ब्राझीलमध्ये सध्या अनागोंदी माजली आहे. ब्राझीलमधील एक गटाने थेट संसदेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष ब्राझीलने वेधलं. अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी या हिंसाचार आणि दंगलींचा निषेध केला. या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या संसद आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करणारे लोक कोण आहेत? या गटाने ब्राझीलमध्ये हिंसाचार आणि दंगली करण्याचं कारण काय? या प्रकारावर ब्राझील सरकारची भूमिका काय? याचा हा आढावा…
ब्राझीलमध्ये नेमकं काय घडतंय?
अनेक वर्षांनंतर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या दबावानंतर ब्राझीलमध्ये झालेल्या ‘मुक्त’ निवडणुकीत देशाचे अतिउजवे अध्यक्ष बोल्सोनारो यांचा निसटता पराभव झाला. त्यांना ४९.२ टक्के मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी डाव्या विचारसरणीचे लुईस इनासिओ लुला डिसिल्वा यांना ५०.८ टक्के मते मिळाली. मात्र, या पराभवानंतरही बोल्सोनारो यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला. बोल्सोनारो यांना हा पराभव मान्य नाही. देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असून त्यामुळे आपला निसटता पराभव झाला, असा त्यांचा दावा आहे. तसेच निवडणुकीतच घोटाळा झाल्याचा दावा केला. त्यामुळे ब्राझीलमधील राजकीय परिस्थिती स्फोटक झाली.
अध्यक्षीय निवडणुकीच्या अनेक फेऱ्यांनंतर ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात डिसिल्वा यांचा निसटता का होईना, विजय झाला. त्यानंतर बराच काळ तत्कालीन अध्यक्ष बोल्सोनारो यांनी जनतेला झुलवत ठेवले. एकीकडे निवडणूक प्रक्रियेवर टीका सुरू ठेवतानाच त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडण्याची तयारीही दाखविली. आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहनही केले. त्यांचे समर्थक मात्र डिसिल्वा यांचा शपथविधी होऊ नये, याच्या प्रयत्नात होते. निवडणूक निकाल लागल्यापासूनच देशात लहान-मोठ्या चकमकी झडत होत्या. बोल्सोनारो समर्थक रस्त्यावर उतरून १ जानेवारीचे डिसिल्वांचे पदग्रहण रोखण्याची मागणी करीत होते.
अखेर आंतरराष्ट्रीय दबावापोटी बोल्सोनारो यांनी अनेक आढेवेढे घेत अध्यक्षाची खुर्ची रिकामी केली आणि डाव्या विचारसरणीचे लढवय्ये नेते डिसिल्वा राष्ट्राध्यक्ष झाले.मात्र, या काळात बोल्सोनारो स्वतः शांत असले, तरी समाजमाध्यमांवर एक वेगळाच कट शिजत होता.
दंगलीचा पाया कसा रचला गेला?
ब्राझीलमध्ये ८ जानेवारीला सर्व सरकारी कार्यालये आणि न्यायालयांवर निदर्शने करण्यासाठी जमण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले. हा मोर्चा निघणार याबाबत पोलीस आणि सरकारी यंत्रणांना कल्पना होती, मात्र हे आंदोलन एवढे हिंसक होईल, याचा अंदाज कुणालाही आला नाही. बोल्सोनारो समर्थकांनी समाजमाध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर करून निरोप पोहोचविण्याचे काम केले. विशेषतः राजधानी ब्रासिलियामध्ये जास्तीत जास्त समर्थक जमतील याचं नियोजन करण्यात आलं. एकाच वेळी संपूर्ण ब्राझीलमध्ये अराजक माजवून डिसिल्वा यांना सत्तेवरून खाली खेचणे हा त्यांचा हेतू होता.
८ जानेवारीला ब्रासिलियामध्ये काय घडलं?
ब्रासिलियामधील लष्करी मुख्यालय असलेल्या चौकात एक आठवड्यापासून बोल्सोनारो समर्थक जमण्यास सुरूवात झाली होती. रविवारी हा आकडा काही हजारांच्या घरात गेला. यातल्या मोठ्या गटाने तिथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘प्राका दोस ट्रीस पोदेरेस’ (तीन सत्तास्थानांचा चौक) या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे मोर्चा काढला. पुढे हा मोर्चा मंत्र्यांची निवासस्थाने असलेल्या भागातून राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय, सर्वोच्च न्यायालय अशा अत्यंत महत्त्वाच्या इमारतींवर धडकला. विशेष म्हणजे अत्यंत संवेदनशील भागात पोहोचेपर्यंत पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवले नाही, असाही आरोप होत आहे.
हेही वाचा : ब्राझीलमधील लोकशाही धोक्यात? संसद, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा हल्ला
सत्ता बळकाविण्याचा प्रयत्न कसा झाला?
महत्त्वाच्या इमारतीजवळ पोहोचल्यावर मोर्चा अधिक हिंसक झाला. दगडफेक करून इमारतींच्या काचा फोडण्यात आल्या. अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्या. हिंसाचार रोखण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. ब्राझीलचे झेंडे हातात घेऊन जमाव या तिन्ही महत्त्वाच्या इमारतींमध्ये शिरला. ते प्रतिनिधीगृह, न्यायालय आणि सगळा देश आपला असल्याचे त्यांनी जाहीर केले. लष्कराने हस्तक्षेप करावा आणि डिसिल्वा यांची राष्ट्राध्यक्षपदावरून हकालपट्टी करून पुन्हा ‘खरे अध्यक्ष’ बोल्सोनारो यांच्याकडे सत्ता द्यावी, अशी मागणी आंदोलक करीत होते. दंगेखोरांनी इमारतींमधील साहित्याची नासधूस केली. अनेक मौल्यवान वस्तू लांबविल्या. देशाच्या सत्ताकेंद्रात अनेक तास गोंधळ घातल्यानंतर अखेर पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणला. रबरी गोळ्या, अश्रूधूर याचा वापर करून जमावाला पांगविण्यात आणि इमारतींवर पुन्हा ताबा मिळविण्यात सरकारी यंत्रणांना यश आले. याप्रकरणी आतापर्यंत किमान ४०० जणांना अटक करण्यात आली आहे.