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उष्माघात रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी उष्णता निर्देशांक महत्त्वाचा आहे.
हेही वाचा : विश्लेषण : मिथेनचे उत्सर्जन रोखण्यात जीवाश्म इंधन कंपन्यांना अपयश, जाणून घ्या IEA च्या अहवालात नेमकं काय?
उष्णतेच्या लाटांचे आरोग्यावरील परिणाम?
कमाल तापमानात झालेल्या वाढीबद्दल अनभिज्ञ राहिल्यास, थेट तीव्र उन्हाशी संपर्क आल्यास मानवी प्रकृतीवर त्याचे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी आणि अस्वस्थता, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कूलर लावावेत. हवा खेळती राहील असे पाहावे. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तोपर्यंत रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आवश्यकतेनुसार सलाइन लावावे. रुग्णाला भरपूर पाणी पिण्यास द्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी केलेली सरबते, ताज्या फळांचा रस, ताक पिण्यास द्यावे. तीव्र उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला आणि सहव्याधिग्रस्त यांची काळजी घ्यावी. शेतात, तसेच रस्त्यावर काम करणारे मजूर यांनी दुपारचे काही तास काम बंद ठेवून सावलीत विश्रांती घ्यावी. त्यामुळे संभाव्य उष्माघातापासून स्वत:चा बचाव करणे शक्य होईल.
bhakti.bisure@expressindia.com