अफ्रिकेतील घाना देशात जीवघेण्या मारबर्ग विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्णांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. वटवाघळापासून माणसात संसर्ग झालेल्या या विषाणूचा संसर्ग झाल्यास ८८ टक्क्यांपर्यंत मृत्यूचा दर आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “घानातील पहिला रुग्ण २६ वर्षांचा पुरुष आहे. तो २६ जुनला रुग्णालयात तपासणीसाठी आला आणि एक दिवसाने त्याचा मृत्यू झाला. दुसरा रुग्ण ५१ वर्षीय पुरुष आहे. तो २८ जुनला रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.” मारबर्ग विषाणूचा अफ्रिकेत शोध लागल्यापासून ही संसर्गाची दुसरी वेळ आहे.

मारबर्ग विषाणू संसर्ग काय आहे?

मारबर्ग विषाणू संसर्गाला (Marburg virus disease – MVD) आधी मारबर्ग हेमारॉजेक फिव्हर (Marburg haemorrhagic fever). हा गंभीर स्वरुपाचा संसर्ग असून अनेकदा यात मृत्यूही होतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. मारबर्ग इबोला विषाणू संसर्गाप्रमाणे जीवघेणा आहे. या दोन्ही संसर्गांमध्ये अनेक गोष्टींचं साम्य देखील आहे.

मारबर्ग विषाणू राऊजटस वटवाघळात (Rousettus fruit-bats) आढळतात. युगांडातून आयात केलेलं अफ्रिकन माकडाला सर्वात आधी मारबर्ग विषाणूचा संसर्ग झाला होता. १९६७ मध्ये पहिल्यांदा जर्मनीतील मारबर्ग व फ्रँकफर्ट आणि सार्बियातील बेलग्रेडमध्ये या विषाणूचा संसर्ग झाला होता.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, मारबर्ग विषाणूच्या संसर्गात सरासरी मृत्यूदर ५० टक्के आहे. तो २४ टक्क्यांपर्यंत खालीही येतो आणि ८८ टक्क्यांपर्यंत वाढतोही. हे प्रमाण विषाणूचा प्रकार आणि रुग्णावरील उपचाराचं व्यवस्थापन यावर अवलंबून आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

मारबर्ग विषाणूची लक्षणं काय?

मारबर्ग विषाणूचा संसर्ग झाल्यास संसर्गानंतर २ ते २१ दिवसांच्या काळात बाधित व्यक्तीला तीव्र ताप, स्नायु दुखणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. तिसऱ्या दिवशी रुग्णांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबही होतात. या टप्प्यावर बाधित रुग्णाचे डोळे आत गेलेले दिसतात आणि चेहऱ्यावर कोणतेही भाव राहत नाही. ५ ते ७ व्या दिवशी रुग्णाच्या नाकातून दातांमधून रक्तस्राव होतो. उलट्यांमध्ये देखील रक्त यायला सुरुवात होते. लक्षणं दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर ८ ते ९ दिवसात मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

हेही वाचा : अफ्रिकेतील घाना देशात नव्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग, मृत्यूदर तब्बल ८८ टक्के, WHO चाही इशारा

मारबर्ग संसर्गावर उपचार काय?

वैद्यकीयदृष्ट्या सध्या मारबर्ग संसर्ग आणि मलेरिया, टायफाईड अशा व्हायरल तापांमध्ये फरक करणं अवघड आहे. त्यामुळे रुग्णाला मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालाय की नाही हे करोनाप्रमाणे वैद्यकीय चाचणीनंतरच स्पष्ट होते. सध्या मारबर्गवर कोणताही अधिकृत उपचार किंवा लस नाही. त्यामुळे लक्षणांवरील उपचार हाच सध्या पर्याय आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणे आणि लक्षणांवर उपचार करणे हेच मृत्यू रोखण्याचा सध्या पर्याय आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about what is the marburg virus disease mvd symptoms diagnosis and treatment pbs